५ जून : जागतिक पर्यावरण दिन
रणवीर राजपूत
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज
मित्रहो,पृथ्वीवरील मानवी अस्तित्व टिकवून ठेवायचं असल्यास जैवविविधतेचं जतन व संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर,वसुंधरेच देणं फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण अन् संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे,हे आजच्या जागतिक पर्यावरण दिना निमित्त लक्षात घेणं गरजेचं आहे.निसर्ग हे मानव,वन्यजीव,जलचर प्राणी,पक्षी व वनसंपदा यांना लाभलेलं मोठं वरदान आहे.निसर्गाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणं होय.सध्याच्या काळात होणाऱ्या जल,वायू व ध्वनी प्रदूषणामुळे वसुंधरेचं एकूण स्वास्थ्य बिघडत चाललं आहे.प्रदुषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होणं,स्वाभाविकच आहे.वास्तविक पहाता,एका बाजूने पर्यावरणाचं रक्षण अन् संवर्धन व्हावं अन् दुसऱ्या बाजूने जल व वायू प्रदूषण थांबावं,या उद्देशाने ५ जून १९७२ रोजी स्वीडन मधील स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.या परिषदेत १३० देशांनी हजेरी लावली होती.विश्वात सर्वदूर पर्यावरणावर सातत्याने अधिक भर दिला गेल्याने पर्यावरण हा विषय पाठ्यपुस्तकात समाविष्ट झाला आहे.त्याची परिणिती म्हणजे जागतिक पातळीवर ५ जून १९७४ पासून पर्यावरण दिन साजरा होऊ लागला अन् तेव्हापासून पर्यावरण रक्षण व प्रदूषण निर्मूलन यावर ठोस उपाय शोधले जात आहेत.
वास्तविक पहाता,बदलती जीवनशैली,वाढणारे शहरीकरण,सिमेंटची जंगलं फोफावणे,त्यासाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होणे, गगनचुंबी टॉवर्सच्या बांधकामांसाठी टेकड्या-पर्वतांची खोदाई होणे,रासायनिक कारखानदारी,वाढते जल-वायू प्रदूषण,अणू चाचण्या,सातत्याने वाढणारी वाहनांची संख्या अन् त्यातून होणारे वायू-ध्वनी प्रदुषण या कारणांमुळे जीवसृष्टीचे जीवन कवच असलेल्या ओझोन लेयरची क्षती होणं,ही चिंताजनक बाब आहे.
मित्रहो,पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने अवेळी पाऊस,गारपिटीचा वर्षाव, अतिउष्णतामान(ग्लोबल वॉर्मिंग),महापूर,
अतिवृष्टी आदी नैसर्गिक आपत्त्या उद्भवता आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उध्वस्त होताना दिसत असून,शेतकरी हवालदिल होताहेत.ह्या सर्व हानी होऊ नयेत,यासाठी पर्यावरणाचा समतोल साधणे,सकल मानव जातीचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण मोहीम युद्धपातळीवर कार्यान्वित करणं अत्यंत गरजेचं आहे.प्रत्येक कुटुंबाने आपल्या परिसरात किमान एक झाड तरी लावावे अन् त्याला जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी.कारण झाडे ही आपणास प्राणवायूचा पुरवठा करत असतात.वृक्षे ही निसर्गाची हिरवी फुफ्फुसे आहेत.हे लक्षात घेऊन झाडे लावा – झाडे जगवा ही मोहीम अविरत चालू ठेवणे,मानवाच्या व जीव सृष्टीच्या दृष्टीने संजीवनी ठरणारी आहे.वृक्ष तोडीविरुद्ध कडक शिक्षेची तरतूद शासनयंत्रणेने करावी.जंगलांमध्ये आगीचे प्रकार वाढत चालले आहेत,ते थांबले पाहिजेत.केंद्र व राज्य सरकारच्या वन विभागाने यावर ठोस उपाययोजना कराव्यात,जेणेकरून भविष्यात कोणी वृक्षतोड करण्याची हिंमत करणार नाही.यासाठी वन कायद्यात कठोर शिक्षा व दंडाची तरतूद करावी.असं ठोस उपाय योजल्याने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होण्यास हातभार लागेल,हे निश्चित.
झाडे लावू,झाडे जगवू…
करतील परतफेड देऊनी…
प्राणवायू…प्राणवायू…
बंधू भगिनींनो, वृक्षवल्ली, नद्या,नाले,पर्वतं,सागरं ही वसुंधरेची कवचकुंडले आहेत.त्यांचे रक्षण व संवर्धन केल्यास पर्यावरणाचे संतुलन साधले जावून,वसुंधरेचं सौंदर्यही अबाधित राहते.ही अवस्था मानवाला व जीवसृष्टीला लाभदायक सिद्ध होईल.झाडे ही प्राणवायूचे कारखाने आहेत.यास्तव सरकार अन् जनतेने हातात हात घालून वृक्षारोपण अभियान
युद्धपातळीवर चालविला पाहिजे.गेल्या दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या काळात प्राणवायूच्या कमतरतेमुळे असंख्य लोकांना नाहक जीव गमवावे लागलेत.यावर रामबाण उपाय एकच तो म्हणजे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करणे.याला दुसरा पर्याय नाही.तात्पर्य,शासकीय यंत्रणेने लोकसहभागातून वृक्षलागवड व्यापक स्वरूपात करावी,त्यातून नैसर्गिकरीत्या प्राणवायू निर्मिती होऊन तुम्हा आम्हाला आणि भावी पिढींना सुरक्षित व आरोग्यदायी जीवन लाभेल.वृक्षवल्ली…आम्हा सोयरे वनचरे…! आपणा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हिरवळीचे गार गालिचे…
रक्षण करिती पर्यावरणाचे…
लेखक-रणवीर राजपूत
गवर्नमेंट मिडिया (एक्रिडेशन-मावज/०४३७),महाराष्ट्र शासन,मंत्रालय
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत