संधी देणारा लोकराजा आणि गुणवत्ता दाखवलेला मातंग समाजातील खासदार
सन १९२०. मे महिन्यातील पहिल्या – दुसर्या आठवड्यात रजपूतवाडी सोनतळी येथे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मांग कुटूंबातील एक लहानसा मुलगा अत्यंत धाडसाने शाहू महाराजांना भेटायला गेला. त्याने महाराजांना मुजरा करुन सांगितले, ‘ मी जातीने मांग असून, मला शाळा शिकायची आहे.’ या मुलाला महाराजांनी दुसर्या दिवशी भेटायला सांगितले. दुसर्या दिवशी आपल्या गाडीतून महाराजांनी या मुलाला शहरभर फिरवले. काही वेळाने महाराजांचे विश्वासू सहकारी पापा परदेशी गाडीत बसले.
पापांनी महाराजांना काळजीयुक्त स्वरात सांगितले, ‘पुण्या मुंबईत तुमच्यावर टीका सुरू आहे. तुम्ही अस्पृश्यांना जवळ करता म्हणून तुमच्या जीवाला धोका आहे. तुमचे राज्य खालसा करण्याची कारस्थाने सुरू आहेत. ‘
महाराज उसळून म्हणाले,’ पापा मला जीवाची नि राज्याची पर्वा नाही.मला उभे जाळले तरी माझे काम मी सोडणार नाही. हे बघा मी आजच मांगाचा पोरगा आणला आहे. मी कोणाला भिणार नाही.’
अखेर गाडी गुरुकुल संस्थेच्या दारात थांबली. संस्थेचे व्यवस्थापक निंबाळकर लगबगीने बाहेर आले. महाराजांनी या लहान मुलाकडे पाहून निंबाळकरांना आदेश दिले , ‘या मुलाच्या जेवणाची आणि शिक्षणाची सोय करा !’ हा मुलगा म्हणजेच कोल्हापूरचे पहिले खासदार ॲड. कृष्णाजी लक्ष्मण मोरे. या प्रसंगाला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रसंगाच्या शताब्दी वर्षात शाहू महाराजांच्या सामाजिक क्रांतीचे, समतावादी भूमिकेचे आणि मोरेंच्या जडणघडणीचे स्मरण होते.
वरवर हा प्रसंग अतिशय लहान वाटतं असला तरी , तो किती क्रांतीकारक होता हे मोरे यांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यास लक्षात येते. मूळात मोरे यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली गेली तेव्हा, पुण्या-मुंबईत महाजांवर जहरी टीका होत होती आणि अशा काळात महाराज अस्पृश्यता निवारणाच्या धोरणापासून अजीबात परावृत्त झाले नव्हते. उलट, असंख्य जाती समूहांना वेगवेगळ्या संधी निर्माण करुन देवून शाहू महाराज समतेचा पाया घट्ट आणि मजबूत करत होते.
राजर्षी शाहू महाराजांचा वरदहस्त लहानपणीच प्राप्त झालेल्या
कृष्णाजी मोरे यांनी देखील आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. हुजूर ट्रेझरीतून शिक्षण पुर्ण करताना पुढे त्यांनी मॅट्रीक, बी.ए.एल.एल.बी. अशा पदव्या मिळवल्या. कोल्हापूर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सदस्य, कोल्हापूर संस्थांन इलाखा परिषद सदस्य, कोल्हापूर नगरपालिका सदस्य, कोल्हापूर जिल्हा लोकल बोर्ड सदस्य आणि कोल्हापूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तर, भारतीय स्वातंत्र्यानंतर सन १९५२ कोल्हापूर – सातारा लोकसभा मतदार संघातून आणि १९६२ साली हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कृष्णाजी मोरे खासदार म्हणून निवडले गेले. खासदार असताना कृष्णाजी मोरे यांचे वारणा धरण योजनेसंदर्भातील ६ एप्रिल १९६५ रोजीचे लोकसभेतील अभ्यासपूर्ण भाषण देशभर गाजले. लोकसभेत पाणी प्रश्नावर भूमिका मांडताना त्यांनी, शाहू महाराजांच्या जलनीतीच्या धोरणांचा आढावा घेतला. पुढील काळात वारणा धरण प्रकल्प आकारास आला. त्यांनी काळम्मावाडी धरण मंजूरीसाठी प्रयत्न केले, इचलकरंजी पाॅवरलूम प्रश्नासाठी आपली खासदारकी पणाला लावली तर, भाषावार प्रांतरचनेच्या मागणीसाठी मराठीच्या बाजूची भूमिका घेवून त्यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. रेल्वे बोर्डाचे सदस्य असताना त्यांनी कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्ग ब्रॉडगेजची मंजुरी घेऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या दळणवळणाला गती दिली.
शाहूवाडी आणि राधानगरी येथे ॲल्युमिनीयमचा कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला पण यामध्ये त्यांना अपयश आले.परंतु, बेरोजगारीच्या प्रश्नावर संसदेत संघर्ष करणारा खासदार यानिमित्ताने कोल्हापूरकरांना पहाता आला.
कृष्णाजी मोरे यांना दिल्लीत उच्चशिक्षित आणि अभ्यासू खासदार म्हणून मोठा मानसन्मान मिळाला. खासदार असताना मोरेंनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे शाहूपुरीतील प्रसिद्ध उद्योगपती म्हादबा मेस्त्री दिल्लीत यांना आणले, मेस्त्रींच्या शेती अवजारांच्या प्रयोगाबद्दल नेहरुंना कौतुकाने त्यांनी माहिती दिली. भारावलेल्या नेहरुंनी देखील या प्रयोगाला देशभर पोहचले. कोल्हापूरच्या प्रयोगशीलतेचा गौरव झाला.
सन १९३७ साली कर्मवीर भाऊराव पाटील आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आणि शिक्षणासाठी आजन्म प्रयत्नशिल रहाण्याची शपथ घेतली. खरेतर, बहुजन हिताय बहुजन सुखाय हा राजर्षींचा संदेश त्यांनी जागता ठेवला.
कृष्णाजी मोरे यांनी प्रकाशक्रांती नावाचे साप्ताहिक अनेक वर्ष निष्ठेने चालवले. या साप्ताहिकातून मोरे राजर्षी शाहू महाराजांचा समतावादी विचारांवर आधारित संपादकीय अग्रलेख लिहित. हे अग्रलेख वाचून दिल्लीतील हजार बारशे मराठी भाषीक एकदा कोल्हापूरात शाहूभूमिवर नतमस्तक व्हायला आले होते. सुप्रिम कोर्टात वकिली करताना गोरगरीब जनतेला मोरे नेहमी आपले वाटतं. खासदारकीच्या राजकीय थांब्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ सुप्रीम कोर्टात वकिली केली. गोरगरीब अशीलांकडून एकही पैसा न घेणारा वकील म्हणून न्यायालयाच्या प्रांगणात झालेला सत्कार या कार्याची पोहोचपावती म्हणावी लागेल.
मातंग समाज संघटित व्हावा, विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावा यासाठी मोरेंनी ऑल इंडिया मातंग असेम्बली नावाची संघटना स्थापन केली. राज्यभरातील मातंग समाज एकटवला गेला. मातंग समाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतानाच, ही संघटना समाजाला सुशिक्षित करण्यात अग्रेसर राहीली. असेम्बलीच्या कार्यकर्त्यांनी कवायत, बिगुल, स्काऊट, जयघोष या पूर्व अटींवर नेहमी सज्ज असले पाहिजे असे खासदार मोरेंना वाटतं असे.
मातंग समाजाला गुन्हेगारी कायदा १८८१ अन्वये पोलिस ठाण्यात दिवसातून तीन वेळा हजेरी द्यावी लागे, शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात ही हजेरी कायद्याने बंद केली असली तरी इतरत्र सुरू होती. खासदार मोरेंनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे पाठपुरावा केल्याने देशाच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे ३१ ऑगस्ट १९५२ रोजी साली सोलापूर येथे नेहरुंनी ही हजेरी आणि हा कायदा रध्द केल्याचे जाहीर केले. नेहरुंना सोलापूर मध्ये आणण्यास अनेकांचे प्रयत्न असले तरी खासदार मोरेंची भूमिका निर्णायक होती.
खासदार कृष्णाजी मोरेंचे संसदेतील एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे त्यांनी मांग, मातंग, मादीगा, मीनी मांग किंवा यासारखे समानार्थी शब्द हे एकाच जातीसाठी वापरले जातात हे सिध्द करून दाखविले. यासाठी त्यांनी भाषा, भौगोलिक रचना, समाजशास्त्रीय संकल्पना, संस्कृती आणि चालीरीती यांचा दाखला लोकसभेत मांडला. यामुळे विधेयकात दुरुस्ती केली गेली. यामुळे देशातील जनसंख्येने मोठ्या असणार्या मातंग समुदायाचा प्रश्न निकालात निघाला. या विधेयकाच्या दुरुस्ती पूर्वी शाब्दिकखेळांमूळे मातंग समाज हा आपल्या हक्कांपासून वंचित राहिलेला होता. मातंग समाजासाठी वसतिगृहांची निर्मिती, शैक्षणिक सुधारणेसाठीचे प्रयत्न यासाठी खासदार मोरेंनी केलेले कार्य दिशादर्शक ठरलेले आहे.
मा.खासदार किंवा ॲड. अशा प्रकारची मोरे यांची ओळख सिमीत वाटते. शाहू महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेतलेले किंबहूना शाहू महाराजांच्या विचारस्पर्शाने , सहवासाने माणूसपण मिळालेले आणि पुढील आयुष्यात कर्तृत्वसंपन्नता प्राप्त केलेले व्यक्तीमत्व म्हणजे कृष्णाजी मोरे ही ओळख अधिक सार्थ ठरते.
वंचीत आणि नाकारलेल्या समाज घटकांच्या उन्नतीसाठी कृष्णाजी मोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये त्यांचे असणारे योगदान निश्चितच दखलपात्र आहे. आपल्या कर्तृत्वाच्या सीमेची विस्तीर्णपणे आखणी करणार्या कृष्णाजी मोरे यांना घडवण्यात राजर्षी शाहू महाराजांची भूमिका निर्णायक ठरलेली आहे. शाहू महाराजांनी संधी दिली नसती तर, कृष्णाजी मोरे यांची जडणघडण झाली नसती. शाहू महाराजांच्या मोटारीत बसलेल्या आणि त्यांच्याच आदेशाने शिक्षण घेतलेल्या मोरे यांना सुप्रीम कोर्टात आणि लोकसभेत सन्मानाने प्रवेश मिळाला. याला शाहू महाराजांच्या सामाजिक क्रांतीची फलश्रुती म्हणावे लागेल. लोकराजा शाहूंच्या एका छोट्या कृतीने सामान्य उपेक्षित कुटूंबातील एका मुलाच्या आयुष्यात किती मोठ्या क्रांतीकारी घटना घडू शकतात याचे उदाहरण म्हणजे हा प्रसंग आहे.
राजर्षी शाहू महाराज आणि कृष्णाजी मोरे यांच्या भेटीच्या प्रसंगाचे शताब्दी वर्षात स्मरण करताना, शाहू महाराजांना अपेक्षित असणारी समग्र क्रांती गतिमान होणे आणि सामाजिक समता प्रस्थापित होणे आवश्यक वाटते.
खासदार के.एल. मोरे यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत