महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

मातेरं; मानवी दुःखाचा ठाव घेणारा कथासंग्रह – प्रा. अनिल कवठेकर

लेखक अनिल भालेराव यांचा ‘मातेरं ‘या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे या कथासंग्रहातील सर्व कथा प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने भावलेल्या आहेत. म्हणूनच आजच्या व्हाट्सअप आणि मोबाईलच्या काळामध्ये एखादा कथासंग्रह अल्पावधीत तिसऱ्या आवृत्तीपर्यंत मजल मारू शकतो .यातून लेखकाच्या लेखन शैलीची, विषय मांडणीची विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची,विषय समजून घेण्याची आणि आपल्या सभोवती असलेल्या समाजाचे निरीक्षण करण्याची जी अद्भुत कला अनिल भालेराव यांना गवसलेली आहे हे स्पष्ट होते.ती त्यांच्या लेखन शैलीतून ‘मातेरं’ या कथासंग्रहाद्वारे आपल्यासमोर आली आहे.
मुळातच आयुष्य प्रत्येकाला घडवायचं असतं, पण बऱ्याचदा ते आयुष्य बिघडतं ,चुका होतात ,आयुष्यात अपयश येतं ,आयुष्य उदध्वस्त होतं, पण या सगळ्यातून माणूस स्वतःला सावरतो आणि पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहतो . लेखकाने या कथासंग्रहाला मातेर असं नाव दिलेलं आहे. याचा अर्थ असा की ,एकदा तुमच्या आयुष्याचं मातेर झालं की, त्यातून पुन्हा तुमचं आयुष्य तुम्हाला उभारता येत नाही, फुलवता येत नाही, निर्माण करता येत नाही. मातेर हा शब्द तसं तसा पोतेरं या शब्दाच्या जवळ जाणाराआहे .पूर्वीच्या काळी घराच्या भिंती या मातीच्या असत आणि शेण मातीचा काला करून  जुन्या कपड्याने त्या सगळ्या भिंती लिंपून घेतल्या जात. त्याला पोतेरं असं म्हणत. एकदा पोतेरं म्हणून वापरलेला कपडा हा पुन्हा कशासाठीही उपयोगात आणता येत नसे,तसं एकदा आयुष्याचं मातेरं झालं की, त्यातून कोणालाही उभं राहता येत नाही. अशा उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या पण पुन्हा कोसळणाऱ्या तेरा कथा या कथासंग्रहात आपल्याला वाचायला मिळतात. ज्या आपल्याला खिन्न करतात. विचार करायला भाग पडतात. गोंधळून टाकतात .आपण कोणत्या समाजामध्ये राहत आहोत, तिथे लोकशाही आहे का ?तिथे स्वातंत्र्य आहे का? तिथे अधिकार आहे का ?तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? हे सगळे शब्द या कथा वाचताना कुठेही आढळत नाहीत. या सगळ्या तेरा कथा मधील कथा नायकांचं ,नायिकांच आयुष्य हे या देशातील कुठल्यातरी  गावातलं असलं तरीही ते खूपच अस्वस्थ करणार आहे .सत्य इतके भयानक असू शकते याचा विचारा करायला लावणार आहे.
                             ‘मातेरं या कथेमधील कथानायिका ध्रुपदीचं आयुष्य  तिच्याकडे वासनेने पाहणाऱ्या प्रत्येकाने, तिला एक भोग वस्तू म्हणून पाहिलेलं आहे .इथे नात्याला किंमत नाही वयाला अर्थ नाही. नवरा जेव्हा कर्तव्यशून्य होतो तेव्हा एका पत्नीला आपल्या आयुष्यात जे भोग बघावे लागतात त्याचं अत्यंत विदारक असे चित्र मातेरं या  कथेमध्ये आपल्याला ध्रुपदीच्या जीवनाच्या मातेरातून लक्षात येतं. मातेरंही या कथासंग्रहातील सर्वोत्कृष्ट कथा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शब्दशब्दातून उमटणारी चित्रमय भाषा,अनेक वर्षांच्या अन्यायानंतर तिला जेव्हा आपल्या मुलांच्या रुपाने आधार भेटतो तेव्हा तिच्यातील वाघिणी जागे होते असा सुंदर शेवट या कथेतून वाचकाला दिलासा देतो. आपल्या मुलांच्या जगण्यासाठी एक आई स्वतःच्या शरीराचं मातेरं कुठपर्यंत करू शकते. हे लेखकाने अत्यंत सुंदर शब्दात चित्रित केलेले आहे .आणि  प्रभावी शब्दात अंतकरणापर्यंत पोहोचणाऱे संवादही आलेले आहेत.
                             ‘तात्या’ या कथेतील महारोग झालेल्या तात्याचं दुःख तर अवर्णनिय आहे,पण लेखकाने ते अतिशय समर्पकपणे शब्दांमध्ये पकडलेले आहे. तात्याच्या कुशीत निर्धास्त पडून राहणारा साप  यात तात्या निर्धास्त आहे की साप निर्धास्त आहे, याचा विचार लेखक वाचकाने करावा. म्हणून सोडून देतो . तात्याचे हातपाय कुरतडणारे उंदीर त्यातून वाहणारे रक्त तात्याच्या हातापायावर ताव मारणाऱ्या उंदरांना साप खाऊन सुस्तावल्यासारखे पडून राहायचे .हे वर्णन म्हणजे  तात्याच्या मातेरं झालेल्या जीवनाचं अतिशय चित्रमय वर्णन आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. तात्याकडे असणारे बिडीच्या बंडलाचे कागद त्याने सांभाळून ठेवणे आणि ते आपल्या जखमेवर लावणं. तात्याच्या संवादातून , त्याने तो रोग स्वीकारला , “हा रोग जडल्यापासून थंडी होण्याची बाधाच होत नाही रे, किडे मुंग्या चावल्या तरी काही होत नाही.महे शरीर म्हणजे दगडच फक्त तहान भूक न मेंदूत इचार आहे एवढाच फरक आहे .”अशा तात्याची कथा आपल्या मेंदूला झिनझिण्या आणल्याशिवाय राहत नाही,असे दुःख घेऊन या देशाच्या कुठल्यातरी गावाच्या कोपऱ्यात माणसं जगत आहेत. असा अत्यंत वेदना देणारा विचार या कथेतून आपल्या मनामध्ये रुंजी घालू लागतो .अशीही तात्याची कथा म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाचं मातेरं होणाऱ्या व्यक्तीची कथा होय.
                             पुरुष वेश्या ही कथा चेतन आणि त्याची बायको शिल्पा यांच्या संसाराची कथाआहे.अनपेक्षितपणे पार्टटाइम जॉब शोधत असताना चेतनच्या वाटेला आलेला हा पुरुष वेश्या होण्याचा मार्ग ,त्याच्या मनाविरुद्धचा त्याचा लढा, आपण आपल्या बायकोला फसवतोय ही भावना, या भावनेतून बायकोचा हात अंगावर फिरताना त्याच्या अंगावर येणारे शहारे ,त्याच्या मनाचा उडणारा गोंधळ, संसार ,पैसा या संघर्षात त्याचं अस्थिर होणं आणि रश्मीचं त्याच्या प्रेमात पडणं, चेतनच्या पुरुष वेश्या झाल्यानंतर त्याच्या मनाची होणारी तगमग त्या तगमगींमधून सहजपणे आपल्याला स्री वेश्येच्या मनाच्या अनेक कांगोऱ्याचा खोलवर विचार येऊ लागतो. चेतनच्या प्रेमात पडलेली रश्मी पण चेतन तर भाड्याचा माणूस होता,भाड्याने कधी प्रेम मिळत का ?अशा संवादातून प्रेम, शारीरिक भावना ,संसार या सगळ्यांचा ठाव घेत ही कथा चेतनच्या आयुष्याला यंत्रमय करणारे एका संवादावर एऊन थांबते .त्याच्या या पार्टटाइमच्या जॉबमध्ये आता शरीराचा यंत्र म्हणून वापर होत होता.
                                ‘नातं’ही कथा रुधीरा आणि अनंत या दोघांच्या विवाहबाह्य संबंधातून तयार होणारी भावनांची आंदोलन दाखवणारी कथा आहे .तिला नवरा हवा असतो.” केवळ नवरा असून चालत नाही रे,त्याही पलीकडे एक संसार असतो. माणसाला हवा असतो विश्वास,प्रेमाची माणसं आणि ते सर्व काही तुझ्यात आहे “त्याच्या बोलण्याने त्याच्या विचाराने तिला भुरळ घातलेली आहे अशी रुंधिरा .विवाहा नंतर होणारं प्रेम  शेवटाला कधीही पोहोचू शकत नाही किंवा त्याचा शेवट विवाह झाल्यानंतर पुन्हा ते प्रेम शिल्लक राहत नाही .याची अनेक उदाहरणं पाहिल्यानंतरही माणसं अशी विवाहानंतर प्रेमात का पडतात? या कथेतील अनंत हा ओशोच्या प्रेमात असल्याप्रमाणे त्याचं बोलणंही ओशोवादी विचारांचं प्रभावी समुपदेशन आहे
“आनंद ही स्वयं एक वाट आहे .आनंदाच्या कोणत्याच वाटा नसतात .समाधान मिळते ते प्रामाणिक सेवेतून .प्रत्येक गोष्ट घडणारच. तिला सहज तोंड द्या आणि अपेक्षेपेक्षाही अपेक्षेच्या पलीकडे प्रयत्न करणे.”यासारख्या संवादातून आनंदच्या विचारांची उंची आणि असे विचार आवडणारी एखादी स्री त्याच्या प्रेमात पडणार हे सहज शक्य आहे .त्यामुळे त्याचं आणि तिचं नातं हे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी ही कथा आपल्याला वाचावी लागेल.
                          तारुण्य करपून गेलेल्या गोंधळी समाजातील व्यक्तीची’सावकार ‘ही कथा आहे. नाव सावकार असलं तरी गुरु राखण्याचं काम करणारा हा अठराविश्व दारिद्र्यात जगणारा एक सामान्य माणूस आहे .नागाने दंश करून बायको गेल्यानंतर एकट्याने आपल्या दोन्ही मुलांना सांभाळत आयुष्य जगणारा सावकार म्हणजे हिरामण आपल्या आयुष्याला त्यांने करपवून टाकले आहे.त्याने आंघोळ सोडली. कपडे धुणं सोडलं मुलांसाठी आई झाला.  गावातल्या सगळ्या दोनशे जनावरांची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याचे तळपाय म्हणजे कुरूपांचे आगार. कित्येक काटे त्याच्या पायात खुडले होते बाभुळीचे,हेखंडाचे, येडी बाभळीचे, बोरीचे काटे,सावराचे असे कितीतरी काटे त्याने पायात खुडताना पाहिले आणि त्याच काट्यांनी त्याने काटे काढले होते. अशा पायात काट्यांची वेदना घेऊन जगणारा सावकार प्रचंड पावसात अंगावर गोंणपाट घेऊन भिजत जाणारा सावकार. तापलेल्या मातीवर नागड्या पायाने चालणारा सावकार. बैलाच्या खुरासारखे पाय झालेला सावकार .सावकार एक मनस्वी जात आहे. प्रत्येक गावात असा एक माणूस मरणाचं जगणं जगताना दिसत असतो. सावकाराच्या मरणानंतरही सावकाराचे हे जगणं संपत नाही. एक नवा सावकार जन्माला घालूनच जुना सावकार मरत असतो. वंचितांच्या दुःखाची अतिशय बोलकी कथा .अंगावर शहारे आणणारं त्यांचं जगणं .जीवनाच्या मातेऱ्याची पदोपदी आठवण करून देणार आहे. त्याचे जगणं अनेकदा  वास्तव इतकं सत्य असू शकतं का असा विचार करायला लावणारी ही कथा आहे.
                     वास्तव ही मनाली आणि वेदांत यांची प्रेम कथा अगदी थोडक्यात सांगायची तर माथेरानच्या पावसात वेदांत आणि मनाली इतके जवळ आले की, त्यांनी जन्मोजन्मी एकत्र राहण्याची शपथ पशुपती नाथाच्या मंदिरात घेतली. कथेतल्याच वाक्यातून त्या दोघांच्या प्रेमामधला वरवरचा उथळपणा पटकन लक्षात येतो. या कथेत इंग्रजीत बोलणारे उच्चशिक्षित सगळे असले तरीही मेंदूमध्ये आदीम काळापासून गहाण पडलेली जात मात्र प्रत्येकाच्या ओठावर जशीच्या तशी आहे. कधीही न संपणाऱ्या जातीच्या वर्चस्ववादी विचाराला नव्याने मांडणारी ही कथा आहे.
                  या कथासंग्रहातील आठवण ही कथा मनाला चटका लावणारी आहे . आपल्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून केलेला त्याग काही माणसं विलक्षण असतात. तशी या कथेतील नायिका अनुजा विलक्षण आहे. नायक हा आंबेडकरी चळवळीतला आहे. अत्यंत गरिबीतून पुढे आलेला आहे .त्याच्या संघर्षमय जीवनात प्रेम करण्यासाठी उसंत नाही पण त्याच्या हृदयाचे एका छोट्याशा कोपऱ्यात अनुजाबद्दलचे प्रेम आहे. त्यांने ते चौदा वर्षे जपून ठेवलेआहे. पण चौदा वर्षांनंतर अनुजा जेव्हा त्याला भेटते तेव्हा त्याला तिच्या वडिलांकडून ऐकायला मिळत एक अकल्पनीय वास्तव. त्यातून अनुजाच्या प्रेमाची उंची त्याच्या लक्षात येते. प्रेम म्हणजे केवळ प्राप्ती नाही तर प्रेम म्हणजे आपल्या माणसाला दुःख होऊ नये म्हणून केलेला त्यागही असू शकतो .अत्यंत काव्यमय अशा शब्दात लिहिलेली कथा आहे,तिचा शेवट आपल्याला नक्कीच आवडेल.
लेडीज बारमधल्या मुलींच्या आयुष्याला असणारी एक दुःखमय किनार या कथेत आपल्याला पाहायला मिळते. जगण्यासाठी त्यांनी निवडलेला पर्याय समाजाला मान्य नसेल पण ते काम करणाऱ्या मुलींना तरी कुठे मान्य आहे. मनाच्या विरुद्ध चाललेला खेळ तरीही आपल्या आत्म्याला शुद्ध ठेवण्याचा केलेला प्रयत्न. निकिता आणि विजय यांची कथा दोघेही बारमध्ये भेटतात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतात . मातेरे झालेल्या आयुष्याला आकार देण्याचे प्रयत्न करणारे  जोडपे आहे. त्यांच्या आयुष्यातला संघर्ष कधी संपत नाही.विजयला चांगली नोकरी लागल्यानंतरही त्याची भरकटणारी बोट अथांग अशा सागराच्या अवकाशात एका चांदणीच्या ठिपक्यासारखी भासते. . तिच्या पोटात वाढणार बाळ आणि उरते फक्त प्रतीक्षा ज्या प्रतीक्षेला शेवट आहे की नाही हे सांगता येत नाही.आंबेडकरी चळवळीमधील सच्चा कार्यकर्त्याच्या जीवनाची कथा सांगणारी नाग्याची ही कथा आहे .प्रामाणिकपणामुळे शेवटी तुमच्या वाट्याला अपयश येत. राजकारणात छक्के पंजे खेळावे लागतात आणि छक्के पंजे खेळणारी माणसं यशस्वी होतात .नाग्याच्या गावातला गुरुजी हा असा छक्के पंजे खेळणारा अत्यंत सावध कार्यकर्ता आहे. गंगाराम गुरुजी डोक्यावर गांधी टोपी अंगात पांढरा सदरा समाजाचा राजकीय आणि सामाजिक नेतृत्व करणारा पण नवनेतृत्वाला वाव न देणारा काँग्रेसपासून भाजपपर्यंत सगळ्यांशी सलगी साकारणारा, सलगी ठेवणारा आपले अस्तित्व टिकावे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करणारा गंगाराम गुरुजी आणि त्याच्यापुढे केवळ  प्रामाणिक असणारा नाग्या. त्यामुळे नाग्याची जी अखेर व्हायची ती होतेच. वयाप्रमाणे नाग्याच्या आयुष्याची दिशा बदलते. हे भयानक सत्य ज्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यात वाट्याला आलेले आहे तो पुन्हा या कथेत पाहायला मिळते.
जगणं आणि मरण ही सोयरा आजी आणि शोभा या  दोघींची कथा आहे.शोभाला सोयराआजीने सांभाळलेले आहे.पण त्या दोघींचे प्रेम मात्र आई आणि मुलगी याच्या पलीकडचे आहे.” या पाप पुण्याच्या भिंती. लग्न केलं की पुण्य आणि लग्नाआधी केले की पाप. फक्त एका का्ळ्या धाग्यामुळे पापाचं  रूपांतर पुण्यात होतं. किती सोपं आहे हे रीतीरिवाज”. असं जीवनाचं वास्तव स्वीकारलेल्या आणि त्यातून आपलं जगण्याचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या  सोयरा आजीने शोभाला सांभाळले आहे. सोयराबाई मुंबई महानगरपालिकेत साफसफाईचे काम करणारी एक बाई आहे .दारुडा नवरा दारू पिऊन मेला. त्याची रखेल तीही मेली .पोरांना सोयराबाईने मोठे केलं पण पोरं शिकली नाही आयुष्याचं मातेरं होऊ नये म्हणून तिने केलेले सगळे प्रयत्न वाया गेले. तिचं आयुष्य म्हणजे किड्या मुंग्यांचे जीवन. पोर बेईमान निघाली .ज्यांना सांभाळलं तेही बेईमान निघाले. ज्या लक्ष्मीने शोभाला सोयराबाई कडे दिलं होतं त्या लक्ष्मीला सुद्धा ते मूल संडासामध्ये ठेवलेले सापडले होते. ज्या सोयराबाईने सांभाळलं ती मृत झाल्यानंतर शोभाच्या आयुष्याचं मातेरं होणार हे नक्की होतंआणि ते तसंच झालं.
                     गुरुमाय अस्पृश्य समाजातील एका बाईने बारा वर्ष तपश्चर्या करून अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती करून घेणे आणि अविवाहित राहणं पण तिचं हे असं जगणं पुरोहित वर्गाला मान्य नव्हतं आणि अस्पृश्य वर्गालाही मान्य नव्हतं. त्या गुरुमायच्या संपर्कात आलेली सोमवती. सोमवती म्हणजे लहानपणापासून देवाचे वेड लागलेली देवाची पूजा पाठ करणारी, ध्यान करणारी ,भजन ,कीर्तन ऐकणारी,वयाच्या पंधराव्या वर्षी गुरुमायची कीर्ती ऐकून गुरुमायला जाऊन भेटणारी अशी सोमवती या कथेची नायिका आहे.सोमवती आणि गुरुमाय दोन्हीही घनदाट जंगलातल्या डोंगरात राहत होत्या .त्यांचा भक्त संप्रदाय वाढत होता .त्याचबरोबर आपले वय वाढल्यामुळे आता सोमवतीला आपला वारस करण्याचे गुरुमायने ठरवले होते आणि तिलाही तपश्चर्या करण्यास सांगितले होते. इतर सर्व कथांपेक्षा या कथेचे वेगळेपण असं आहे की, अस्पृश्य समाजात जन्मलेल्या स्त्रीने अध्यात्मिक पातळीवर एका उंचीवर जाणं आणि ते अध्यात्मिक पद टिकवणे ही एक आजच्या काळातील अत्यंत वेगळी गोष्ट आहे जी या कथेत आपल्याला जाणवते.
                       ‘बकरी ईद’ ही कथा म्हणजे तारुण्यात पदार्पण करणाऱ्या इंदूच्या आयुष्यात जेव्हा प्रणय प्रसंग पाहण्याची वेळ येते, तेव्हा तिच्यामध्ये असलेली कामातूर तरुणी बाहेर पडते आणि ती आपल्याला कोणीतरी स्पर्श करेल, जवळ येईल अशा व्यक्तीचा शोध घेऊ लागते आणि अशा मुलींना हेरणारा शेख रसूल तिला बरोबर हेरतो आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकतो. दोघांच्या शारीरिक संबंधातून जेव्हा इंदूला दिवस राहतात तेव्हा तिच्या आयुष्याचं मातेरं कसं होतं ते या कथेत वाचायला मिळतं कथा ग्रामीण भागातील असल्यामुळे
तिथल्या सामाजिक जीवनाची ओळख होते. वाट चुकलेल्या मुलीला समजून न घेणारा समाज. तिच्या आयुष्याचा मातेरं करण्यातच स्वतःला समाधनी मानतो .तिला मारहाण होताना त्याला पाशवी आनंद होतो. ही समाजाची सत्य पण कटू  बाजू या कथेत चांगल्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे.
दिव्या खालचा अंधार ही या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे ही कथा आपल्याला गोंड या आदिवासी समाजापर्यंत आणि त्यांच्या समस्यांपर्यंत घेऊन जाते.
सुकऱ्या थोर समाजसेवक ,आदिवासींचे कैवारी डॉक्टर क्षीरसागर यांची हत्या करतो. इथून कथेला सुरुवात होते आणि हत्या सुकऱ्या का करतो याचे उत्तर आपल्याला कथा वाचल्यानंतर लक्षात येतं. हा दिव्या खालचा अंधार म्हणजे नेमकं काय यावर कथा भाष्य करते. नक्षलवादी कसा घडला जातो हे या कथेतून स्पष्ट होते.
चेतक बुक्स या प्रकाशन संस्थेतर्फे मातेरं या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती 24 फेब्रुवारी 2024 ला प्रकाशित झालेली आहे. सर्व कथा अत्यंत आओघवत्या शैलीत आहेत .अनेकदा कथा वाचताना. त्यातील दृश्य चित्रमय रित्या आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात .कथेतील संवादही मनाला भिडणारे आहेत. ग्रामीण जीवन, शहरीजीवन ,उच्चवर्गीय जीवन, नक्षलवादी अशा अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण असा मागवा लेखक घेताना आपल्याला दिसतो .यातून लेखकाचे भावविश्व हे प्रचंड मोठे आहे याची जाणीव होते .त्यांची लेखन शैली उत्तम आहे. रसाळ आहे. सर्वच कथांना गती आहे. कुठेही वाचताना कंटाळा येत नाही. त्यामुळे हा कथासंग्रह सर्वांनी वाचावा असा वाचनिय झालेल्या आहेत

कथासंग्रह -मातेरं
लेखक -अनिल भालेराव
प्रकाशक -चेतक बुक्स, पुणे
पृष्ठे -128
किंमत -252₹

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!