संपत्तीचे पुनर्वितरण..

इंडिया आघाडी सत्तेत आली तर काय होईल याबद्दल कोल्हेकुई सुरु झालेली आहे.
नेमक तथ्य काय आहे ?
काय सांगतो जाहीरनामा ?
जातनिहाय जनगणना करणे आणि त्यानुसार लोकांना सामाजिक , आर्थिक सुविधा , न्याय देणे.
शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीअंतर्गत भूमिहीन शेतकरी आणि शेतमजूर यांना जमिनीचे वाटप केले जाईल.
बर मग ?
जातनिहाय जनगणना करणे चुकीचे आहे का ? नितीशकुमार सरकारने केल्यावर काय वास्तव पुढे आलेल आहे ? लोकांच्या त्यांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व आणि संधी मिळायला नेमका कुणाचा विरोध आहे ?
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी ?
२०१४ आणि २०२९ दोन्ही वेळेला भाजप नेत्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू म्हणून सांगितलेलं आहे आणि सत्ता मिळाल्यावर स्वामिनाथन आयोग शेतकऱ्यांचा हिताचा नाही अस तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब म्हणालेत.
माझ्या अल्पमतीला पडलेला प्रश्न असा आहे कि जर स्वामिनाथन आयोग शेतकऱ्यांच्या हिताचा नाहीये तर एम एस स्वामिनाथन भारतरत्न कसे झाले ?
आता संपत्तीचे पुनर्वितरण केले जाण्याची बाब.
कॉंग्रेसच्या न्यायपत्रात आर्थिक ,सामाजिक न्याय आणि भूमिहीनांना शेतजमीन वाटपाचा उल्लेख आहे.
मग भूमिहीनांना शेतजमीन दिली तर कुणाच्या पोटात दुखणार आहे ?
जमीन तुमची काढून देणारेत का ?
जमीन सरकारची दिली जाईल ना ?
मग सरकारची जमीन हसदेव आरंद च्या जंगलात दिली तशी एकाच दोस्ताच्या घशात घातली जाणार नाही ना ? मग अडचण कुठे आहे ?
आणि संपत्तीचे पुनर्वितरण केले जाण्याची बाब २०१४ साली ‘ चाय पे चर्चा ‘ करताना कुणी केलेली होती ?
विशेष कायदा करून परदेशातला काळा पैसा देशात आणू आणि करदात्यांच्या खात्यात पंधरा लाख टाकून देऊ कोण म्हणालेल ? त्याला पुन्हा निवडणुकीचा जुमला म्हणून कुणी उडवून लावल.
संपत्तीचे पुनर्वितरण कुठे झालेले आहे सांगू का ?
करदात्यांच्या पैशाने उभ्या राहिलेल्या बँकातून तब्बल वीस लाख कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित करून भामटे पळून गेले तेव्हा लोकांची घामाची कमाई लुटलेली आहे.
४५००० कोटीची कंपनी दिवाळखोरी लवादाने अवघ्या ४५० कोटीत भावाला आंदण दिली तेव्हा सरकारी बँकांच्या टकलावर वस्तरा मारला ती संपत्ती लोकांच्या घामाची कमाई लुटलेली आहे.
क्रुडऑइलच्या किंमती कमी झालेल्या असताना अबकारी कर आणि विक्रीकरात भरमसाट वाढ करून पेट्रोल १०० पेक्षा जास्त भावाने मागची दहा वर्षे विकत घेतोय , सैपाकाचा सिलिंडर ४०० चा १२०० झाला तेव्हा सरकारची तिजोरी भरलेली आहे आणि कॉर्पोरेट कराचा दर कमी करून कंपन्यांना नफेखोरीची संधी दिलेली आहे हि लोकांच्या घामाची कमाई लुटलेली आहे.
देशातल्या प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराच्या रूपाने भरलेला एक एक पैसा लोकांच्या घामाची कमाई आहे.हि कमाई देशातली विमानतळ, रेल्वे, बंदर, नवरत्न कंपन्या उभारायला खर्ची पडलेली आहे. जेव्हा लोकांच्या पैशातून उभारलेल्या या आस्थापना कवडीमोल भावाने मित्रांना आंदण दिल्या तेव्हा लोकांच्या घामाची कमाई लुटलेली आहे.
निवडणूक रोख्यात नफा लांब राहिला, भांडवल जेवढ नाहीये त्यापेक्षा जास्तीचे पैसे देऊन कंपन्यांनी निवडणूक रोखे खरेदी करून भाजपला दिलेले आहेत आणि त्या बदल्यात अटक टाळणे, धाडी बंद होणे, कंत्राट मिळणे या गोष्टी झालेल्या आहेत. जेव्हा हे रोखे खरेदी झाली तेव्हा लोकांच्या घामाची कमाई लुटलेली आहे.
बँकांच्या नफ्यातून रिझर्व्ह बँकेला पैसे मिळतात आणि त्यातून आपत्कालीन निधी तयार होतो, त्यातून पाच लाख कोटी पैसे बळजोरीने काढून घेतले तेव्हा लोकांच्या घामाची कमाई लुटलेली आहे.
बँकांना मोठ्या धेंडानि बुडवले, मातीत घातले आणि मग वसुलीची तलवार सामान्य लोकांच्या मानेवर पडलेली आहे, किमान रक्कम ठेवण्याची अट , वेगवेगळे सेवा चार्जेस आणि त्यावरचा जीएसटी यामाध्यमातून बँकांनी सामान्य लोकांच्या खिशावर दरोडा घातलेला आहे तोही जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांचा आणि तोही दरवर्षी हि लुट झाली लोकांच्या घामाची कमाई लुटलेली आहे.
काकाजी,
गरिबांना लुटून तुम्ही आधीच संपत्तीचे पुनर्वितरण तुमच्या दोस्ताना केलेलं आहे , त्याबद्दल चकार शब्द न काढता हिंदू मुस्लीम वाद उभा करून आणि तुमच मंगळसूत्र काढून घेतल जाईल अशी कोल्हेकुई करणे हा प्रकार तुम्हालाच शोभणारा आहे.
आनंद शितोळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत