बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का? कशी? आणि कशासाठी साजरी करायची ? – आयु. अशोक भवरे
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
बौद्ध लोक आपला मार्ग दाता आहे, या महामानवाने आपले गुलामगिरीचे जीवन संपूर्ण बदलून स्वाभिमानी जगणं शिकवलं म्हणून अतिशय जोशात, उत्साहात साजरी करतात, आणि करायचाच पाहिजे,का नको करायला?
आंबेडकर विचाराने प्रेरित झालेले सुद्धा आप आपल्या परीने साजरी करतात.
जयंती साजरी करण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्या त्या महामानवाचे विचार पुढच्या पिढीला माहिती करून देण्यासाठी.
जयंतीनिमित्त मिरवणूक काढली पाहिजे? मिरवणूक यांच्यासाठी काढली पाहिजे की आमच्या या महामानवाने दाखवलेल्या वाटेवर आम्ही एकत्र असून एकत्रितपणे त्यांचे विचार आम्ही अनुसरून करीत आहोत,त्या मार्गाने आम्ही वाटचाल करीत करीत आहोत.
परंतु आज असं होताना दिसून येत आहे का? एका पाश्चात्य विचारवंत असं म्हणतो की, व्यक्ती मरण पावतात,त्याचे विचार चिरकाल टिकणारे असतात, यापुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की अनुयायी योग्य असेल तर ठीक नाहीतर त्या महामानवाचे विचारही लुप्त होतात.
आजच्या जयंतीचे स्वरूप पाहता हे १००/ टक्के योग्य आहे असे वाटत नाही काय? आज वर्गणीच्या नावाने समाज बांधवांकडून ५०० रुपया पासून ते ५०००/ रुपये सक्तीने अनेक जयंती मंडळ वसूल करताना दिसून येतात, हाताच्या बोटावर मोजता येतील असे तुरळक जयंती मंडळ सोडले तर बहुतांश जयंती मंडळाचा वर्गणीचा पैसा कशावर खर्च होत आहे? ६० ते ७० टक्के पैसा डीजे वर अनावश्यक पणे खर्च होताना दिसून येत आहे,डीजे तालावर नाचताना ते अंगविक्षेप, फॅशनच्या नावाखाली फाटके, तोकडे कपडे घालून, केसांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावून नाचत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या विचारांची वृद्धिंगत करतो आहोत? जयंती संपली की किती जयंती मंडळ पारदर्शक पद्धतीने समाजाला हिशोब देतात?.
एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब सर्व समाजांचे हितचिंतक म्हणायचे आणि दुसरीकडे आपल्या वागण्यातून भीमजयंती विषयी लोकांत अनादराची भावना निर्माण करायची?.
आम्हाला आज भीमजयंती खालील कारणासाठी साजरी करावयाची आहे,ती करताना मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त नसून अनुयायी आहे, आणि मरेपर्यंत एक भीम अनुयायी म्हणूनच भीम विचार प्रसारीत करण्यासाठी मिरवणूकीचा, जयंतीचा उपयोग करील.
१८९१ ला जन्मलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण १९५६ ला झाले या उण्यापु-या ६५ वर्षाच्या कालखंडात सर्वात महत्वाचे कार्य केले ते म्हणजे गेल्या ५००० वर्षांपासून आम्ही तोंड असून मुके होतो,कान असून बहिरे होतो, स्वाभिमान म्हणजे काय हे आम्हाला माहीत नव्हते असं पशू पेक्षाही हीन अवस्थेत आम्ही जगत होतो अशा आम्हा सर्वांच्या जीवनात आम्हाला हा मूकनायक भेटला आणि आमचं सर्व जीवन बदलून गेले अशा मूकनायकाची गाथा सांगण्यासाठी जयंती साजरी करायची आहे.
डुक्कर, मांजर,कुत्रे यांना पाणी पिण्याचा हक्क होता, परंतु माणसा सारखे माणसं असून सुद्धा आम्ही शुद्र असल्याने आम्हाला तो हक्क नव्हता तेव्हा या महामानवाने आग विझवण्याच कार्य करणाऱ्या पाण्यालाच चवदार तळ्याच ओंजळीत पाणी घेऊन संपूर्ण तलावलाच आग लावली, आणि आमच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी व आम्ही सुद्धा तुमच्या सारखेच माणसं आहोत हे समाजाला पटवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महामानवाचे कार्य आजच्या पिढीला कळण्यासाठी आम्हाला जयंती साजरी करायची आहे.*
आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्ही वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, कोणत्याही जातीतील महिला ही शुद्र नसते हे कृतीतून दाखवून देण्यासाठी मनुस्मृतीचे दहन करण्यारे ग्रंथप्रेमी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार आजच्या पिढीला व सर्व समाजाला सांगण्यासाठी आम्हाला जयंती साजरी करायची आहे.
जन्मापासून तो शुद्धि आहे म्हणून त्यांच्यावर सतत अन्याय करणारा समाज, डब्बे,फळा बाटतो म्हणून वर्गाबाहेर बसून शिकणारा हा संपूर्ण जगातील न. १ चा विद्वान बनतो, स्वतंत्र भारताचे संविधान बनवताना आपल्यावर झालेल्या कोणत्याही अत्याचार, अन्याय यांचा बदला न घेता सर्व समाजाला एकसंघ कसे बांधता येईल अशा राष्ट्रप्रेमी,महान संताची माहिती सांगण्यासाठी जयंती साजरी करायची आहे.
मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीयच आहे असं राष्ट्रप्रेम निर्माण करणा-या महामानवाच देशभक्ती सांगण्यासाठी जयंती साजरी करण्याची आहे.
माझ्यासाठी माझा समाज अतिशय महत्त्वाचा आहे, माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी मी माझ्या चार अपत्ये चा बळी देण्यासाठी त्याग करायला तयार आहे,त्याच समाजाच पूर्ण विकास करण्यासाठी जीवाची पर्वा न करणारे परंतु या युध्दात आपले मरण झाले तर आपल्या समाजाच्या विकासाला खीळ बसेल, किंवा अजून जास्तीचा काळ लागेल म्हणूनच गांधीजीचा जीव वाचवणा-या जीवनदात्या महामानवाचे कार्य आजच्या पिढीला माहिती व्हावी म्हणून जयंती साजरी करायची आहे.
महिला सुद्धा माणूस आहे,ती भोग वस्तू नाही, तिला समान हक्क देण्यासाठी संपूर्ण जगात सर्व प्रथम बाळंतपणाची रजा देणारे, संपूर्ण जगात कोणत्याही प्रकारची आंदोलने न करता मतदानाचा हक्क देणारे, हिंदू कोड बिल द्वारे वारसा हक्क, दत्तक हक्क, घटस्फोट कायदा, संपत्ती हक्क यांसारखे महिलांच्या हितासाठी एक भाऊ, एक पिता करणार नाही असा महिला उद्धारक महामानव महिलांना समजावून सांगण्यासाठी जयंती साजरी करायची आहे.
लहान मुले उद्याचं भविष्य आहे म्हणून जन्मापासूनच ते १४ वर्षांपर्यंत त्यांचे आरोग्य, शिक्षण मोफत मिळवून देणारा एक पालक समजून सांगण्यासाठी जयंती साजरी करायची आहे.
वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य यामुळे या देशातील एससी, एसटी, ओबीसी व महिलांचा जो आतापर्यंत छळ होत होता, आणि अजूनही होत आहे, तुमच्या संरक्षणासाठी संविधान आहे,हे संविधान जागृती करण्यासाठी, यासाठी बाबासाहेब यांना कोण कोणत्या संकटाला सामोरे जावे लागले याचा इतिहास सांगण्यासाठी या महामानवाची जयंती आम्हाला साजरी करावयाची आहे.
स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय यावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी, अंधश्रद्धा निर्मूलन करुन २२प्रतिज्ञेचे प्रसार करुन सत्यावर आधारित बौद्ध धम्म वाढवण्यासाठी, रुजविण्यासाठी या विचारधाराचे अनुयायी तयार करण्यासाठी जयंती साजरी करायची आहे.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला,बालक, गरीब, श्रीमंत, सर्व जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, लोकांमध्ये आम्ही भारताचे लोक ही ऐक्याची भावना निर्माण करणा-या महामानवाच संघर्ष सर्वांना समजण्यासाठी आम्हाला महामानवाची जयंती साजरी करायची आहे.
आज आम्हाला गौरव पूर्ण जीवन प्राप्त झाले आहे ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच त्यांचे हे कार्याची जनजागृती करण्यासाठी आम्हाला ही जयंती साजरी करायची आहे.
एकतेत विविधता व वैविध्य तीत एकता आणि सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्कृती रुजविण्यासाठी आणि त्यांचा हा दृष्टिकोण समाजात रुजविण्यासाठी आपल्याला जयंती साजरी करायची आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करायला जागा अपुरी पडेल म्हणून आपल्याला त्यांच्या कार्याची जी जी माहिती आहे त्याचा प्रसार करण्यासाठी आम्हाला जयंती करायचे आहे.
म्हणूनच व्यसनाधीन होऊन, बेहोश होऊन बेताल नाचणं म्हणजे जयंती नव्हे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन त्यांचे अनुकरण करणे म्हणजे जयंती होय. आणि अशा अर्थाने जयंती साजरी झाली तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी करण्याच समाधान लाभेल असे आम्हाला वाटते
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक सिडको, नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत