बौद्ध धम्मात बहुजनवादाची भेसळ झाल्यास ते प्रतिक्रांतीला आमंत्रण ठरेल. – प्रा. आनंद देवडेकर

ठाणे शनिवार दि. २७ एप्रिल:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शुद्ध स्वरूपातील बौद्ध धम्मात बहुजनवादाची भेसळ झाल्यास ते धम्मक्रांती विरोधातील प्रतिक्रांतीला आमंत्रण ठरेल असा सुस्पष्ट इशारा अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी ठाणे येथे बोलताना केले.
बौद्धजन पंचायत समिती गट क्रं ४५ ठाणे विभागाच्या वतीने वर्तकनगर, ठाणे येथील बौद्धजन पंचायत सभा बुद्ध विहारात आयोजित बुद्ध- आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त ‘ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आपली जबाबदारी ‘ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. आनंद देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी बौद्धजन पंचायत समितीचे गट प्रतिनिधी आयु. अतुल भिकुराम साळवी हे होते.
दीक्षाभूमीरील ऐतिहासिक भाषणातील बौद्ध म्हणून जबाबदारीनं वागण्याच्या बाबासाहेबांच्या संदेशाची आठवण करून देऊन आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात अनेक संदर्भ देत प्रा. देवडेकर पुढे म्हणाले की, प्राचीन काळी बुद्ध धम्माविरोधात झालेल्या प्रतिक्रांतीच्या रुपातच आताच्या काळातील प्रतिक्रांती येईल असं नव्हे. म्हणूनच बौद्ध धम्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सतत सजग आणि सतर्क राहायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या धम्म मार्गानेच बौद्ध समाजाची प्रगती झाली आहे. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. या मार्गापासून ढळण्यासाठी अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण केले जातील त्यात फसू नका. बौद्ध धम्म त्याचा इतिहास आणि संस्कृती यांची माहिती करून घ्या आणि यापुढे बौद्ध वस्त्यांतून चक्रवर्ती सम्राट अशोक यांचीही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा, असेही प्रा. देवडेकर यांनी शेवटी सांगितले.
या प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आयु. लक्ष्मण रामजी भगत, चिटणीस आयु. यशवंत गंगाराम कदम, माजी गट प्रतिनिधी आयु. संजय पांडुरंग जाधव आणि आयु. प्रशांत भोजने यांचीही प्रसंगोचित भाषणे झाली.
नुकतीच युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रशांत भोजने यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला तर गट क्रं. ४५ ठाणे विभागातील बौद्धजन पंचायत समितीच्या सर्व शाखांचे पदाधिकारी यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आयु. विजय राजाराम पवार यांनी केलेल्या खुमासदार शैलीतील सूत्रसंचालनाने रंगलेल्या या प्रबोधन सत्राचे प्रास्ताविक आयु. लक्ष्मण मोते यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. चंद्रकांत बंडू कांबळे यांनी केले. बौद्धाचार्य व्ही.जी. सकपाळ यांनी म्हटलेल्या सुश्राव्य सरणेतयानं कार्यक्रमाची सांगता झाली. जयंतीचं औचित्य साधून उपस्थित सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत