दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
भगवान बुद्धांचा धम्म स्वीकारल्यानेच बौद्ध समाज अत्युच्च शिखरे पादाक्रांत करीत आहे.

- प्रा. आनंद देवडेकर
- वाशी( नवी मुंबई) दि. २३ मे :
- शेकडो पिढ्यांच्या अंधार यातनांनी त्रस्त झालेल्या समाजानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निष्ठापूर्वक साथ देऊन तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारल्यानेच आज हा समाज सर्व क्षेत्रांतील अत्युच्च शिखरे पादाक्रांत करीत आहे, असे प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष, सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी वाशी,नवी मुंबई येथे केले.
- वाशीस्थित बुद्ध प्रतिष्ठानच्या विद्यमाने आयोजित बुद्ध पौर्णिमा महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अनंत हर्षवर्धन होते.
- आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात प्रा. आनंद देवडेकर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीला प्रतिक्रांतीचा धोका कायमच राहणार आहे. म्हणून आपण बौद्धांनी जबाबदारीनं वागायला हवे. प्रतिक्रांती कोणत्या रुपात आपल्यासमोर उभी ठाकेल हे सांगता येत नाही. समाजाची संभ्रमाची अवस्था ही नेहमीच प्रतिक्रांतीसाठी अनुकूल असते. हे लक्षात घेऊन बौद्ध धम्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि संस्था संघटनांनी नेहमीच सावध आणि सतर्क राहायला हवे. त्यादृष्टीने विचार करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षेप्रसंगी नागपूरच्या दीक्षाभूमीवर दिलेलं भाषण धर्मांतरित बौद्धांसाठी दीपस्तंभ आहे. त्या भाषणाचं अध्ययन आणि मनन चिंतन करा. ते केल्यास बौद्ध म्हणून जगताना कोणती काळजी घ्यायची ते कळेल. तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हा भारतीय बौद्धांचा समृद्ध वारसा आहे. त्यामुळे बौद्ध म्हणून ताठ मानेनं जगण्याचं सुख आणि समाधान आपल्याला मिळालं आहे. त्यात इतर कोणत्या विचारांची भेसळ करून या समृद्ध वारश्याचे अवमूल्यन करू नका, असेही प्रा. देवडेकर आपल्या भाषणात शेवटी म्हणाले.
- भोजन अवकाशानंतर रोहित भोसले या युवा पुरातत्त्व संशोधकाने दाखवलेला लेणी स्थापत्यकलेच्या विकासक्रमाची माहिती देणारा औचित्यपूर्ण स्लाईड शो बुद्ध पौर्णिमा महोत्सवात सहभागी उपासकांसाठी प्रेरणादायी ठरला.
- वंदनीय भिक्खूगणांच्या हस्ते उपस्थितांसाठी धम्मदीक्षा कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. शिवाय गेला महिनाभर अबालवृद्धांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण प्रज्ञावंताचा सत्कार प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाचे आयुक्त डॉ. देवेन्द्र सोनटक्के व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बुद्ध प्रतिष्ठानच्या नव्या इमारतीतील अद्यावत वातानुकूलित अशोका बॅंक्युएट हॉल सभागृहात श्रोतृवृंदांच्या भरगच्च उपस्थितीत आणि उत्साहात संपन्न झालेल्या या बुद्ध जयंती ( पौर्णिमा) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सिद्धार्थ साळवे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत