दिन विशेषदेशभीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

!! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मदिन !!

राजेंद्र पवार
९८५०७८११७८


(१४ एप्रिल )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भीमराव रामजी आंबेडकर
जन्म:१४ एप्रिल १८९१मृत्यू:६ डिसेंबर १९५६. एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार. वडील रामजी लष्करातून निवृत्त झाल्यावर कुटुंबासह नोकरीसाठी साताऱ्यास आले. त्यामुळे आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये झाले.
आंबेडकरांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. पदवी घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली व १९१३ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए. व पीएचडी. ह्या पदव्या मिळविल्या.
भारतात परत आल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानची नोकरी धरली. बडोदे येथील वास्तव्यात त्यांना अस्पृश्य म्हणून जे अत्यंत कटू अनुभव आले, त्यांमुळे त्यांनी ती नोकरी सोडली व मुंबईस येऊन सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. तोपर्यंत अस्पृश्य म्हणून पदोपदी त्यांची जी मानखंडना झाली, तिचा परिणाम त्यांच्या मनावर फार झाला.
अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता त्यांनी अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरूवात केली; मुंबई येथे ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे पाक्षिक काढले, कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची त्याच संस्थानातील माणगाव येथे त्याच वर्षी परिषद घेतली व स्पृश्य-अस्पृश्यांच्या सहभोजनांचे कार्यक्रम घडवून आणले.
नागपूर येथे मे १९२० मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी बोलावली. अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळाने नेमावेत. या महर्षी शिंद्यांच्या ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ च्या धोरणाचा या परिषदेत निषेध करण्यात आला. त्यांनी हाती घेतलेल्या ह्या प्राथमिक कार्यातच त्यांचे नेतृत्वाचे गुण दिसून आले.
हे लोकजागृतीचे कार्य चालू असताना, स्वतःचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याकरिता, ते मुख्यतः आपले स्नेही नवल भंथेना आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या मदतीने इंग्लंडला गेले. त्यांनी लंडन विद्यापीठाची डी. एससी . ही दुर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टरही झाले. मायदेशी परतताच मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. सरकारी विधि-महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकाचे व प्राचार्याचेही काम केले. तथापि अस्पृश्यांच्या हिताचे कार्य त्यांनी चालूच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ ही संस्था स्थापन केली.
“शिका व संघटित व्हा” हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२६ साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरला भरलेल्या महार-परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधूंना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला. त्यामुळे शेकडो महारांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सुरुवात केली.
१९२७ मध्ये कुलाबा जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यावर अस्पृश्यांना इतरांप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृति जाळली. त्यांच्या काही अनुयायांसह त्यांच्यावर सनातन्यांनी खटला भरला. खटला जिद्दीने लढवून त्यांनी स्वतःची व आपल्या सहकाऱ्यांची निर्दोष सुटका करून घेऊन चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा अस्पृश्यांचा हक्क प्रस्थापित केला.
१९२८ साली भारतात आलेल्या सायमन आयोगावर इतरांनी बहिष्कार घातला होता. पण अस्पृश्य बंधूचे हित लक्षात घेऊन आंबेडकरांनी मात्र त्या मंडळासमोर आपली साक्ष नोंदवून, अस्पृश्य लोकांकरिता सरकारने काय करावयास पाहिजे, हे सांगितले. अस्पृश्यांना इतरांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे, म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांसह १९३० साली नासिक येथे काळाराम मंदिर-प्रवेशासाठी सत्याग्रह केला. त्यात त्यांना व त्यांच्या अनुयायांना मार खावा लागला, पण पूर्वीच्याच जिद्दीने त्यांचे कार्य चालू राहिले. त्यांनी बहिष्कृत भारत, जनता, समता, इ.वर्तमानपत्रांद्वारे त्याचप्रमाणे बहिष्कृत हितकारिणी व इतर संस्थाद्वारे अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द आवाज उठविला व त्यांच्यात आत्मविश्वास, अन्यायाविरूध्द लढण्याची जिद्द, वाईट चालीरीती सोडून देण्याची प्रवृत्ती, शिक्षणाची व स्वच्छतेची आवड निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला.
आंबेडकर १९३० मध्ये गोलमेज परिषदांसाठी इंग्लंडला गेले. तिन्ही परिषदांना ते उपस्थित राहिले. तेथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू मांडली आणि अस्पृश्यांच्या इतर हक्काबरोबर स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली व ती पंतप्रधान मॅक्डॉनल्ड ह्यांनी मंजूरही केली. त्यातूनच गांधी व आंबेडकर ह्यांच्यात मतभेद निर्माण झाले.
गांधीना हा अस्पृश्यांचा स्वतंत्र मतदारसंघ मान्य नव्हता. तो रद्द व्हावा म्हणून त्यांनी पुणे येथे येरवड्याच्या तुरूंगात प्राणांतिक उपोषण आरंभिले. त्या वेळी गांधी व आंबेडकर ह्या दोघांत राखीव जागांच्या संख्येबाबत आणि राखीव जागा ठेवण्यासंबंधी घ्यावयाच्या जननिर्देशाच्या मुदतीविषयी चर्चा होऊन २४ सप्टेंबर १९३२ रोजी सुप्रसिध्द पुणे करार झाला. त्यान्वये पाच वर्षानंतर जननिर्देश घेण्यात यावा, असे ठरले. या घटनेनंतर तीन वर्षानी त्यांची पत्नी रमाबाई मरण पावली.
त्यांनी १९३६ मध्ये स्वतंत्र मजूरपक्षाची स्थापना केली . ते प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. १९३९ साली येऊ घातलेल्या संघराज्य पध्दतीला त्यांनी विरोध केला व दारुबंदीच्या धोरणावर टीका केली, १९४२ साली त्यांनी ‘ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्टस फेडरेशन’ नावाचा एक देशव्यापी पक्ष स्थापन केला.
या पक्षातर्फे अस्पृश्यांकरिता त्यांनी अनेक लढे दिले. १९४२ पासून १९४६ पर्यंत ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते. या काळात त्यांनी अस्पृश्यांची शैक्षणिक व आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली व मुंबईस सिध्दार्थ महाविद्यालय सुरू केले. ह्याच संस्थेने पुढे औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय स्थापिले. भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधिमंत्री म्हणून आले. स्वतंत्र भारताच्या संविधानसमितीचे ते सभासद झाले.
पुढे ते संविधान-लेखन-समितीचे अध्यक्षही झाले. अस्पृश्यता नामशेष करणारा संविधानातील ११ वा अनुच्छेद हा आंबेडकरांचा विजयच आहे. सतत परिश्रम घेऊन, चर्चा करून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुमारे तीन वर्षांत संविधानाचा मसुदा तयार केला. ह्या महत्त्वाच्या कामगिरीबरोबरच त्यांनी ‘हिंदु कोड बिल’ लोकसभेला सादर करण्याचा बहुमान मिळविला.
डॉ. शारदा कबीर ह्या सारस्वत महिलेशी १५ एप्रिल १९४८ रोजी त्यांनी दुसरा विवाह केला. ह्या सुमारास त्यांचे नेहरूंशी व काँग्रेस धोरणाशी फारसे पटेना. म्हणून मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला.हिंदुधर्म जातिसंस्थेमुळे पोखरला गेला आहे, अशी त्यांची ठाम समजूत होती. स्पृश्यांकडून अस्पृश्यांवर होत असलेला अन्याय धर्मांतरावाचून दूर होणार नाही, या त्यांच्या दृढ श्रध्देनुसार त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मोठ्या समारंभाने अनेक अनुयायांसह बौध्द धर्म स्वीकारला. यानंतर त्यांनी बौध्द धर्माच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले. त्यांच्या मनात ‘रिपब्लिकन पक्ष’ स्थापन करावयाचा होता, परंतु तो त्यांच्या हयातीत स्थापन झाला नाही.
आंबेडकरांना वाचनाचा अतिशय नाद होता. विद्यार्थीदशेत त्यांना संस्कृतचे अध्ययन करता आले नाही. पुढे ते मुद्दाम चिकाटीने संस्कृत शिकले. ग्रंथांशिवाय आपण जगूच शकणार नाही, असे त्यांना वाटे. मृत्यूसमयी त्यांच्या ग्रंथालयात सुमारे २५,००० दुर्मिळ ग्रंथ होते.
हिंदुस्थानची आणि काश्मीरची फाळणी ह्या भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने अटळ गोष्टी आहेत, असे त्यांना वाटे . भारताच्या तत्कालीन परराष्ट्रीय धोरणामुळे भारतास एकही सच्चा मित्र राहणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. देवनागरी लिपीतील हिंदी ही राष्ट्रभाषा असावी व ती पूर्णपणे अंमलात येईपर्यंत इंग्रजी भाषा असावी, असे त्यांना वाटे. त्याचप्रमाणे छोटी राज्ये हाच एकमेव राज्यपुनर्रचनेचा मार्ग आहे .असे त्यांचे मत होते. त्यानी दोनदा लोकसभेची निवडणूक लढविली. पण ते पराभूत झाले. तथापि राजकारणातून ते निवृत्त झाले नाहीत.
आंबेडकरांचे ग्रंथरूप लेखन इंग्रजी भाषेतीलच आहे. त्यांनी एम.ए. पदवीकरिता लिहिलेल्या प्रबंधाचा विषय ‘प्राचीन भारतातील व्यापार (एन्शंट इंडियन कॉमर्स)’ असा होता.‘भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा: एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक अध्ययन’ या विषयावरील त्यांचा प्रबंध पुढे द इव्होल्यूशन ऑफ प्रॉव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाने १९२४ मध्ये प्रकाशित झाला. प्रस्तुत प्रबंधात त्यांनी ब्रिटिश सरकारचे आर्थिक धोरण ब्रिटनमधील उद्योगधंद्याच्या हिताच्या दृष्टीने आखले जाते, हे सिध्द केले. कोणताही देश झाला, तरी त्यात एखाद्या वर्गावर अन्याय चालू असणे साहजिक आहे. पण त्यामुळे त्या देशाला राजकीय अधिकार नाकारता येत नाही, यासारखी तर्कशुध्द मीमांसा प्रस्तुत ग्रंथात आढळते. आंबेडकरांचा अर्थशास्त्रविषयक दुसरा प्रबंध म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा होय. तो १९४६ मध्ये प्रकाशित झाला. रूपयाचे पौंडाशी प्रमाण बसवून इंग्रजी राज्यकर्त्यांनी केवळ इंग्रजी व्यापाऱ्यांचेच हित साधून भारताचे कसे नुकसान केले, यावर त्यांनी प्रस्तुत प्रबंधात प्रकाश टाकला आहे
धर्म आणि जातिसंस्था यांसंबंधी डॉ. आंबेडकरांचे विचार क्रांतिकारक होते. १९३६ साली लाहोर येथील जातपात-तोडक मंडळाच्या वार्षिक संमेलनातील अध्यक्षीय भाषण ॲनाय्‌हिलेशन ऑफ कास्ट‌्स (१९३७) या पुस्तकात त्यांनी प्रसिध्द केले. जातिव्यवस्था ही श्रमिकांच्या अनैसर्गिक विभागणीस व हिंदू समाजाच्या ऐतिहासिक पराभवास, नैतिक अधोगतीस तसेच त्याच्या दुबळेपणास कारणीभूत आहे; जातिव्यवस्थेचा मुख्य आधार म्हणजे हिंदूचा धर्मभोळेपणा असून तो नष्ट करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांच्या तात्विक अधिष्ठानावर हिंदू समाजाची पुनर्घटना करावी. यासारखी प्रेरक विचारसरणी आंबेडकरानी प्रस्तुत पुस्तकात मांडली आहे. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अन‌्टचेबल्स (१९४५) या ग्रंथात त्यांनी काँग्रेसच्या अस्पृश्योद्वाराच्या कार्यक्रमाच्या मर्यादा आणि अपयश यांची चर्चा केली आहे.
आंबेडकरांच्या व्यासंगाचे व संशोधनकुशलतेचे प्रतीक असलेला ग्रंथ म्हणजे हू वेअर द शूद्राज ?(१९४६) हा होय. विद्यमान शूद्र म्हणजे पूर्वकालीन क्षत्रिय होत. ब्राम्हणांशी संघर्ष झाल्यामुळे त्यांना शूद्रत्व प्राप्त झाले, असा निष्कर्ष त्यांनी या ग्रंथात काढला आहे. द अन‌्टचेबल्स (१९४८) या नावाचे त्यांचे पुस्तकही या संदर्भात उल्लेखनीय आहे. बुध्द अँड हिज धम्म हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रसिध्द झाला (१९५७).
धर्माच्या रूढ कल्पनांहून बौध्द धर्माची कल्पना वेगळी असून ती समाजाच्या पुनर्रचनेशी अधिक निगडित आहे. त्यामुळे सामाजिक व नैतिक मूल्ये हेच बौध्द धर्माचे खरे अधिष्ठान आहे. लो. टिळकांच्या गीतारहस्याप्रमाणे आंबेडकरांनी बौध्द धर्माचे कालोचित रहस्य या भाष्यग्रंथात विशद केले आहे.
आंबेडकरांच्या राजकीय विषयांवरील ग्रंथापैकी थॉट‌्स ऑन पाकिस्तान (१९४०) या पुस्तकात पाकिस्तान झाल्यास हिंदूच्या उत्कर्षाचा मार्ग मोकळा होईल, असा युक्तीवाद केला होता. यांशिवाय रानडे, गांधी अँड जिना (१९४३) थॉट‌्स ऑन लिग्विस्टिक स्टेट‌्स (१९५५) यांसारखी त्यांची पुस्तकेही विचारप्रेरक आहेत. डॉ. आंबेडकरांचे मराठी लेखन अल्प असून ते मुख्यतः त्यांनी काढलेल्या विविध वृत्तपत्रांतून विखुरलेले आहे.
दिल्ली येथे त्यांचे आकस्मिक निधन झाले. श्रेष्ठ कायदेपंडित व अस्पृश्यांचा तडफदार नेता म्हणून आंबेडकरांची स्मृती चिरंतन राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश तसेच आंतरजालमधून
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
८१६९४३१३०६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!