२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन
२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१ मध्ये ‘युनेस्को’ च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. जगभरात हा दिन साजरा व्हावा यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिट्यूटने १९६१ सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले आणि त्यानंतर हा दिन २७ मार्च १९६२ पासून जगभरात साजरा होऊ लागला. कलेचा सामुदायिक आविष्कार अभिव्यक्त होण्याची पद्धत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आजतागायत बदलत गेली आहे. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत ‘थिएटर’ हा शब्द आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा समानार्थी शब्द त्याला वापरतो.
रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सार्या गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. ग्रीक, रोमन, ब्रिटीश, जर्मन, रशियन, पोलिश, अमेरिकन, चिनी, जपानी आणि भारतीय रंगभूमी यांचे एकमेकांशी आदानप्रदान झालेले नाही. रंगभूमीतील कलाविष्काराचे जागतिकीकरण व्हावे यासाठी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. भारतात तर संस्कृत मध्ये कालिदास, भास, भवभूती असे एकापेक्षा एक मोठे दिग्गज नाटककार होऊन गेले. भारतात बहुभाषिक रंगभूमी आणि तिचा आविष्कार वेगवेगळ्या कलेच्या प्रांतात प्रकटलेला आहे.
पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्या सारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके, लळित, तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली.
रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती ब्रिटीशकाळात १६व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या काळात जेव्हा शेक्सपियरने रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले त्याकाळापासून म्हणजे हॅम्लेट, मॅक्बेथ, ऑथेल्लो, किंगलियर या शोकांतिका किंवा एज यू लाइक इट, ट्वेल्थ नाईट अशा सुखान्तिका रंगभूमीवर गाजत होत्या, त्यावेळेस इंग्रजी रंगभूमीचा काळ हा सुवर्णकाळ मानला गेला. व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर ड्युमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने फ्रेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटके, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटके, अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांतीच केली. त्यात मराठीत किर्लेस्कर देवल यांच्या काळापासून ते तेंडुलकर, शिरवाडकर, गिरीश कर्नाड ते आजच्या एलकुंचवार, आळेकरांपर्यंत रंगभूमीवर झालेल्या उल्लेखनीय बदलाची रंगभूमीला नोंद ही घ्यावीच लागते. पूर्वी राजे, राणी, विद्वान आणि धनिक यांचा आश्रय रंगभूमीला मिळत असे. आजही विद्वान आणि धनिक रसिकांचा विविध माध्यमातून नाट्यकलेला लोकाश्रय लाभत आहे. महाराष्ट्रातील संगीत नाटक रंगभूमी हा देखील एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार मानला जातो. प्रतिभावंत नाटककार व दिग्दर्शक, कल्पक तंत्रज्ञ, आधुनिक तांत्रिक-यांत्रिक सुविधा, सुजाण अभिरुचि संपन्न रंगभूमीवरील वरील वेगवेगळे प्रकार वा रूपे उदयास आली, असे म्हणता येईल.
नाटय़प्रयोग व त्याचा प्रेक्षक यांच्या परस्पर संबंधा विषयीच्या वैशिष्टय़पूर्ण संकल्पनाही प्रयोगशील रंगकलेमागे दिसून येतात. अलीकडे तर पथनाट्ये होऊ लागली आहेत आणि त्यांच्या रूपाने रंगकला जशी बंदिस्त रंगमंदिरातून बाहेर पडली, तशीच ती विशिष्ट प्रकारच्या प्रेक्षक विषयक कल्पनांतूनही बाहेर पडली आहे. रंगभूमीचे हे प्रकार किंवा प्रयोग हे अखंडपणे होत राहतील. रंगभूमीवरील नाटका मधून कला आणि सांस्कृतिक आविष्कार जो होत आहे त्याच्या स्पंदनांचा आणि संस्कृतीच्या स्पंदनांशी किंवा आंदोलनाशी तिचा अतूट संबंध आहे. नागर रंगभूमी व लोकरंगभूमी (फोक थिएटर) यांच्यातील सीमारेषाही पुसट होऊ लागल्या आहेत. तेंडुलकरांचे ‘घाशीराम कोतवाल’ सारखे नाटक किंवा गिरीश कर्नाड यांची नाटके या दृष्टीने आधुनिक रंगभूमी आणि लोकरंगभूमी यांच्या विधायक समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. आजच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमी ही केवळ कला नव्हे, तर समाजातील ती एक कलात्मक व विकसनशील संस्था आहे हे लक्षात ठेवले, तर रंगभूमीच्या अभ्यासाच्या अनेक बाजू लक्षात येऊ शकतात आणि विश्वरंगभूमीच्या दृष्टीनेही भर पडू शकते.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत