आंबेडकरी चळवळीत आपल्या शब्दांनी प्राण ओतणारे महाकवी वामनदादा कर्डक
.
आंबेडकरी चळवळीत आपल्या शब्दांनी प्राण ओतणारे महाकवी वामनदादा कर्डक यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या कविता.
वामन तबाजी कर्डक
जन्म:- १५ ऑगस्ट, इ.स. १९२२
मुळ गाव:- देशवंडी, ता.सिन्नर, जि. नाशिक
मृत्यू:- १५ मे, इ.स. २००४,
राष्ट्रीयत्व :-भारतीय
टोपणनाव:- दादा
नागरिकत्व :- भारतीय
धर्म :- बौद्ध
पत्नी :- शांताबाई वामन कर्डक
अपत्ये :- मीरा (जगु शकली नाही)
दत्तक पुत्र :- रविंद्र कर्डक
वडील :- तबाजी कर्डक
आई :-सईबाई तबाजी कर्डक
नातेवाईक :- सदाशीव (भाऊ)
सावित्राबाई (धाकटीबहीण)
वामनदादा कर्डक आपली कविता घेऊन दलितांच्या झोपड्याझोपड्यातून गेले. आपल्या कविता मागची भूमिका स्पष्ट करतांना ते म्हणतात ” मी जेथे जन्मलो, ज्या मातीत वाढलो आणि ज्या अन्यायाखाली भरडला गेलो त्याची मला आठवण आहे. ती कैफियत मी शब्दात मांडतो. त्याला तुम्ही कविता म्हणा किंवा म्हणू नका. मला जे प्रामाणिकपणे जाणवले ते मांडले” त्यांची बाबासाहेबांच्या विचारावर असीम श्रद्धा आहे. त्यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी या दलितांच्या मनात जळजळीत अंगार पेटविला.
ते म्हणतात :-
तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफानवारा पाऊसधारा मूळी न आम्हा शिवे
क्रांतीचे गीते उच्च स्वरात गाणारा वामन कर्डक सारखा कवी बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर अस्वस्थ होतो. स्वतंत्र भारतात दलित जाती, जमातीवर होणाऱ्या गावोगावच्या अत्याचाराच्या कथा त्यांना सुन्न करतात. त्या अत्याचाराविरुद्ध दलित मन चिडत का नाही, पेटून उठत का नाही त्यामुळे ते खन्तावतात. त्यांच्या मनातले प्रचंड वादळ चित्रित करतांना प्रा.डाॅ.गंगाधर पानतावणे सर म्हणतात,
“भिमरावाच्या समृद्ध मळ्याला आलेली अवकळा पाहून कवी विषण्ण होतो. पोटच्या लेकारागत ज्याला राखला, झारी घेऊन जिथे एकेक रोपावर जलसिंचन केले, तो मळा आता दुहीने पेटलेला आहे. एकीचा जोंधळा आता वाळून चालला आहे. कवीने व्यक्त केलेल्या ह्या भावना संवेदना आहेत. भिमापाठी अन्यायाने पुन्हा उसळी मारली आहे. लेकी बहिणींची अब्रू बेदरकारपणे लुटली जात आहे. घरे जाळली जात आहेत. निघ्रून छऴ चाललेला आहे. पण सारेच मूग गिळून बसत आहेत चिडच नष्ट झाली आहे” कर्ड्कांची वेदना कुणालाही जाणवेल. त्यांची कविता म्हणजे त्यांच्या मनात ठसठसत असलेले दुख; त्यांची कविता म्हणजे त्यांच्या संवेदनशील मनाचे आवेग !
ते म्हणतात : –
भीम माझ्यामध्ये होता,
मान ताठ होती माझी
माझ्यातला भीम इथे,
मीच केला उणा,
दोष देऊ कुणा
कर्ड्कांच्या कवितेतील हे दुख: बाबासाहेबांच्या निधनानंतर दलित समाजाला जाणवणाऱ्या पोरकेपणाचे आहे. कर्ड्कांचे कवी मन बाबासाहेबांविषयी कृतद्नेने भरलेले आहे. दादर च्या चैत्य भूमीवर उभे राहतांना ते म्हणतात :-
समाधीकडे त्या वाटही वळावी
जिथे आसवांची फुलेही गालावी
जिथे माउलीची चिता हि जळाली
धूळ त्या स्थळाची मस्तकी मळावी.
✏……
अशा या महान जळजळत्या कवीला, गीतकाराला, विद्रोह्याला, बंडखोराला अभिवादन.!!!
–विद्रोही अविनाश गोंडाणे
अमरावती 9923264193
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत