आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीवरील दादासाहेबांचा प्रभाव धुडकावण्यासाठी स्वत:ला दुरुस्त म्हणवत आंबेडकरी चळवळंच उध्वस्त करुन टाकली…

Jaywant Hire
दादासाहेब जरी उच्चशिक्षित-उच्चविद्याविभुषित नव्हते तरी मुकनायक बाबासाहेबांचे सर्वात जवळचे अनुयायी होते.बाबासाहेबांनी आदेश द्यायची खोटी,दादासाहेबांनी सारी ताकत पणाला लावून ते आंदोलन यशस्वी करायचेचं; मग तो काळाराम मंदीर सत्याग्रह असो की मुखेड सत्याग्रह असो.
परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दादासाहेबांचे हे जनमाणसातील स्थान चळवळीतल्या उच्चशिक्षित नेत्यांना खूपु लागले.त्यातुनच दादासाहेबांचे हे नेतृत्व अमान्य असलेल्या तथाकथित नेत्यांनी स्वत:ला दुरुस्त म्हणवत मानवी हक्क नाकारलेल्यांची मुकनायकाने मोठ्या परीश्रमाने उभारलेली चळवळ रिपब्लिकन पक्षात उभी फुट पाडली आणि पुन्हा वंचित-उपेक्षित घटकांना जातीपातींच्याच नव्हे;तर नेतृत्वाच्या लढाईतही अस्तित्वहीन करुन टाकले.
आंबेडकरी चळवळीच्या या अंर्तविरोधातही दादासाहेबांसारखा तळागाळातील माणसाशी नाळ जोडलेला नेता पाय रोवून व्यवस्थेला आव्हान देत होता.
या रिपब्लिकन शक्तिचा संयुक्त महाराष्र्टाचा मंगल कलश आणण्यातील दादासाहेबांचा सिंहाचा वाटा कोण नाकारु शकेल?
आंबेडकरोत्तर कालात हिंदू धर्म/अस्पृश्यता त्यागून बौद्ध झालेल्या समाजाला एकटे पाडून अत्याचारांची शिकार केले जात होतेच.पण,जे अस्पृश्य हिंदू धर्माच्या अस्पृश्यतेचे साखळदंड तोडू शकले नव्हते,त्यांच्यावरही देशभरात अत्याचारांचा कडेलोट होत असतांना दादासाहेबांनी या अत्याचारांविरोधात लोकसभेत उठवलेल्या आवाजामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारला या अत्याचारांचा आढावा आणि उपाय योजना मांडण्यासाठी पेरुमल आयोगाची स्थापना करावी लागली होती.या पेरुमल आयोगाने उपेक्षीत समुहावरील अत्याचारांचा जो लेखाजोखा मांडला होता,त्यामूळे देशभरात एकच हल्लकल्लोळ माजला होता.त्या पेरूमल आयोगामुळे महाराष्र्टात ज्या ठीणग्या पेटल्या होत्या त्या ठीणग्यांतूनच दलीत पँथरचा वडवानल चेतला होता.दलीत पँथरच्या या पेटलेल्या तरुणांनी “इट का जबाब पत्थर से देंगे।” म्हणत जातीयवाद्यांसमोर जे आव्हान उभे केले होते,त्यामुळे भल्याभल्या अत्याचार्यांना आणि त्यांच्या पाठीराख्या राजकारण्यांनाही घामच फुटला होता.
दलीत पँथरने जरी मुख्यत: दादासाहेबांसह तत्कालीन रिपब्लिकन नेत्यांना या अत्याचारांबाबत लक्ष्य केले होते;तरी ज्या पेरुमल समितीच्या अहवालामुळे दलित पँथरचा वडवानल चेतला होता,त्या पेरुमल समितीच्या अहवालावर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचाच प्रभाव होता;हे कुणाला नाकारता येऊ शकेल?
दादासाहेबांनी;”कसेल त्याची जमिन नसेल त्याचे काय?”असा सवाल करत पुकारलेल्या भूमिहीनांच्या सत्याग्रहाने सातत्याने प्रस्थापित आणि धनदांडग्या वर्गाच्याच हिताचे राजकारण करणार्या सत्ताधारी काँग्रेसला घाम फुटला.अवघे तुरुंग भरुन गेले आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी या भीमशक्तिसमोर शरणागती पत्करुन दादासाहेबांपुढे मैत्रिचा हात पुढे केला . या मैत्रितुनच महारष्र्टापुरता तरी धर्मांतरीत पूर्वास्पृश्यांना आरक्षणाचा अधिकार(बौद्धांसाठीचे आरक्षण) दादासाहेबांमुळेच मिळू शकला;हे वास्तव कोण बरे नाकारु शकेल?
परंतु महाराष्र्टापुरतेच मिळालेले हे आरक्षण देशपातळीवर मिळवून अस्पृश्यवर्गाची हिंदु धर्मव्यवस्थेच्या गुलामीतुन सुटका करण्याचा पर्यायाने बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन गतिमान करण्याचा त्यांचा लढा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालुच ठेवला होता.
मुकनायक डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या लढवय्या सहकार्यास कर्मवीर दादासाहेब गायकवाडांना त्यांच्या जयंतीप्रित्यर्थ…..
मानाचा जयभीम!…..
-१५ऑक्टोंबर२०२०
Jayawant Hire
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



