२९ मे माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर स्मृतिदिन


जन्म – २७ जानेवारी १९०९ (दादर,मुंबई)
स्मृती – २९ मे २००३ (मुंबई)
डॉ. सविता भीमराव आंबेडकर (माईसाहेब) यांचा जन्म दादर, मुंबई येथे झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समाजातील वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला. पण त्यांचे कौटुंबिक जीवनही फार त्रासदायक होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आजारपण आणि शारीरिक वृद्धीमुळे मरण पावल्या. त्याआधी बाबासाहेबांनी त्यांची चार मुलेही गमावली होती. या आघातांनी ते पडले होते. दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांची प्रकृती देखील खालावत चालली होती. अशातच डॉ. शारदा कबीर यांच्या सोबत बाबासाहेबांची ओळख झाली. आजारपणामुळे बाबासाहेबांना नेहमीच उपचाराकरिता त्यांच्याकडे यावे लागत होते. दरम्यान कालांतराने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि १५ एप्रिल १९४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी रजिस्टर मॅरेज पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह पार पडला आणि शारदा कबीर या सविता आंबेडकर झाल्या. पुढे समाज त्यांना ‘माईसाहेब’ या नावाने ओळखू लागला. घटना निर्मिती मध्ये माईसाहेबांचा वाटा मोलाचा आहे. बाबासाहेब हे सतत व्यस्त असत. त्यांना आपल्या तब्येतीकडे लक्ष देता येत नसे. परंतु माईसाहेब बाबासाहेबांची पूर्ण काळजी घेत असतं. जर माईसाहेबांनी बाबासाहेबांची योग्य रित्या काळजी घेतली नसती तर कदाचित रमाईच्या मृत्यूनंतरचं बाबासाहेबांनी आपल्या कार्यातून विराम घेतला असता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत रमाई नंतर पुढे अधिक जगविण्याचे श्रेय त्यांनी सविता आंबेडकर अर्थात माईसाहेब यांना दिले आहे. त्यामुळे रमाई सोबतच माईसाहेब यांचं देखील बाबासाहेबांच्या जीवन कार्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे.
तरीदेखील बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर माईसाहेबाना अपमान आणि अवहेलनेला समोर जावं लागलं. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढे १९७२ पर्यंत माई दिल्लीतील नेहरोली भागात एकाकी जीवन जगात होत्या. त्यानंतर दलित पॅन्थर च्या चळवळीने जोर धरला तसं राजा ढाले यांनी त्यांना मुंबईत आणलं. दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी माईंचा सन्मान केला, त्यांना आदरानं वागवलं. शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या माई प्रबळ होत्या. पुढे दलित पँथर तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्य व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने माईसाहेब दलित चळवळीच्या मुख्य प्रवाहात येऊ लागल्या होत्या. ‘रिडल्स इन हिंदूझम’ च्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. माईसाहेब या अतिशय हूशार व संवेदनशील होत्या. त्यांचं इंग्रजीवरही प्रभुत्व होतं. हे त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासात कमवलं होत. माईंनी ‘डॉ.आंबेडकरांच्या सहवासात’ हे बाबासाहेबांवर आधारित चरित्रपर पुस्तक लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या प्रति असलेली प्रेमानुभतीचं वर्णन केलेलं आहे. त्याशिवाय हिंदू कोड बिलाच्या मसुद्याकरिता आवश्यक टिपणं आणि पाली शब्दकोशाकरिताही केलेली मदत अशा अनेक बाबी त्यांनी त्यात नमूद केलेल्या आहे. रमाईच्या निधनानंतर माईसाहेबांनी बाबासाहेबांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्यातील एक शेवटचा दुवा म्हणजे माईसाहेब आबेडकर. त्यांचं जीवनही अस्वस्थ आणि थक्क करणारे आहे. माईसाहेब यांच्यावर आजपर्यंत खूप कमी लिहिलं गेलं आहे.
संदर्भ :
१) डॉ.आंबेडकरांच्या सहवासात – डॉ. सविता भीमराव आंबेडकर
२) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत