राष्ट्रवादी शरद पवार पक्षात राहूनच विधानसभा 2024 लढवणार – रोहिणी खडसे
रावेर : भाजपा मध्ये घुसमट होत होती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आलेले नेते एकनाथ खडसे आता स्वगृही अर्थात भारतीय जनता पार्टीत परतणार आहेत. स्वतः खडसे यांनी तशी घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या भाजपात असून त्यांना भाजपाने यंदा तिसऱ्यांदा रावेरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्यामुळे आता त्यांची कन्या रोहिणी खडसे यादेखील भाजपात परतणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. रक्षा खडसे यांनी त्यांच्या नणंदेला भाजपात येण्याचं आवाहनही केलं आहे. या सर्व चर्चावर रोहिणी खडसे यांनी उत्तर दिलं आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या, “मी आधीही माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्याबरोबर राहून पक्षासाठी काम करणार आहे. मी याच पक्षाच्या विचारधारेवर भविष्यातही काम करणार आहे. माझ्या भूमिकेबाबत कोणाच्याही मनात संभ्रम असण्याचं काही कारण नाही. याच पक्षात राहून मी माझी २०२४ ची विधानसभेची निवडणूक लढवणार आहे.” रोहिणी खडसे यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, रक्षा खडसे भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि तुम्ही त्यांच्याविरोधात उभे असलेले उमेदवार श्रीराम पाटील यांचा प्रचार करणार आहात. त्यामुळे बारामतीप्रमाणे रावेरमध्ये तुमच्या कुटुंबात सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. यावर काय सांगाल? या प्रश्नावर रोहिणी खडसे म्हणाल्या, इथे बारामतीसारखी परिस्थिती नाही. रावेरमध्ये विचारांची लढाई आहे, कुटुंबाची नाही. रक्षा खडसे भाजपाच्या विचारधारेवर निवडणूक लढवत आहेत आणि मी शरद पवारांच्या विचारांवर काम करतेय. मी कुठल्याही व्यक्तीविरोधात निवडणूक लढवत नाहीये. विचारधारेला घेऊन आम्ही दोघी निवडणुकीला सामोऱ्या जात आहोत. माझा लोकांवर विश्वास आहे, लोक महाविकास आघाडीच्या पाठिशी उभे राहतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत