
🌻 प्रा रणजीत मेश्राम
परवा भर कर्नाटक विधानसभा सभागृहात कांग्रेसचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी , 'नमस्ते सदा वत्सले .. ' ही संघप्रार्थना म्हणून कहर केला. कांग्रेसची भूमिका व शिवकुमारांचे वागणे अचंबित करणारे होते.
ते एक ओळ म्हणून थांबले नाहीत. संपूर्ण कडवे , 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे , त्वया हिन्दूभूमे सुखं वर्धितोहम | महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे , पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते|' .. मुखोदगत गायिले. कांग्रेस गोटाला हा धक्का होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या तेव्हा हजर होते. विशेषकर म्हणजे कांग्रेसचे अ भार अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकचे आहेत.
हे केव्हा घडतेय ? जेव्हा राहुल गांधी हे रा स्व संघाला फैलावर घ्यायची एकही संधी सोडत नाहीत. संघ हा नकारात्मक आहेच , रुजवायला पूर्ण ताकद झोकतात. तेव्हा काँग्रेसच्या गडात हे घडतेय. विरोधाभासाचा हा कळस झालाय. कर्नाटक व देशभर भाजप गोटात याचा आनंदीआनंद आहे.
कांग्रेस ही कर्नाटकात बहुमतात आहे. २२४ विधानसभा सदस्यांच्या कर्नाटकात बहुमताला ११३ सदस्य लागतात. कांग्रेसकडे १३५ सदस्य आहेत. भाजपकडे केवळ ६६ सदस्य आहेत. इतके स्पष्ट बहुमत असताना कांग्रेसमध्ये हे घडतेय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीने संपूर्ण दक्षिण भारत लक्षवेधी झाले असताना कर्नाटकातील ही घटना चर्चेत आलीय. आश्चर्य याचे की डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री पदासह कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
शिवकुमार यांनी हे का करावे ? मुख्यमंत्री पदाचा दावा असा संघ’नमस्ते पर्यंत न्यावा ? कांग्रेसचे चरित्र इथेच संशयित असते. ते सांगतात एक , करतात वेगळेच ! वरुन शिवकुमार पत्रकारांना सांगतात , ‘मी जन्मजात कांग्रेसी आहे. माझ्या रक्तात कांग्रेस आहे. पक्षश्रेष्ठी जे करतील ती माझ्यासाठी दिशा असते’. मग सभागृहात संघप्रार्थना का म्हटली ? प्रारंभाच्या काळात मी संघात होतो हे खरंय. विशिष्ट प्रश्नांनी ती आठवली म्हणून म्हणालो. तो प्रसंग फार ताणू नये. संघ आणि भाजप फरक आहे. संघ कर्नाटकात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतेय असेही ते म्हणाले.
६३ वर्षाचे शिवकुमार हे राजकारणात दबंग आहेत. ३६ वर्षापासून ते आमदार म्हणून निवडून येतात. आधी सथनूर मधून यायचे. आता कनकपूरा येथून येतात. सांपत्तिक स्थितीने भारी मजबूत आहेत. उद्योजक आहेत. आमदारांतही त्यांना मानणारे संख्याबळ मोठे आहे. मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षासाठी ठरले होते असा दावा त्या गोटातून सांगितला जातो. येत्या नोव्हेंबरात सिद्धरामय्यांची अडीच वर्षे पूर्ण होतात. २०२३ ला निवडणुका झाल्या होत्या. तेच नेमके कारणसूत्र दिसते. दुसरे काय ?
सिद्धरामय्या गट मात्र असे अडीच वर्षाचे ठरल्याचे नाकारतात. पक्षश्रेष्ठीही याबाबत कधी बोलत नाहीत. पण, मधल्या काळात इक्बाल हुसैन या आमदाराने शिवकुमारांच्या बाजूने १०० आमदार असल्याचे जाहीरपणे सांगितले. दूसरे शिवगंगा या आमदाराने लवकरच राज्यात सत्तांतर होईल. शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील. पुढची अडीच वर्षे व नंतरची पाच वर्षे तेच मुख्यमंत्री असतील हे घोषित करुन टाकले. नंतर या दोघांनाही पक्षाकडून कारणे दाखवा नोटीसी मिळाल्या. अर्थात आतल्या आत बंडाळीची बंडाळीची धुसफूस आहे , हे स्पष्टच आहे.
अधूनमधून शिवकुमारही धक्के देत असतात.गेल्या फेब्रुवारीत कोईम्बतूर येथे महाशिवरात्री मेळावा झाला. तिथे गृहमंत्री अमित शाह मुख्य होते. त्या मेळाव्याला शिवकुमार हजर राहीले. तेव्हाच अनेकांची काने टवकारली. मधल्या काळात कुंभमेळा झाला. त्या कुंभमेळ्यात गंगेत डुबकी मारायला शिवकुमार सपत्निक गेले. त्याचे प्रसारण केले. नंतर कुंभमेळा आयोजनास्तव मुख्यमंत्री योगी यांची स्तुती केली.
हे सर्व पाहता , राजकारणाचे वेगळेच संस्कार दिसतात. भूमिकेच्या राजकारणाची विल्हेवाट लावायचे उच्चस्तरीय योजन दिसते. हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे काय ? विषमतेवर आधारित समाजरचनेत मूल्यमापन कसे ? आधी सामान्य माणूस केंद्रिभूत करुन राज्य करू यात कल्याणकारितेचा गाभा होता. आता घरी तुळस लावा .. असे असेच कृतीकार्य झाले. वरुन बेरजेचे राजकारण असे नाक उंचावून सांगितले जाते.
शिवशंकर यांचा मार्ग कोणता ? नवी लागण तर लागली नसेल ? तसेही महाराष्ट्राने नवी राजकीय दृष्टी दिलीच आहे !
० रणजित मेश्राम लेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासात साहित्यिक आणि समीक्षक आहेत
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत