सगळं कसं छान चाललं होतं…

प्रा. जयंत महाजन
देशातील पाहिजे ते पक्ष फोडले होते, पाहिजे ती चिन्हे काढून घेतली होती, भ्रष्टाचारी धुऊन घेतले होते, चारशे पारचा नारासुद्धा दिला होता. सगळं कसं छान चाललं होतं आणि अचानक कुणीतरी ‘चंद्रचूड’ नावाचे गृहस्थ मधेच आले अन् साराच घोळ झाला. सर्वोच्च न्यायालयात उद्योगपतींनी त्यांची नावे बाहेर पडू नयेत म्हणून वकिलांची फौज उभी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी धारेवर धरले. स्टेट बँकेने दिलेल्या यादीत नावे होती, पण कोणी कोणाला किती दिले, याची माहिती मिळत नव्हती. उद्योगपतींना किंवा फेक कंपन्यांच्या नावे पैसे देणाऱ्यांना एवढी भीती कसली वाटली असावी? ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ला सर्वोच्च न्यायालयाने उघडं पाडलं, हे मान्य करावंच लागेल. कारण ‘धनुष्यबाण’ ओढून पाहिला, पण तो भलतीकडेच गेला. ‘घड्याळा’चे काटे उलटे फिरवले, पण तेही पुढे जाऊन चालेना. ‘पंजा’ची बोटे छाटायचा प्रयत्न केला, पण हाताची ताकद कमी होईना. ‘इंजिन’ सेल्फ स्टार्ट करून पाहिलं, तर ते दोन-तीन शहरांच्या वर पळेना. अशी कसलीच गॅरंटी देता येईना. ज्यांना पळवायचं होतं त्यांना पळवलं. आता कोणी पळवायचं राहिलंही नाही.
तरीपण भाजपच्या गोटात घबराट का निर्माण होते, हेच कळत नाही. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये कोणी ईडी, सीबीआयला घाबरून पळापळ केल्याचे दिसत नाही. तेथे आपल्याच पक्षाला सोडून कुणीही पळून गेलेले दिसत नाही. मग आपल्या महाराष्ट्राच्या रक्तातच ही लाचारी का? आज महाराष्ट्रात नारायण राणे, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, राज ठाकरे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ४० आमदार शरण गेले की लाचार झाले, हे जनताच ठरवेल. आता पुढचा एक महिना भाजपला काहीच करायचं नाही. ही सगळी फौज एकट्या उद्धव ठाकरेंवर तुटून पडणार आहे. अर्वाच्च भाषेत त्यांना शिव्या देणार आहेत.
अमित शहा, देवेंद्र फडणवीस मनातल्या मनात हसतील की, मराठी रक्त किती सोपे आहे विकत घेण्यास. भाजपचे राजकीय डावपेच सर्वत्र यशस्वी ठरत आहेत व त्यांच्या मनाप्रमाणे सर्व घडत आहे, हेदेखील विरोधी पक्षांनी मान्य करायला पाहिजे. भाजपची रणनीतीच तशी असते. पासवान यांचा पक्ष फुटला. भाजपने त्यांचा भाऊ पशुपती कुमार पारस ज्याच्याकडे अधिक खासदार होते, त्याला जवळ करत केंद्रात मंत्रिपद दिलं. लोकसभेची टर्म संपताच त्यांनी पुन्हा खासदारकीचे तिकीट मागितलं. भाजपने नकार दिला. आज पशुपतींकडून मंत्रिपदही गेलं आणि ते ‘एनडीए’तून बाहेर फेकले गेले. उद्या हेच शिंदे, अजित आणि राज ठाकरेंबद्दल घडणार नाही, याची खात्री देता येईल का? जवळपास २५ वर्षे जुन्या शिवसेनेचे भाजपवाले झाले नाही ते काल-परवा जन्माला आलेल्या गटाचे काय होणार? भाजप हा अजगर आहे व त्याची भूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रादेशिक पक्ष संपणार, उरणार फक्त भाजप. हे सांगूनही राज, शिंदे, अजित भाजपच्या दावणीला जात असतील तर त्यांना कोण अडवणार?
मुळात भाजपने नैतिकता, विचार, विश्वास गमावला आहे. सत्तेची झापडं डोळ्यावर असल्याने त्यांना ते दिसणार नाही. मुळात पक्ष फोडणे, नेते फोडणे हे वरवरचं राजकारण आहे. त्यामागचं पूर्वनियोजनबद्ध धोरण हेच की, कट्टर भांडवलशाही राबवून उद्योगपतींचा नफा वाढवणे अन् या कट्टर रक्तपिपासू भांडवलशाहीसाठी भाजपचं कट्टर हिंदुत्व हा एक ‘परिस’ आहे. सरसंघचालक गोळवलकरांनी संघाला कुठल्याही भांडवलशाही उद्योगपतीपुढे झुकू दिले नव्हते. आताच्या संघात ती धमक नाही. आजचा भाजप भांडवलदारांच्या हातचं खेळणं बनलाय. यात संघ हतबल आहे असंच दिसतंय. आजचा मोदीप्रणीत भाजप अंबानी, अदानींचे बाहुले बनून देशावर हिंदुत्वाच्या नावाखाली भांडवलशाही लादतोय. विविध उद्योग, कंपन्या सरकारला देणग्या देऊन मिंधे करत आहेत. कंपन्या सांगतील तसे धोरण देशावर जबरीने लादले जात आहे. हिंडेनबर्ग रिपोर्ट आला, अदानींच्या खात्यावर वीस हजार कोटी कुठून आले? हा प्रश्न राहुल गांधींनी विचारून देशाला जाणीव करून दिली की, देश कोणत्या खड्ड्यात जातोय. एकीकडे देशाला हिंदुत्वाच्या नावाखाली बेशुद्ध ठेवायचं, तर दुसरीकडे देशाची समृद्ध अशी तिजोरी फोडायची.
इलेक्टोरल बॉण्ड तर भाजपचं थोबाड फोडणारं प्रकरण आहे. तरीही भाजपच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या लोकांना उमजून येणार नाही. ज्यांच्यावर कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच पक्षात का घेतलं जातं? हाच प्रश्न शहरातील शहाणी, ग्रामीण भागातील अडाणी जनता विचारतेय. याला समाधानकारक उत्तर पृथ्वीच्या अंतापर्यंत तरी सापडेल काय? भाजपसारखे सरकार असेल तरच आपली डाळ शिजेल, म्हणूनच कोणत्याही किमतीवर अदानी-अंबानी हे सरकार पडू देत नाहीत. सरकार मजबूत दाखविण्यासाठी भाजप नैतिकता धाब्यावर बसवत विरोधी पक्ष व नेते पक्षात घेऊन आपल्या विरोधातला आवाज दाबत आहे. साधारण २५ वर्षांपूर्वीच्या काळात राजकारण म्हणजे समाजकारण होते. आता राजकारण हा एक ‘गलिच्छ धंदा’ झालेला आहे, असे अनेक घडामोडींवरून सिद्ध होत गेले. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर नाथ पै, मधु लिमये, मधु दंडवते, पीलू मोदी, सुषमा स्वराज, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेते पुन्हा होणार नाहीत. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा करून सत्तेत आलेल्या मोदींचा कारभार बघून गालिबचा एक शेर आठवला.
‘वो बंद कराने आये थे तवायफों के कोठे, मगर सिक्कों की खनक देखकर खुद ही मुजरा कर बैठे।’
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत