चित्रपटदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

क्रांतीसुर्य महात्मा ‘फुले’ चित्रपटाला ब्राह्मण्यवादाचे ग्रहण…!


डॉ. आर. डी. शिंदे, नांदेड.
मो. ९४२१३७९१६७
अर्वाचीन भारतातील पहिले सामाजिक प्रबोधन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडून आले. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असतांना आता दुसऱ्या प्रबोधनाची पूर्वचिन्हे दृष्टिक्षेपास येऊ लागली आहेत. येऊ घातलेल्या या दुसऱ्या प्रबोधनाचे स्वरूप अधिक सर्वंकष, व्यापक व मूलगामी राहणार आहे, यात काही शंका नाही. विशेष हे की, आगामी प्रबोधनाची प्रेरणा आपणाला महात्मा जोतीराव फुले यांच्यापासूनच घ्यावी लागणार आहे. कारण जोतीरावांच्या विचारांमध्ये
सर्वस्पर्शी अशा क्रांतीची बीजे दडलेली आहेत, हे आता सर्व मान्य झाले आहे. ज्या धर्मात व धर्मातील समाजात ‘गंगेचे मूळ व ऋषीमुनींचे कुळ’ शोधू नये असा दंडक होता. त्याच धर्मातील विजिगुषवृतीच्या जोतीरावांनी ‘गंगेचे मूळ व ऋषीमुनींचे कुळ’ शोधण्याचा अत्यंत धाडसी प्रयोग केला. जातिव्यवस्थेच्या अनुस्यात असलेली श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची कल्पना नाकारून माणसाकडे केवळ माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी जोतीरावांनी आम्हाला समर्पित केली. पराक्रम, शौर्य, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले गुण जात आणि कर्मावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असतात असा नवोन्मेषी सिद्धांत मांडला. त्यालाच अन्य परिभाषेत ‘सत्यशोधक विचार’ किंवा ‘सत्यशोधक तत्त्वज्ञान’ असे म्हटले जाते.
विसाव्या शतकाच्या मध्यापासून ते आजतागायत विद्वत क्षेत्रात जे काही नाविन्यपूर्ण सिद्धांत मांडले गेले आहेत आणि ज्यांनी संपूर्ण वैचारिक विश्व ढवळून काढले आहे; अशा सर्व सिद्धांत मांडणीतील विचारांची दर्शनचित्रे महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘सत्यशोधक तत्त्वज्ञानात’ सापडतात. विरचनवाद, आधुनिकतावाद, उत्तरआधुनिकतावाद, बहुसंस्कृतीवाद, स्त्रीवाद, व्यक्तीवाद, समुदायवाद इत्यादी प्रमुख सिद्धांत ‘Decentering the centre’ या युक्तीवादावर उभे आहेत, त्या युक्तिवादाचे स्पष्ट प्रतिबिंब ‘सत्यशोधक तत्त्वज्ञानात’ सापडते. पाश्चात्य सिद्धांतकार ज्या विचारधनाचे पेटंट घेऊन जगभर आपली हुकूमत गाजवत आहेत; त्यांनी महात्मा फुले यांचे सत्यशोधक तत्त्वज्ञान वाचले असते तर निःसंदेह त्यांनी ह्या सर्व विचारधनाचे श्रेय महात्मा फुले यांनाच दिले असते. परंतु दुर्दैवाची बाब अशी की, वर्गीय जाणीवा प्रबळ असलेल्या आपल्या देशातील ब्राह्मण्यवादाच्या प्रवर्तकांनी महात्मा फुले यांच्या विचारकार्याची नेहमीच अवहेलना केली. त्यात लोकमान्य टिळक, निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकरापासून ते अगदी अलीकडच्या बाळ गांगल, ग. त्र्यं. माडखोलकर, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे, आनंद दवे यांच्यापर्यंतच्या प्रवर्तकांचा समावेश होतो. निबंधमालाकार चिपळूणकरांनी ‘त्यांस पूरते व्याकरणाचे व शुद्ध लिहिण्याचेही ज्ञान नाही. ते विद्यावैरी व ज्ञानशत्रू होते’ अशा शब्दांत महात्मा फुले यांच्या विचार कार्याची भलावण केली तर बाळ गांगल व संभाजी भिडे यांनी “हा कसला महात्मा ? फुले म्हणविणारी ही केवळ दुर्गंधी”, “जोतीराव फुले हा माणूस अव्वल दर्जाचा स्वधर्मद्रोही तर होताच पण त्याच दर्जाचा देशद्रोहीही होता” अशा हीन शब्दांत महात्मा फुले यांचा उपहास केला. ब्राह्मण्यवादाच्या अशा अनुदार भूमिकेमुळेच महात्मा फुले यांच्या जीवितकार्याचा प्रवास खऱ्या अर्थाने जगासमोर तर सोडाच परंतु देशातील सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा येऊ शकला नाही.
मूलतः ब्राह्मण्यवाद ही एक फॅसिझमची भारतीय आवृत्ती आहे. दैववाद, वंशश्रेष्ठत्व, जातिभेद, विशेषाधिकार रुढीप्रियता, हे ब्राह्मण्यवादाचे मूलतत्त्वे आणि सामाजिक विषमता, जुलूमशाही व शोषण ही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ब्राह्मण्यवादाच्या प्रवर्तकांना शूद्र कुळातील जोतीरावांचे मोठेपण कधीच मान्य होत नाही. विशेष हे की, महात्मा जोतीराव फुले यांची उभी हयात ब्राह्मण्यवादाच्या विरोधी लढण्यात खर्ची पडल्यामुळे ब्राह्मण्यवाद तात्यासाहेब महात्मा फुले यांचा नेहमीच उपहास करतो. वर्तमानात येऊ घातलेल्या अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या हिंदी भाषिक चित्रपटाला विरोध करण्याचे कारणही ब्राह्मण्यवादाच्या वर्चस्ववादी मानसिकतेत दडले असल्याचे सूचित होते. धार्मिकतेच्या बुरख्याआड लपलेला ब्राह्मण्यवादाचा कुरूपप्रधान चेहरा जगासमोर येऊ नये म्हणून हिंदू महासभा व ब्राह्मण महासंघ अशा ब्राह्मण्यग्रस्त संघटनांनी सेन्सॉर बोर्डाकडे ‘फुले’ चित्रपटातील काही दृश्य आणि संवादामध्ये अफलातून बदल सुचविले आहेत. उदाहरणार्थ पेशवाई ऐवजी राजेशाही, जात ऐवजी वर्ण असा शब्दप्रयोग असा शब्दप्रयोग करण्यात यावा, जातीव्यवस्थेवर आधारित असलेल्या व्हाईसओव्हरचा भाग हटवावा, तीन हजार वर्षांपूर्वीची गुलामी या संवादात अनेक वर्षांपासून चालत आलेली गुलामी, मांगा-महारांनी कमरेला झाडू बांधून चालावे या संवादात मांगा-महारांनी दुरी ठेवून वागावे असा बदल करावा. तसेच शेंडी-जाणवे हे ब्राह्मणांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे चित्रपटातील सावित्रीबाई फुले यांच्यावर शेंडी व जाणवेधारी ब्राह्मण बटू चिखल फेकत असल्याचे दृश्य वगळावे कारण हे दृश्य जातीय द्वेषाकडे नेणारे आहे. याउलट शाळा घेताना एखादा ब्राह्मण मुलगा सावित्रीबाईंना मदत करत असल्याचे दृश्य दाखवावे, असे अतार्किक व अनैतिहासिक बदल सुचविण्यात आले आहेत. इतिहासाचा विपर्यास झाला तरी हरकत नाही. परंतु ब्राह्मण्यवादाला अनुकूल असाच इतिहास दाखविला पाहिजे असा या संघटनांचा अट्टाहास आहे. विशेष हे की, हे दृश्य-संवाद बदलले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या संघटनांनी दिल्यामुळे अगोदरच ब्राह्मण्यग्रस्त असलेल्या सेन्सॉर बोर्डाने त्याची त्वरित दखल घेत अधिक्षेपी दृश्य-संवाद बॅन केले. आणखी एक नोंद घेणासारखी बाब अशी की, या सर्व प्रक्रियेत ब्राह्मण महासंघाची महिला कार्यकर्ती जन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या परशुरामाचा जयघोष करीत अग्रेसर होती. स्त्रीजातीत जन्मलेल्या महिला कार्यकर्तीने समस्त ‘स्त्रीजातीचा उद्धारकर्ता’ असलेल्या महात्मा फुले यांच्याविषयी कृतघ्नपणा दाखवून संपूर्ण जगाला स्वत्वातील प्रतिगामीत्वाचा परिचय करून दिला आहे.
मूलतः कोणतीही सामाजिक व्यवस्था ही त्या समाजव्यवस्थेतील लोकांनी स्वीकारलेल्या सांस्कृतिक मूल्यांवर अधिष्ठित असते. त्यामुळे संबंधित समाज व्यवस्थेचा कणा असलेल्या सांस्कृतिक मूल्यांची मीमांसा केल्याशिवाय तिचे यथार्थ आकलन होत नाही. कारण कोणत्याही समाजव्यवस्थेने स्वीकारलेले ‘सांस्कृतिक मूल्य’ हे त्या समाजघटकाची मानसिकताच व्यक्त करीत असते. किंबहुना एखादा विशिष्ट हेतू दृष्टीसमोर ठेवूनच त्याची निर्मिती व स्वीकृती केली जाते. त्यामुळे त्या मागचे संदर्भ दुर्लक्षित करता येत नाहीत. हिंदू समाजव्यवस्थेमध्ये जातिभेदाचे व वंशश्रेष्ठत्वाचे तत्त्वज्ञान आहे. हेतूतः त्यात ब्राह्मणांचे दैवतीकरण आणि शूद्रांचे
अमानवीकरण केलेले आहे. जगात आम्हीच श्रेष्ठ आहोत; आमच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही कारण आम्ही देवाने निवडलेले लोक आहोत (We are the choosen people of God). त्यामुळे आम्ही कधीच चूक करू शकत नाही. म्हणून सर्वांनी आमच्या अंकित रहावे. जगावर राज्य करण्याचा केवळ आमचाच अधिकार आहे, या ब्राह्मणी संस्कृतिक वर्चस्वाचा प्रथमच महात्मा फुले यांनी वृत्तिछेद केला आणि त्याठिकाणी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता अशा नवीन ‘मानवी मूल्यां’ची क्रमाने पुनर्स्थापना (Restoration) करून भारतातील अनेक मूल्य विचार आणि संस्थांचे संस्थीकरण केले. जोतीरावांचे हे परिवर्तनवादी कार्य म्हणजे भारतीय इतिहासातील क्रांतीची मुहूर्तमेढ होती. विशेष हे की, ही मुहूर्तमेढ एका शूद्र कुळातील ब्राह्मणेतरांनी रोवली हेच एक ब्राह्मण्यवादाचे मोठे दुखणे आहे. म्हणूनच तो महात्मा फुले यांच्या विचारकार्यात सतत अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत असतो. धार्मिकतेने परंपरावादी, सामाजिकतेने विषमतावादी आणि राजकीयतेने वंशश्रेष्ठत्ववादी भारतीय समाजात बदल घडवून आणावयाचा असेल तर ते काम नि:संशय पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या ‘स्त्री’ शिक्षणावाचून शक्य नाही, अशी जोतीरावांची धारणा बनली आणि त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी या देशात पहिली मुलींची शाळा काढली. तथापि ब्राह्मण्यवादाच्या अघोरी दंडनीतीमुळे शाळेत अध्यापनाचे काम करण्यास कोणाचेच धैर्य होत नव्हते. तेव्हा जोतीरावांनी स्वतःच्या पत्नीला घरी शिक्षण देऊन सुशिक्षित बनविले. सुशिक्षित सावित्रीआईंनी पुढे जोतीरावांच्या शाळेतील शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेचे ( Headmistress) काम अतिशय समर्थपणे सांभाळले. त्यामुळे भारतातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा मान सावित्रीआई फुले यांच्याच नावे जमा होतो. जोतीरावांचे समाजकार्य केवळ स्त्री शिक्षणावरच थांबले नाही, पुढे त्यांनी १८५१ ते १८५२ या दोन वर्षाच्या कालखंडात स्त्रियांबरोबरच अस्पृश्य, मजूर, शेतकरी या सर्वांसाठी पुणे तथा पुण्याच्या आसपास क्षेत्रात एकूण १८ पाठशाला काढून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केले अशी तत्कालीन मुंबई सरकारच्या अभिलेखामध्ये नोंद आहे. जोतीराव फुले यांच्या अगोदर या देशात स्त्रीशुद्रातिद्रांसाठी शाळा असल्याची कुठेच नोंद सापडत नाही. जोतीरावांनी काढलेल्या शाळेतील मुलींना शिकविण्यासाठी सावित्रीआईंनी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेले पहिले पाऊल हीच खऱ्या अर्थाने आधुनिक भारतीय स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती. तत्पूर्वी जन्मतत्वाने उच्चवर्णीय असलेल्या ब्राह्मण स्त्रियांना देखील भारतात शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. एकंदर भारतातील सर्व वर्णातील स्त्रियांचे स्थान अतिशूद्रात होते. महात्मा फुले यांनी देशात प्रथमच सार्वजनिक जीवनात स्त्रियांची संघटित किंवा सामुदायिक भागीदारी निर्माण करण्याचे महान कार्य केले. म्हणूनच जोतीराव गोविंदराव फुले यांना आधुनिक भारतीय स्त्रीवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. जोतीरावांनी हाती घेतलेल्या स्त्रीशुद्रातिशूद्रांच्या क्रांतिकारी कार्याने प्रभावित होऊन तत्कालीन मुंबई सरकारने पुणे येथील विश्रामबागेत दिनांक १६ नोव्हेंबर १८५२ रोजी गव्हर्नर यांच्या हस्ते महावस्त्रे देऊन जोतीरावांचा सपत्नीक सार्वजनिक सत्कार केला. ब्रह्मवृंदाव्यतिरिक्त शूद्र कुळातील ‘फुले’ दाम्पत्याचा देशातील कदाचित हा पहिलाच सत्कार सोहळा होता. या अगोदर शिक्षा आणि दक्षिणा ही एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती. ती परंपरा जोतीरावांनी याठिकाणी खंडित केली. जोतीरावांचा सार्वजनिक ठिकाणी सन्मान घडून आला. त्यावेळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे दहा वर्षांचे होते. प्रतिगाम्यांचे शंकराचार्य म्हणून लौकिकास आलेले विष्णुशास्त्री चिपळूणकर हे दोन वर्षांचे होते. परिवर्तनवादी चळवळीचे कैवारी गोपाळ गणेश आगरकर, स्त्री विद्यापीठाचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई आणि महात्मा गांधी यांचा जन्म ही झाला नव्हता. जोतीरावांच्या क्रांतीतत्त्वाने ब्राह्मण्यवादाला आता चांगलाच धरणीकंप सुटला होता.
जोतीरावांचे शैक्षणिक क्षेत्रातील हे काम असेच चालू राहिले तर भविष्यात ज्ञान क्षेत्रातील ब्राह्मणांचे वर्चस्व संपुष्टात येईल, या भीतीने ब्राह्मण्यवादाने जोतीरावांच्या क्रांतिकारी कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न चालविला. वडील गोविंदराव यांचेवर सामाजिक आणि धार्मिक दडपण आणले. जातीला बहिष्कृत करण्यास भाग पाडले तरीही जोतीराव आपल्या कार्यसिद्धीपासून मागे हटले नाहीत. दस्तूरखुद्द जोतीरावांनी त्या काळाचे वर्णन करताना म्हटले आहे, कनिष्ठ वर्गातील मुलांना शिकवल्यामुळे मी माझ्या ज्ञाती बंधूंच्या तिरस्कारास पात्र झालो. माझ्या वडिलांनी मला घराबाहेर काढले आणि मी कुठेही संसार चालवावा असे सांगितले. साहजिकच शाळा बंद पडली आणि उदरनिर्वाहासाठी मला उद्योग धंदा करावा लागला. तथापि आर्थिक परिस्थिती सुधारताच त्यांनी नव्या उमेदीने क्रांतीकारी कार्याला सुरुवात केली. शिक्षण हे ज्ञानाचे (वैभववाचे) संचित आहे. त्यामुळे अशा संचित ज्ञानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून जोतीरावांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग व शिष्यवृत्तीची योजना सुरू केली. जोतीरावांनी काढलेल्या बोर्डिंग मध्ये मुंबई, ठाणे, जुन्नर वगैरे बाहेर गावचे २५ ते ३० विद्यार्थी असत. त्यातून श्रीमंताची मुले खर्च देत असत व गरिबांच्या मुलांना मोफत ठेवीत असत. बोर्डिंगमधील सुमारे १५ विद्यार्थी मोफत ठेवलेले असत व त्यांचा सर्व खर्च तात्या आपले घरून लावीत असत, असे जोतीरावांचे समकालीन सहकारी गोविंद गणपत काळे यांनी त्यांच्या विषयी आठवणी सांगितल्या आहेत. याहीपुढे जाऊन त्यांनी शिक्षणासारखे पवित्र खाते सरकारी आखत्यारीत असले पाहिजे व सरकारने सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीने दिले पाहिजे अशी सन १८८२ साली हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. पुणे येथे ग्रंथ प्रेमींसाठी नेटिव्ह लायब्ररी सुरू केली. हे ग्रंथालय देशातील पहिलेच ग्रंथालय ठरले. देशातील ग्रंथालय चळवळीचे ते प्रणेते ठरले.
विशेष हे की, जोतीरावांनी समाजक्रांतीच्या या ऐतिहासिक कार्याला हात घातला तेव्हा त्यांच्या सहधर्मचारिणी सावित्रीआई फुले यांची त्यांना समर्थ साथ लाभली. एका हिंदू स्त्रीने सर्व प्रकारची धार्मिक बंधने तोडून स्वतःला समाजकार्यात झोकून देणे ही गोष्टच त्याकाळी ब्राह्मण्यवादाला अपवित्र वाटली म्हणून त्यांनी सावित्रीआईंच्या अंगावर दगडगोटे, चिखल-शेण मातीचा मारा केला. अर्वाच्च व अश्लाघ्य भाषेत त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. यासंदर्भात फुले समकालीन बळवंत राजाराम कोल्हे यांच्या आठवणी म्हणजे ब्राह्मण्यवादाने फुले दाम्पत्यांचा कसा छळवाद माडला होता, यासंबंधीचा एक सज्जड ऐतिहासिक पुरावाच आहे.
आपल्या शैक्षणिक कार्यात अडथळे आणणाऱ्या टोळभैरवांना उद्देशून सावित्रीआई म्हणत असत की, मी माझ्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करीत असता तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात, ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो ! हा सगळा उपद्व्याप करूनही फुले दाम्पत्य थांबत नाहीत हे लक्षात आल्यावर ब्राह्मण्यवादाने त्यांना स्वजनद्रोही, धर्मद्रोही व राष्ट्रद्रोही ठरविले. सुडाने पेटलेल्या काही धर्ममार्तंडांनी १८५६ साली रामोशी रोडे आणि धोंडीराम कुंभार या बहुजन समाजातील दोन अज्ञातांची धर्ममिषानें मने कलुषित करून त्यांना जोतीरावांच्या हत्येची सुपारी दिली. परंतु जोतीरावांचे प्रत्यक्ष समाजकार्य पाहून त्यांना पश्चात बुद्धी झाली आणि ते जोतीरावांचे शिष्य बनले. रामोशी रोडे हा जोतीरावांचा अंगरक्षक बनला. जोतीरावांच्या सानिध्यात राहून शिक्षित बनल्यावर त्याने स्वरचित गीतातून जोतीरावांच्या महात्म्येपणाची कवने रचली. धोंडीराम कुंभार हा प्रतिभा संपन्न पंडित बनला. सातारा जिल्ह्यातील गोंदवले मुक्कामी दिनांक १२ फेब्रुवारी १८८४ साली शृंगेरी येथील धार्मिक विवादात सहभाग घेऊन धोंडीरामाने शंकराचार्यांना निरुत्तर केले. त्यामुळे शंकराचार्यांनी धोंडीरामाला धर्मक्षेत्रातील पंडितराव हा किताब बहाल केला. पंडित धोंडीरामाच्या नावावर ‘वेदाचार’ नावाचा एक ग्रंथ उपलब्ध आहे. गुलामगिरी ग्रंथातील धोंडीबा बहुदा याच धोंडीरामाला डोळ्यासमोर ठेवून जोतीरावांनी चित्रित केला असावा…!
महात्मा फुले यांच्या काळी महाराष्ट्रात पेशवाई अस्तित्वात होती आणि पेशवाई हे एक प्रकारे धर्मराज्यच होते. त्यामुळे ब्राह्मणी वर्गाने पेशवाईत स्वजाती हितसंबंधाचा अतिचार निर्माण केला होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी Caste Ascendency मध्ये पेशवाई राजवटीचे वर्णन लिहून ठेवले आहे. ते म्हणतात, ब्राह्मणांना पेशवाईत असे वाटू लागले की, आता आपणच खरेखुरे राजे आहोत. ब्राह्मणांना स्वतंत्र सवलती भोगावयास मिळू लागल्या. त्यांना अनेक बाबतीत इतरांना लागू असलेल्या कायद्यांची बंधने लागेनाशी झाली. इतमामास भरपूर योग्य असा पगार मिळे. त्यांच्या आयात-निर्यातीच्या बाबतीत जकात माफ होत असे. ब्राह्मणांच्या जमिनीवर अन्य जातीपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी कर होता. ब्राह्मण वगळता अन्य जातींच्या कर वसुलीच्या पद्धती अत्यंत बिभत्स होत्या. आणखी असे की, सरकार दरबारी ब्राह्मणांना फार मोठा दानधर्म सरकारी खजिन्यातून मिळत असे. त्यामुळे पुणे शहर हे ब्राह्मण भिकाऱ्यांचे मोठे जंगी केंद्र बनले. तीस ते चाळीस हजार ब्राह्मण ओळीने कित्येक दिवस पक्वान्नांची भोजने झोडीत असत. या व अशा प्रकारच्या गोष्टीमुळे पेशवाईत ब्राह्मणशाहीचे वर्चस्व पराकाष्ठेस पोचले होते. पेशवाई बद्दल सर्वसामान्य लोकांच्या भावना अतिशय भयप्रद व कष्टप्रद अशाच होत्या, याचा प्रत्यक्ष प्रत्ययकारी अनुभव दस्तुरखुद्द जोतीरावांना ही आला होता. सन १८४८ साली ब्राह्मण मित्र परांजपे यांच्या लग्नविधी सोहळ्यातून ब्रह्मवृंदांनी जोतीरावांना जातीवरून अपमानित करून हाकलून दिले होते. धर्मशास्त्रानुसार स्पर्श कुलीन जोतीरावांची पेशवाईत अशी अवस्था होती तर अस्पृश्य कुलिनांची अवस्था किती विदारक असेल याची कल्पनाही करवत नाही. पेशवाईत अस्पृश्यांच्या सावलीचा व थुंकीचाही विटाळ भट ब्राह्मणांना होत असे. त्यामुळे अस्पृश्यांना सकाळी नऊ वाजेपर्यंत व सायंकाळी तीन वाजेनंतर शहरात फिरण्यास बंदी होती. शहरात फिरताना त्यांना थुंकण्यासाठी गळ्यात मडके बांधावे लागे. सार्वजनिक शाळा, पाणवठे व मंदिरातही त्यांना प्रवेश करण्यास मनाई होती. त्यांची वसाहत गावकुसाबाहेर ठेवली जाई. उच्चवर्णीयांची वेठबिगार वाहून व त्यांची सेवा चाकरी करूनच त्यांना उदरनिर्वाह करावा लागत असे. गावची सर्व हलकी व गलिच्छ स्वरूपाची कामे त्यांना करावी लागत. अज्ञान, उपासमारी व मागासलेपण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. त्यांच्या पावलावर पाय पडल्यावरही विटाळ होतो अशी समजूत होती. त्यामुळे आपल्या पावलांचे ठसे मोडून टाकण्यासाठी अस्पृश्यांना कमरेला वृक्षाची फांदी बांधून शहरात फिरावे लागत असे. विशेष हे की, ब्रिटिशांच्या आगमनामुळे सुद्धा सामाजिक सुधारणेत फारसा फरक पडला नव्हता.
जोतीरावांच्या काळी ‘हिंदू कुटुंबसंस्था’ हा एक फार मोठा सामाजिक प्रश्न चर्चेचा विषय बनला होता. कारण त्याकाळी हिंदू कुटुंब संस्थेत बालविवाह, बहुपत्नीत्व, सतीप्रथा आणि तथाकथित खानदानी जातीतील विधवा पुनर्विवाहास बंदी वगैरे अमानुष चालीरीतींमुळे स्त्रियांचे भावविश्व पूर्णतः अंधकाराच्या खाईत लोटले गेले होते. त्यातून त्यांना बाहेर काढणे व त्यांचे जीवनमान प्रकाशित करणे जरुरीचे होते. म्हणून महात्मा फुले यांनी मोठ्या धैर्याने ८ मार्च १८६० रोजी पुण्यातील गोखले बागेत शेणवी जातीत एका विधवेचा त्याच जातीतील एका विधुर पुरुषाशी विधवा पुनर्विवाह घडवून आणला. पुरुषसत्ताक संस्कृतीच्या वर्चस्वामुळे अनेक वेळा स्त्री आणि विधवांना पुरुषांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते, या वस्तुस्थितीकडे आजही डोळेझाक करता येत नाही. लैंगिक अत्याचारामुळे स्त्रियांच्या प्रमुख दोन मूलभूत हक्कांचे सर्रास उल्लंघन होते ते म्हणजे समानतेचा हक्क व जीवन जगण्याचा हक्क असे स्त्रीवादी लेखिका केट मिलेट म्हणते. अत्याचार केवळ कामवासनेसाठीची कृती नसते, तर आक्रमण, द्वेष, अवमान आणि स्त्रीचे व्यक्तिमत्व संपवणारी कृती असते. अशा दुष्टचक्रातून स्त्रियांची सुटका करण्यासाठी व तिला सुरक्षितता मिळवून देण्यासाठी जोतीरावांनी सन १८६३ मध्ये स्वतःच्या घरी ३९५, गंजपेठ पुणे येथे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या विधवा स्त्रियांनी गुप्त आणि सुरक्षितपणे बाळांत व्हावे असा मजकूर छापलेली भीतीपत्रके जोतीरावांनी पुणे शहरात गल्लीबोळातील रस्त्यावर आणि घराघरावर लावली. संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या जोतीरावांनी अशा रीतीने आपली संपूर्ण शक्ती स्त्रियांच्या पाठीमागे उभी केल्यामुळेच अत्याचार ग्रस्त स्त्रिया निर्भय बनून जोतीरावांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात चालत आल्या. त्यात एकूण ३५ बायका प्रसूत झाल्या. स्वतः सावित्रीआईंनी या ३५ नवजात अर्भकाच्या नाळी तोडल्या. विशेष हे की, फुले दाम्पत्यांना स्वतःचे अपत्य नव्हते. त्यामुळे त्याकाळी रक्ताचा वंश तयार करण्यासाठी म्हणून दुसरे लग्न करण्याचा प्रघात होता. परंतु जोतीरावांनी असे न करता सन १८७३ साली काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्माला आलेला यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला. त्याला शिकवून डॉक्टर केले. पुढे त्याने सैन्यात जाऊन देशसेवा केली. जोतीरावांचे समाजावर केवढे हे थोर उपकार…!
विधवांचे केशवपन ही त्याकाळी स्त्रीचे स्त्रीत्व नाकारणारी आणखी एक प्रथा होती. ती प्रथा बंद पाडण्यासाठी जोतीरावांनी त्याकाळी न्हाव्यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार दिनांक १४ एप्रिल १८९० साली मुंबई येथे न्हावी समाजाची एक मोठी सभा भरली त्यात त्यांनी केशवपणाचे अमानुष कृत्य करण्याचे नाकारले. बहुपत्नीत्व व सतीप्रथेलाही त्यांनी कडाडून विरोध केला. ‘स्त्रियांचें ते पुरुषांचें आणि पुरुषांचें ते हुं हुं’, अशा कठोर शब्दांत त्यांनी एका अखंडात पुरुषसत्ताक संस्कृतीचा समाचार घेतला आहे. ज्या काळी वैधव्याचे दर्शन निषिद्ध मानले जात होते, अशा कर्मठकाळी जोतीरावांनी स्त्रियांच्या प्रश्नाला हात घालून संपूर्ण जगाला मानवतेचे दर्शन दिले. सामाजिक परिवर्तने ही योगायोगाने घडून येत नसतात, ती कृतिशील आणि करारी लोकांच्या निर्धारातून जन्माला येतात. महात्मा फुले हे मार्टिन ल्युथर किंग प्रमाणेच ‘क्रुसेडर’ होते. ते अभाव आणि विनाश यांच्या विरोधात आयुष्यभर निकराने लढले. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि शिक्षण ही जोतीरावांच्या क्रांती तत्त्वाची शस्त्रे होती. याच शस्त्र सामर्थ्याच्या जोरावर पुढे छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामसामी पेरियार सारख्या असंख्य मानवतावाद्यांनी देशात लोकक्रांतीचा (लोकशाही) पाया घातला हे वास्तव सत्य आहे मात्र असत्य डोक्यात शिरलेला घमेंडी ब्राह्मण्यवाद हे वास्तव सत्य कधीच मान्य करीत नाही. तो बहुजन समाजातील महापुरुषांच्या विरोधात सतत कंड्या पिकवित असतो. प्रसंगपरत्वे याकामी तो कृत्रिमी जात्याभिमानी क्षत्रियांचा अतिशय खुबीने वापर करून घेत असतो. छत्रपती शिवरायांचे वंशज स्वयंघोषित राजे श्रीमान उदय भोसले यांनी ‘फुले’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला भारतात पहिली मुलींची शाळा महात्मा फुलेंनी काढली नसून ती आमचे पूर्वज श्री प्रतापसिंह महाराज छत्रपती यांनी काढली. महात्मा फुले यांनी केवळ त्यांचे अनुकरण केले, असे जे विधान केले आहे ते ब्राह्मण्यवादाचेच द्योतक आहे. त्याला इतिहासात कुठेच आधार नाही. दस्तूरखुद्द शाहू महाराजांनी पेशवाईतील छत्रपती घराण्याची शिक्षणाची आबाळ सांगताना म्हटले आहे, श्री प्रतापसिंह महाराज छत्रपती (सातारा) हे पेशव्यांचे ताब्यात असताना लहानपणी लिहिणे- वाचणे शिकण्याची ही त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांच्या पूज्य धोरणी आईने त्यांस रात्री बारा वाजता उठवून ब्राह्मणेतर पंतोजीकडून लिहिणे-वाचणे शिकविण्याचे काम केले. पेशवाईत छत्रपतींची ही अवस्था तर इतरांची काय असेल … (पानसरे गोविंद, राजर्षी शाहू: वसा आणि वारसा, पृ.१८)
ब्राह्मण्यवाद सत्तेच्या मिषानें बहुजन समाजाची नेहमीच दिशाभूल करीत असतो. समाजसुधारक मलबारी यांच्या टिपणावर दिलेल्या अभिप्रायात महात्मा जोतीराव फुले यांनी या संदर्भात स्पष्टपणे अभिप्राय नोंदविला आहे. “But the education should not be through the medium of Brahmin teachers, for, while education, they create in the minds of the pupils wrong religus ideas and lead them astray. फुले यांचा हा अभिप्राय अगदी वस्तुनिष्ठ तर आहेच पण तो त्यांच्या काळा इतकाच आजही ताजा आहे हे श्रीमान उदय भोसले यांच्या वर्तनशैलीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ज्या महात्मा फुले यांनी १८६९ साली रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला. पुण्यात येऊन देशातील पहिली शिवजयंती साजरी केली. शिवरायांच्या जीवनावरील ९०८ ओळींचा आधुनिक काळातील पहिला पोवाडा लिहिला. त्यात, ‘मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा पोवाडा गातो शिवाजीचा’ अशी मांडणी केली व जिजामाता याच कशा शिवाजी राजाच्या गुरू आहेत हे ऐतिहासिक सत्य मोठ्या धैर्याने जगासमोर आणले आणि शिवाजी राजाची ब्राह्मण्यवादाच्या स्थानबद्धतेतून सुटका केली. त्या राजाच्या वंशजाने महात्मा फुले यांचे ऐतिहासिक कार्य नाकारणे हीच एक फार मोठी शोकांतिका आहे. ज्या धार्मिक गोष्टी बहुजनांचा अपमान करणाऱ्या असतात, त्यांची आणि त्यांच्या महान पूर्वजांची विटंबना करणाऱ्या असतात, त्या गोष्टींचा बहुजनांच्या मुलांनी अभिमान बाळगावा अशा पद्धतीचे संस्कार करणे हा ब्राह्मण्यवादाचा पूर्वसुरी स्वभाव धर्म आहे. त्यामुळेच महात्मा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शिक्षणव्यवस्थेतील ब्राह्मण्यवादाच्या वर्चस्वाला विरोध दर्शविला होता. परंतु खेदाची बाब अशी की, देशातील शिक्षणव्यवस्थेवर आजही ब्राह्मण्यवादाचेच वर्चस्व आहे. ब्राह्मण्यवाद स्वजातीचे उदात्तीकरण व परजातीचे अवमूल्यन करण्यात नेहमीच पुढे असतो. या संदर्भात गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता ? या पुस्तकात आचार्य अत्रे यांच्या मिश्कील टिप्पणीचे अतिशय मार्मिक शब्दांत विश्लेषण केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रचार करताना आचार्य अत्रे तेव्हा म्हणायचे की, “महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतरांना फक्त भूगोल आहे. या वाक्याला हमखास प्रचंड टाळ्या पडायच्या, पण हा अतिरेक झाला. महाराष्ट्राला शिवाजी प्रिय आहे, शिवाजीचा इतिहास आहे, तसा कर्नाटकाला राणी चेन्नम्माचा इतिहास नाही काय ? राजस्थानला राणा प्रतापाचा इतिहास नाही काय ? मध्य प्रदेश आणि गुजरात ही राज्ये काय काल अचानक जन्माला आली ? प्रचाराच्या भरात तारतम्य सुटले. संयुक्त महाराष्ट्र झाला आणि शिवाजी जो महाराष्ट्राच्या बाहेर होता त्याला आपण महाराष्ट्रात कोंडला. फक्त महाराष्ट्राचा केला. आता संयुक्त महाराष्ट्रात काय सुरू आहे ? शिवसेना स्थापली. पतित पावन संघटना आली. मराठा महासंघ आला. शिवाजी जो देशाचा होता, देशातील सर्व हिंदूंचा होता. तो महाराष्ट्राचा झाला. आता तो केवळ मराठ्यांचा झाला आहे.” जे छत्रपती शिवाजी राजाचे तेच महात्मा फुले यांचे करण्यात ब्राह्मण्यवादाने कुठेच कसूर सोडली नाही. तथापि महात्मा फुले यांच्या काळातील सगळेच ब्राह्मण काही प्रतिगामी नव्हते, त्यातील काही सुधारल्या विचारांचे ही होते. म्हणूनच महात्मा फुले आयुष्यात काहीतरी करू शकले असा एक सुर सतत ब्राह्मण्यवादाकडून आवळला जातो. परंतु त्यात काही तथ्य असल्याचे आढळून येत नाही. ब्राह्मण्यवादाकडून ज्या काही सुधारल्या ब्राह्मणांचे उदाहरण दिले जाते, त्यांच्या जीवितकार्याचा प्रवास हा फार तर प्रबोधनापासून (Renaissance) ते सुधारणावादापर्यंतच (Reformation) झालेला दिसून येतो. सुधारणावादाच्या पलीकडे क्रांतीपर्यंत (Revolution) त्यांना काही जाता आले नाही. यासंदर्भातील पुढील दोन उदाहरणे अतिशय बोलके आहेत. ओतूरचे वतनदार ग्रामजोशी वामन जगन्नाथ व शंकर बापूजी यांनी १८८४ मध्ये बाळाजी कुसाजी डुंबरे पाटील यांच्या विरुद्ध नुकसान भरपाईची जुन्नरच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. कारण त्यांनी स्वतःच्या मुलाचा विवाह ब्राह्मण पुरोहिताशिवाय सत्यशोधक पद्धतीने लावला होता. या फिर्यादीवर निकाल देताना जुन्नरच्या न्यायालयाने पाटलाच्या विरुद्ध निकाल देत स्पष्टीकरण दिले की, सत्यशोधक समाजातर्फे लावलेले लग्न हे बेकायदेशीर आहे, तो ब्राह्मण पुरोहिताचाच खास हक्क आहे, म्हणून विरोधी पक्षाने नुकसान भरपाई दिली पाहिजे. विशेष हे की, त्यावेळी जुन्नर न्यायालयाचे न्यायाधीश हे सामाजिक सुधारणा व सामाजिक परिवर्तनाचा टेंभा मिरविणारे महादेव गोविंद रानडे होते. लोकहितवादी हे मनाने सुधारक असूनही शरीराने प्रतिगामीच राहिले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना काही कामाकरिता विलायतेला जाण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी जातीय बहिष्काराच्या भितीने ब्रिटिश सरकारला नकार दिला. जे रानडे, आगरकरांचे तेच आजकालच्या (अपवाद वगळता) ब्राह्मण्यवादाच्या प्रवर्तकांचे आहे. याउलट महात्मा जोतीराव फुले यांचे होते. त्यामुळेच त्यांच्या जीवितकार्याचा प्रवास हा सुधारणावादापासून (Reformation) ते बंडखोरीपर्यंत (Rebellion) आणि बंडखोरीपासून ते क्रांतीपर्यंत (Revolution) होऊ शकला, याविधानाला पुष्टी देणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. भारतासारख्या अनेकजिनसी समाजात जातीयतेची भिंत नष्ट केल्याशिवाय राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होणे शक्य नाही, या शुद्ध हेतूने महात्मा फुले यांनी आपले वेताळ पेठेतील राहते घर गंजपेठेतील महार वस्तीत हलविले आणि तेथे वास्तव्य केले. याहीपुढे जाऊन त्यांनी ब्राह्मणेतर समाजाच्या मनातून जातीयतेचे व अस्पृश्यतेचे भूत पळवून लावण्यासाठी सत्यशोधक विवाह सोहळ्यात वधूच्या गावातील महारणीने वराला प्रथम आरतीने ओवाळण्याचा नियम केला. पुढे त्यांनी, जो दास फक्त आपल्या उत्पन्नकर्त्यास मानून नीतीस अनुसरून स्वच्छ उद्योग करण्याचा निश्चय करून त्याप्रमाणे आचरण करीत आहे, अशी त्याजविषयी माझी खात्री झाल्याबरोबर, मी त्यास केवळ आपल्या कुटुंबातील बांधवाप्रमाणे समजून त्यांजबरोबर अन्न व्यवहार करीन, मग तो कोणत्याही जातीतील वा धर्मातील असो अशा आशयाचे मजकूर असलेले पत्रक काढून ते प्रसिद्धीस दिले. परंतु हे पत्रक अप्रायोजक व ब्राह्मण निंदेचे आहे म्हणून त्या काळातील एकाही हिंदू पत्राने छापले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव जोतीरावांनी हे पत्रक कोल्हापूर येथील ‘शुभ वर्तमानदर्शक व चर्चसंबंधी नानाविध संग्रह’ या पत्रकांकडून छापून घेतले व सत्यशोधक चळवळ गतिमान केली. महात्मा फुले हे केवळ बोलघेवडे सुधारक नव्हते तर ते कृतिशील सुधारक होते. आपल्या विचाराला कृतीचे अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी काशीबाई या ब्राह्मण विधवेपासून दत्तक घेतलेल्या यशवंत नावाच्या आपल्या दत्तक पुत्राचा दिनांक ४ फेब्रुवारी १८८९ साली आंतरजातीय विवाह घडवून आणला. महात्मा फुले यांनी घडवून आणलेला हा विवाह या देशातील पहिलाच आंतरजातीय विवाह ठरला. जातिभेद निर्मूलन करून एकमय लोक घडविण्यात जोतीरावांचे अंत:करण किती प्रामाणिक प्रयत्नशील होते, हे यावरून स्पष्ट होते. सन १८७७ च्या दुष्काळात जोतीराव फुले यांनी सातारा जिल्ह्यातील धनकवडी येथे सर्व जाती धर्माच्या अबालवृद्धांसाठी ‘राणी व्हिक्टोरिया’ नावाने अन्नछत्र उघडले. या अन्नछत्रात सावित्रीआई फुले काही मदतनीस स्त्रियांना हाती घेऊन दररोज दोन हजार भाकरी करीत असत व त्या तेथेच भुकेकंगाल आबालवृद्धांना खाऊ घालत असतं. फुले दाम्पत्याच्या या परोपकारी कार्यामुळे दुष्काळात हजारो दीनांचे प्राण वाचले.
२ मार्च १८८८ रोजी हरी रावजी चिपळूणकर यांनी ब्रिटिश राजपुत्र ड्युक ऑफ कॅनॉट यांच्या आगमनाप्रित्यर्थ पुणे येथे एक मोठी मेजवानी दिली. सांप्रत काळातील बडी हस्ती या नात्याने जोतीरावांना या मेजवानीचे आमंत्रण होते, ते त्या मेजवानीस गरीब अशा साध्या शेतकरी वेशात गेले आणि तिथे सरकार म्हणून मुलाहिजा न ठेवता केलेल्या भाषणात, भरजरी कपडे नि मौल्यवान अलंकारांनी मडलेले हे लोक पाहून तुम्हांस हिंदुस्तान देश मोठा सुखी नि समाधानी असल्याचा भास होईल परंतु हे सर्व खोटे आहे. खरा हिंदुस्थान खेड्यात असून तो माझ्या वेशात जीवन जगत आहे. तेव्हा या देशातील बहुसंख्य जनतेचे हित तुम्हांस करावयाचे असेल तर त्यांचे अज्ञान घालवा त्यांना शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे हा त्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून माझा निरोप राणी व्हिक्टोरिया साहेबांना द्या, असे एका बाजूला शेतकरी हिताचे प्रश्न मोठ्या धैर्याने मांडत होते तर दुसऱ्या बाजूला दीनबंधू ‘सार्वजनिक सभे’च्या माध्यमातून इंग्रज सरकारचा निषेध करीत होते. दीनबंधू सार्वजनिक सभेच्यावतीने १५० ब्राह्मणेतर मुलांचा जत्था हाती मोठमोठे फलक देऊन जोतीरावांनी सभास्थळी आणला होता. त्या फलकांवर लिहिले होते “The Grandmother, we are a happy Nation. But nineteen cores are without educatio.” सन १८८९ साली मुंबई येथे हिंदी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले. तेव्हा सत्यशोधक समाजाच्या अनुयायांनी दरिद्री शेतकऱ्याचा पेंढ्यांचा एक मोठा पुतळा तयार करून तो सभेच्या मंडपासमोर उभा केला आणि देशातल्या खऱ्याखुऱ्या जनतेची परिस्थिती किती हालाखीची आहे याची जाणीव त्या सभेतील पुढार्‍यांना करून दिली. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र ‘दीनबंधू’ने त्या काळातील शेतकरी व कष्टकरी मजुरांच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडत सरकारच्या बेफिकीर वृत्तीवर चांगलेच कोरडे ओढले होते.
ब्रिटिश आमदानीत शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारा एकही नेता त्याकाळी नव्हता ती जागा अशारीतीने जोतीरावांनी भरून काढली. जोतीरावांच्या काळी खोत सावकारांकडून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होत होते. त्याविरुद्ध जोतीरावांनी शेतकरी आंदोलन छेडले. त्या आंदोलनात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर येथील हजारो शेतकऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. दख्खनचा उठाव म्हणून या आंदोलनाची ब्रिटिश इतिहासात नोंद आहे. आंदोलनाची धग लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारला १८८९ साली ‘डेक्कन अग्रिकल्चरिस्ट रिलीफ अ‍ॅक्ट’ हा या देशातील पहिला शेतकरी हिताचा कायदा पारित करावा लागला. जोतीरावांच्या नेतृत्वाचे हे केवढे मोठे यश होते. हिंदू समाजात अभिजन वर्गाचा दर्शनिक व उच्चभ्रू धर्म आणि जनसामान्यांचा आचारप्रधान व्यावहारिक धर्म अशा दोन पातळ्या पूर्वापार अस्तित्वात होत्या. त्यातील पहिल्या पातळीवरील अभिजन वर्गाच्या उच्चभ्रू धर्माचे स्वरूप विशेषाधिकाराचे म्हणून लाभाचे तर जनसामान्यांच्या आचारप्रधान धर्माचे स्वरूप कमालीचे कर्मकांडात्मक व उच्चभ्रूंच्या गुलाम मानसिकतेचे होते. अभिजनांच्या उच्चभ्रू धर्माने दैववादाच्या नावाखाली बहुजनांची जी अगतिक मानसिकता घडविली होती ती बदलणे व त्यांच्यात इहवादी व समतावादी जीवनकांक्षा पल्लवीत करणे आवश्यक होते. म्हणून क्रुसेडर जोतीरावांनी स्वतःला तळपातळीवरच्या लोकांशी जोडून घेतले. माणसाची संशोधन बुद्धी जागावी व तिने सत्याचा ठाव घेत भौतिक जगाचे जोरदार स्वागत करावे, या हेतूने त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली व त्या माध्यमातून समाजाच्या अस्तित्वाचे प्रश्न हाती घेत ते तडीस नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. महात्मा फुले हे त्या काळातील एक फार मोठे उद्योगपती व जमीनदार ही होते. खडकवासला धरण, कात्रजचा जुना बोगदा तसेच अनेक लहान मोठ्या पुलांचे व रस्त्यांचे बांधकाम त्याकाळी फुले यांच्या कंपनीने केले होते, त्यातून मिळालेला पैसा त्यांनी उदार अंतकरणाने समाजकार्यावर खर्च केला हा इतिहास आहे. काळ बदलला म्हणून इतिहासातील संदर्भ बदलत नसतात. सामाजिक विचारांची एक पार्श्वभूमी असते आणि ती पार्श्वभूमी ऐतिहासिक घटनांद्वारा प्रभावित होत असते. किंबहुना मानवी अंतरक्रियांचा संबंध हा या ना त्या कारणाने भूतकाळाशी संबंधित असतो. त्यामुळे वर्तमानातील विचारांच्या संबंधात जोपर्यंत त्या विचारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेतली जात नाही. तोपर्यंत वर्तमानातील विचारांच्या संबंधातील विश्वासपात्र आकलन होत नाही. म्हणून क्रांतीसुर्य महात्मा ‘फुले’ चित्रपटाला ब्राह्मण्यवादाचे कितीही ग्रहण लागले तरी चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद महादेवन यांनी महात्मा फुले यांचे ऐतिहासिक कार्य व त्यानुषंगाने येणारे घटनाप्रसंग मोठ्या धैर्याने समाजासमोर आणले पाहिजे. तसे झाले नाही तर ते युगपुरुष महात्मा फुले यांच्या विचार कार्याशी केलेला द्रोह ठरेल. शेवटी सूर्याच्या तेजोवलयापुढे ग्रहण दीर्घकाळ टिकत नाही हे त्रिकाल सत्य आहे.
सत्यमेव जयते !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!