स्टीव्ह वॉ एक अजरामर खेळी मानवतेसाठी
कलकत्त्यात स्टीव्ह वॉ एक अजरामर खेळी १९९८ साली खेळून गेला. ती क्रिकेटच्या मैदानावर नव्हती. ती ऑस्ट्रेलिया साठी नव्हती. ती मानवतेसाठी होती.ती खेळायला बॅट लागत नाही. अत्यंत उदार आणि संवेदनाक्षम मन लागतं. ते स्टीव्ह वॉ कडे होतं.
खरं तर १९९८च्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला चोप दिला होता. चार दिवसात मॅच संपली होती. तो रूमवर परतला तेंव्हा त्याला उदयन ह्या संस्थेचे एक आमंत्रण मिळालं. ती संस्था कलकत्त्यात कुष्ठ रोग्यांच्या मुलांसाठी कार्य करते.
आमंत्रण फक्त स्टीव्ह वॉ लाच का दिलं गेलं?
कारण त्याने मॅच सुरू असताना एक मुलाखत तिथल्या वर्तमानपत्राला दिली होती. त्यात म्हटलं होत ” मला वंचित (underpreviliged) मुलांसाठी काम करायचंय. त्यांना मदत करायची आहे.”
दुसऱ्या दिवशी उदयन संस्थेच्या शामलू दुडेजा बरोबर स्टीव्ह वाॅ उदयन मध्ये गेला. शहराच्या सीमारेषेवर बराकपुरला जायला एक तास लागला.
उदयन ही संस्था रेव्हरंड जेम्स स्टीवन्स ने
उभी केली होती. १९७० साली तिथल्या पिलखाना झोपडपट्टीतल्या कुष्ठ रोग्यांच्या ११ मुलांना घेऊन त्याने ही संस्था सुरू केली. आईबाप मुलांना सोडत नव्हते. त्यांना भीती होती, मुलं पळवली तर जाणार नाहीत? त्यांचं धर्मांतर तर केलं जाणार नाही.? या मुलांना एक चांगलं आयुष्य द्यायचं हाच त्याचा उद्देश. तो काळ असा होता की कुटुंबात एकाला कुष्ठ रोग झाला की अख्ख कुटुंब बहिष्कृत होई.मुलांना ना शिक्षण मिळे ना नोकरी.
स्टीव्ह वॉ तिथे गेला तेंव्हां उदयन मध्ये २५० मुलं होती.
स्टीव्ह म्हणाला ,” जिथून ही मुलं आली ती वस्ती पहायची आहे.”
त्याला तिथे नेण्यात आलं.समृध्द ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या स्टीव्हसाठी तो सांस्कृतिक धक्का होता. काळं प्लास्टिक, पत्रे, तुटलेल्या विटांनी बांधलेल्या त्या झोपड्या होत्या.चार दोन भांडी, एखादी चूल, चटई, चादर यापलीकडे तिथे काहीही नव्हतं. ना पाणी ना वीज.!
तिथले कुष्ठरोगी पाहून स्टीव्ह वॉ शहारला.
त्याने कधी कुष्ठरोगी पहिला नव्हता. अमक्याला कुष्ठ रोग्यासारखं वागवलं वगैरे वाक्प्रचार ऐकले होते.झडलेली बोटं, चेहरा, हात पाय तो प्रथमच पाहत होता.
तुटलेल्या बोटाची बाई मुलीचे केस विंचरत
होती. स्टीवने दुभाषा मार्फत तिला विचारलं, ” आयुष्या कडून काय अपेक्षा आहेत?”
” काहीच नाही” ती म्हणाली.
श्वास सुरू राहू देत ह्यापेक्षा ती काय सांगणार?
बोटं झडलेली एक बाई विणत होती. स्टीव्ह ते पाहून आश्चर्यचकित झाला.
स्टीव्ह म्हणाला” हे उदर निर्वाहासाठी काय करतात.”
त्याला उत्तर मिळालं, ” मुलं भिक मागतात”
त्याने विचारलं, ” मुली का दिसत नाहीत”
उत्तर आलं ,” त्या शरीर विक्रय करतात”
मैदानावर कठीण प्रसंगात धीरोदात्त पणे उभा राहणारा हा माणूस गहिवरला. त्याच्या मनाचा बांध फुटला. त्याची मुलगी त्यावेळी फक्त अठरा महिन्याची होती. बघता बघता ती त्याच्या डोळ्यासमोर मोठी झाली. आठ वर्षाची झाली, आणि शरीर विक्रय करतानाचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. नुसत्या विचाराने त्याला घाम फुटला
त्याने तिथल्या तिथे सांगितलं, ” ह्या मुलींसाठी काहीतरी करूया. त्यांना मुलाप्रमाणे, नवं, वेगळं, सन्मानाचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे.”
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात कुष्ठ रोग्यां बरोबरचा स्टिव्ह वाॅचा फोटो झळकला. शहरावर अशी भळभळणारी जखम आहे आणि औषध उपचार होत नाहीत, हे शहराला जाणवलं. एक सेलिब्रिटी ही गोष्ट एका नुसत्या एका फेरीने करू शकला.
स्टीव्ह वॉ तिथेच थांबला नाही. त्याने उदयन साठी पैसे उभारायचे ठरवले. तो , त्याचं नाव, त्याचा लौकिक,त्याची विश्वासार्हता, पणाला लावायला तयार झाला. तो खिशात हात घालणार होता.तो पुरस्कर्ते शोधणार होता. तो देणग्या जमावणार होता. तो मदतीसाठी कार्यक्रम आयोजित करणार होता. तो उदयन साठी जाहिरातीचे करार करणार होता. त्याने आपल्या संघाला सर्व कल्पना दिली. संघ त्याच्यामागे उभा राहिला. एक डिनर आयोजित केलं गेलं. खेळाडूंच्या विविध गोष्टींचा लिलाव केला आणि तिथल्या तिथे एक रक्कम दिली. उदयन कडे जागा होती
मुलींच्या हॉस्टेलच्या पायाचे पैसे उभे राहिले.
: त्याने एक मुलगी दत्तक घेतली. नाव लखी कुमारी. ती पोलिओमुळे पंगू झाली होती. आईवडील कुष्ठरोगी. तीचं मन पंगू झालं होते. उदयन मध्ये पाहिले सहा महिने तिच्या चेहऱ्यावर फक्त भकास भाव असत. नंतर ती नाचायला ,गायला लागली. अभ्यासातही हुशार होती.पण स्टीव्ह म्हणतो,” मुले दत्तक घेऊन फार साध्य होत नाही. ज्यांची निवड होत नाही ती मुलं हिरमुसतात. त्यापेक्षा सर्वांवर पैसे खर्च करणं योग्य.” ऑस्ट्रेलियातील एका दांपत्याने मुलींना ३०० बेड पाठवले. ती मुलं वेडावली. आयुष्यात पहिल्यांदा ती बिछान्यावर झोपत होती.
मग ऑस्ट्रेलियातून वैद्यकीय विद्यार्थी ह्या मुलांना वैद्यकीय मदत द्यायला स्वखर्चाने यायला सुरवात.झाली. २३ वर्ष झाली ह्या गोष्टीला. उदयन हा स्टीव्ह वॉ साठी आयुष्याचा भाग आहे.
तो म्हणतो, ” उदयन च गेट उघडून आत गेलो, कि वंचित मुलांसाठी काही तरी केल्याचं समाधान मिळतं.” हे समाधान पैशाने विकत मिळतं नाही. पैसे देऊन मिळतं.
स्टीव्ह वॉ साठी ही खेळी त्याने मिळवलेल्या वर्ल्ड कप एवढीच प्रिय आहे
मानवतेला झेंडा नसतो, धर्म नसतो, राष्ट्रगीत नसतं, देश नसतो, भाषा नसते हे स्टीव्ह वॉ ने दाखवलं. कुष्ठरोग्यांची सेवा करायला बाबा आमटेच व्हावं लागतं असं नाही. तो देवाचा माणूस. तो त्यांच्यातच राहिला. पण एक सेलिब्रिटी आपलं संपन्न आयुष्य जगता जगता, हृदयाचा एक कोपरा,आयुष्याचा छोटा काळ त्यांना देऊ शकतो. त्यातून शेकडोंच आयुष्य बदलू शकतो.
आजच्या, आयपीएल च्या समृध्द ताटात जेवणार्या क्रिकेटपटूंना एकच सांगायचंय.
जगा समृध्द ,जेवा भरपेट, पण दोन घास वंचितांसाठी काढून ठेवायला विसरू नका. काही कुटुंब त्यातून मीठ भाकर खातील.
मग आम्ही स्टीव्ह वॉ प्रमाणे तुमच्यासाठी म्हणू,” तेथे कर माझे जुळती”…
— द्वारकानाथ संझगिरी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत