महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुध्दाची तत्वे संविधानात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीतून

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर

 माझे लोक मेंढरे आहेत मी त्यांचा पालक आहे. मी सांगीन त्याच मार्गाने आपणास जावयाचे आहे. आणि मला विश्वास आहे की, माझे लोक भारतात बौद्ध धम्माची स्थापना करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करतील . बौद्ध धर्माची तत्वे काय आहेत भाषणातुन याविषयी आपले मत मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - 

आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्वे कालिक, काही काळापुरती आहेत असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही. आज दोन हजार पाचशे वर्षानंतर ही बुद्धाची सारी तत्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धांच्या 30,000 संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लक्ष रुपये खर्च करून बौद्ध विहार बांधण्यात आलेले आहे. जर्मनी मध्ये तीन – चार हजार बौद्ध संस्था आहेत. बुद्धांची तत्वे अजरामर आहेत तथापि , बुद्धाने असा दावा केला नाही की , हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धाने सांगितले , माझे वडील प्राकृत होते , माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला पटेल तर घ्यावा. हा धर्म तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारावा. एवढी उदारता कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही

पुढे ते म्हणतात –

मात्र तुमची ही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल , मानसन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एका गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यावर आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये. म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतके नव्हे तर जगाचा ही उद्धार करू. कारण बौद्ध धर्माने जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांतता नांदणार नाही. हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे , काही इच्छिलेले आहेत हे तरुणाने लक्षात घ्यावे. ” त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा विसावा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा. मला सर्वांना बरोबर न्यायचे आहे. प्रथम तथागताने काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना या धर्माचा प्रचार करा असा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्यांच्या चाळीस मित्रांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्याला भगवंताने सांगितले की , हा धर्म कसा आहे ? बहुजन हिताय, बहुजन सुखाय , लोकानूकंपाय, धम्म आदि कल्याणंम, मध्य कल्याणम् , पर्यासान कल्याणम् असा आहे. त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागतांनी आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपल्यालाही एक नवी योजना तयार करावी लागणार आहे”
संदर्भ – मी पाहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेखक – भन्ते सुमेध. पृष्ठ. क्रं.103 – 104 पैरा – शेवटचा.

उपरोक्त संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सदरचे संदर्भात केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा विसावा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा आणि आता आपल्यालाही एक नवी योजना तयार करावी लागणार आहे असे सांगण्याचे त्यांचे काय कारण असावे.? ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपल्या बुद्धी चतुर्याच्या भरोशावर भारतीय संविधान लिहून त्यात सर्वाना समानतेचा अधिकार प्रदान केला. सामाजिक, शैक्षणिक परिघात उंच अशी भरारी घेऊन उच्च पदाच्या नोकऱ्या प्राप्त केल्यात , व्यापारी क्षेत्रात उलाढाल केली पण आपल्या कमाईचा सामाजिक कार्यासाठी विसावा हिस्सा देण्यास काचकूच करीत असतो. अर्थात आपण माडी, गाडी, सोने -नाणे यांनी सधन झालोत. त्यांनी आपल्या डोळ्या देखत पाहिलेली समाजाची दयनीय अवस्था ती म्हणजे आपल्या पुर्वज्यांच्या अंगावर जे एक फाटकी लंगोटी, मळलेला सदरा ह्यात लंगोटी बदलविण्याची सोयच नव्हती ती त्यांनी त्यांच्या ह्यातीत सामाजिक कार्य करून कृतीतून पूर्णत्वास नेले.ही सगळी देण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचीच आहे.हिंदू धर्माची अशी काही तत्व प्रणाली आहे की , त्यामधून उत्साह निर्माण होऊ शकत नाही. आपल्या उन्नतीचा मार्ग नाही. म्हणून त्यांनी हिंदू धर्माला लाथाडून बौद्ध धर्माचा ज्यात धर्म आणि धम्म आहे स्वीकरून , आपणा सर्वांचे बोट धरून बुद्धाच्या समतेच्या मार्ग पथावर आणून ठेवले. आणि भारतीय संविधान लिहून मानवता दर्शविणारी धर्मनिरपेक्षता त्यात ओतली. भारतामधील सर्व लोकांना समतेचा अधिकार प्राप्त करून दिला.ही घटना साधी सुधी नव्हती. कारण स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – माझ्या जागी दुसरा असता तर त्याचा समूळ नाश झाला असता ह्या वाक्या वरून आपणास जातीयवाद्यांच्या जबड्यातून अलगद बाहेर काढून त्यांच्या या कठीण कार्याची जाण होईल. बौद्ध धर्माचा स्वीकार आणि भारतीय संविधान लिहून सर्वाना समान अधिकार प्रदान करणारे पाचव्या स्थित्यंतरातील महान क्रांतिकारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत.
दिनांक 20 नोव्हेंबर 1956 रोजी विश्व बौद्ध परिषदेच्या शेवटच्या दिवशी नेपाळ नरेशांच्या महाराणी , यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी सिंग दरबारातील गॅलरी हॉलमध्ये समारंभ सुरू असताना त्यांनी भगवान धर्म हा लोकशाहीवादी होता असे स्पष्टीकरण आपल्या भाषणातून देतांना ते म्हणतात –
या दृष्टीने पाहिले तर बौद्ध धर्म शुद्ध लोकशाहीवादी आहे. एकदा अजातशत्रू राजाचा पंतप्रधान भगवान बुद्धाकडे जाऊन म्हणाला , महाराजांना वज्जी लोकांना जिंकावयाचे आहे. त्यावर बुद्ध म्हणाले , वज्जी व लोक जो पर्यंत एक आहेत तो पर्यंत त्यांना कोणीही जिंकू शकत नाही. बुद्धाने याचे स्पष्टीकरण केलेले नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मात्र एक गोष्ट नि:संशय आहे आणि ती ही की , भगवान बुद्ध वज्जी लोकांच्या लोकशाही प्रजासत्ताक राज्यकारभार पद्धतीस उद्देशून बोलले होते. अर्थात भगवान बुद्ध हे लोकशाहीचे महान पुरस्कर्ते होते
संदर्भ – पुस्तकं – मी पाहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेखक – भन्ते सुमेध. पृष्ठ क्रं.134. पैरा – खालून दुसरा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार  व उपरोक्त संदर्भानुसार ज्या भगवान बुध्दानी त्यांच्या ह्यातीत आणि शिकवणुकीत प्रत्येक मनुष्याने निर्दोष जीवन जगण्याची पद्धती आणि समानतेची शिकवणूक दिली असेल तर बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या विचारात ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या विचारांची भेसळ कोणी केली आणि कां केली ? ह्याचे आपल्या समाजातील बौद्ध उपासकांनी चिकित्सक सदविवेक बुद्धीने जागृत राहून शोधन करणे गरजेचे आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि कार्ल - मार्क्स यांच्या विषयी बोलताना म्हणतात - 
बुध्दा पेक्षा कार्ल - मार्क्सने वेगळे काय सांगितले ? भगवंतानी जे सांगितले ते वेड्यावाकड्या मार्गानी सांगितलेले नाही

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.104 पैरा – पहिला शेवटची ओळ.

जर भगवंतांनी वेड्यावाकड्या मार्गाने सांगितले नाही तर काय सत्य सांगितले ते पहा - 
भगवान बुद्धाने जगात सर्वात श्रेष्ठ असे कोणते तत्व सांगितले असेल ते हे की, मनाची स्वच्छता ठेवण्याच्या ध्येयाने मनाची सुधारणा केल्याशिवाय जगाची अगर मानवमात्रांची सुधारणा होणार नाही

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.133 पैरा – खालून दुसरा शेवटची ओळ.
भारतीय संविधानात भगवान बुध्दाच्या तत्वाची पाळेमुळे रुजवून भक्कम अशी पाया उभारणी करून ती राज्यघटना आपण कशी टिकवून ठेवली पाहिजे , तिचा विनाश होता कामा नये असा धोक्याचा इशारा देऊन त्यावेळेस ते काय सांगतात आणि लिहितात ते पहा –
आपण नवीन घटना घेतली आहे. आपल्याला या नवीन पद्धतीचा अनुभव नाही. ती जर अत्यंत दक्षतेने राबविली नाही तर या देशाचा नाश होईल
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.113 पैरा – शेवटचा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्यांच्या अख्या आयुष्यात समाजहिता बरोबरच देशहित ही साधले होते. त्यांनी मनाशी ठरविले असते तर आपल्या महान अशा बुद्धी चातुर्याच्या भरोशावर   भारत देशाचे केव्हाच वाटोळे करु असते पण त्यांच्या मनात यदकिंचितही लवलेश न येता तशी द्वेषभावना मनात रुजली नाही . हीच खरी त्यांची महानता दिसून येते.आपल्या दरिद्री , अज्ञानी बांधवांसाठी जीवाचा त्याग करून विकृत बुद्धीच्या ब्राम्हणी विचारधारेला तोडीस तोड सामना केला. आपल्या समाजाचा ऱ्हास कसा होईल आणि त्यासाठी आपल्या समाज बांधवांनी काय उपाययोजना केली पाहिजे यासाठी फारच मोलाचे उदबोधनपर लिखित मार्गदर्शन केले,  ते म्हणतात -  
 आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य आहे. बड्या हुद्द्याच्या जागी गेल्यावर या सुशिक्षितांना आपल्याच अशिक्षित बांधवांचा विसर पडतो. याचे कारण त्यांच्या स्वतःच्या समाजाविषयी आपुलकीची भावना नाही. त्यांच्या ठिकाणी आपल्या बांधवाबद्दल कळकळ व तळमळ नाही हे होय. धर्मभावण्याचा अभाव हेही एक कारण आहे. जर त्यांनी आपल्या या असंख्य बांधवांकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा ऱ्हास होईल 

संदर्भ – खंड. 18 भाग – 3 पृष्ठ. क्रं. 465.पैरा – 2.

 उपरोक्त संदर्भानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात समाजाविषयी किती आपुलकी , तळमळ होती. यावरून हे सिद्ध होते. त्यांच्याच भरवश्यावर आज आपण सर्वजण सुखात , आनंदात जीवन जगत आहोत. पण त्यांचीच विचारधारा आपल्याच समाजातील एक एक पुढारी लोक वेगवेगळ्या गटात, पक्षात विलीन होऊन पोळी शेकण्याचे काम करीत असतांना निदर्शनास येत आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत स्वतः समाजातील अज्ञानी लोकांना सोबत घेऊन पुढारपण केले. तेव्हा करुण भावनेने उद्देशून  छत्रपती राजश्री शाहू महाराज म्हणतात - 

 माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो  , तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला , याबद्दल मी तुमचे अंतकरण पूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की  , डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की , ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते 

संदर्भ – खंड. 18 भाग – 1 पृष्ठ. क्रं. 4 पैरा – वरून तिसरा. मुकनायक 10 एप्रिल 1920.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय कीर. पृष्ठ. क्रं. 46.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात किती इच्छा ,  आकांक्षा आणि मनीषा होती की , माझ्या सारखेच माझ्या समाजातील पुढारी समाजाच्या सेवेत तत्पर राहतील आणि स्वतः स्वाभिमानाने जीवन जगून , पुढारपण करून पक्ष बळकटीस आणून भारत देशावर राज्य करतील. पण नेमके उलटे होऊन समाजातील पुढारीच जातीयवाद्यांच्या ताटाखालचे लाळ चाटणारे मांजर झालेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अति परिश्रमाने मिळवलेल्या कार्यावर पूर्णपणे पाणी फेरल्या गेले.त्यांनी सोचले काय आणि झाले काय ?  अशी आपली गत होऊन बसली आहे.  

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत समाजातील , राजकारणातील आणि धार्मिक सगळ्या अंगांना स्पर्श केला. ज्या भगवान बुद्धाच्या धर्मात धर्म आणि धम्म आहे तोच त्यांनी स्वतः अंगीकार करून त्याचे अनुसरण करण्यास आपणास सांगितले. भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची तत्वप्रणाली भारतीय संविधानात अधोरेखित केली. ह्यात भारतीय संविधान हे प्रत्येक व्यक्तीला , मानवी मूल्यांना प्राधान्य देणारे आहे. संविधान निर्मितीच्या वेळीही धर्म मार्तंडांचा पगडा होता पण तेव्हा मानवी मूल्यांना प्राधान्य देत आधुनिक संविधानाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकहाती केली. राज्यघटना लवचिक आहे , प्रवाही आहे व काळानुसार चालणारी, पण नागरिकांना संधीची , दर्जाची समानता देणारी अशी आहे. अशी मानव केंद्रित राज्यघटना जगात कुठेही सापडणार नाही. 
 भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयांच्या जगण्या मरण्याचा विषय आहे. त्यामुळे राज्यघटने कडे पाहण्याचा दृष्टिकोन सामाजिक असावा त्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करून  , नेत्या प्रति अंधभक्त न होणे व संविधानाप्रती प्रामाणिक राहणे हेच आपले भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे  
 म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या कार्या विषयी चार ओळी - 

कित्येक खर्च झाल्या
लेखण्या इथे
भिम शब्दात बांधताना….
तरी लिहितील ,
अजून लाख पिढ्या इथे
भिम नव्याने शोधताना…..!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!