
✍️ महत्त्वपूर्ण लेख,वाचा,अभ्यासा
लेखन – किरण रामी बाबुराव मोहिते
संपर्क – ९५६१८८३५४९
विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ साली “संगीत संन्यस्त खड्ग” हे पाच अंकी नाटक लिहिले. या नाटकाचे आजतागायत किती प्रयोग झाले, याची ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, मुंबई मराठी साहित्य संघ प्रायोजित प्रमोद पवार दिग्दर्शित सह्याद्री दूरदर्शनवरील रेकॉर्डिंग युट्यूबवर आजही उपलब्ध आहे. याच नाटकाचे नव्याने सादरीकरण करण्याचा प्रयत्न सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि नाट्यसंपदा कलामंच यांनी हाती घेतला असून, ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वा. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे त्याचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला.
हे नाटक सर्वप्रथम १९३१ साली मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या रंगमंचावर सादर करण्यात आले होते. आता हेच नाटक नव्या साजर्यात रंगभूमीवर पुन्हा आणण्यात आले असून, त्याचे रंगावृत्तीकरण व दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. नाटकाचे मूळ स्वरूप हे पाच तासांचे असून, सध्या ते अडीच तासांमध्ये सादर होत असल्याने त्यात कोणते बदल झालेत, हे स्पष्ट नाही. याचबरोबर मूळ नाटक एडिट करण्याचा कायदेशीर अधिकार कोणाकडे आहे, याचीही कोणतीही स्पष्ट माहिती नाही.
या नाटकात तथागत बुद्धांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची उपहासात्मक थट्टा करण्यात आली आहे. भिक्षू संघावरही तिरकसपणे टीका केली गेली आहे. याचा प्रयोग १३ जुलै २०२५ रोजी नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे होणार होता. यासंदर्भात डॉ. विलास खरात यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यात या नाटकाच्या माध्यमातून बुद्ध तत्त्वज्ञानाची निंदा करण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आले होते. अनेक बौद्ध विचारवंत व कार्यकर्ते याबाबत सजग झाले. त्यानंतर ताराचंद मोतमल यांच्याशी संवाद साधून प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला.
नाटक व त्याची स्क्रिप्ट न पाहता टीका करणे योग्य नाही, हे मान्य. पण याबाबतीत आम्ही युट्युबवर उपलब्ध असलेले सह्याद्री टीव्हीवरील संपूर्ण नाटक बघितले, आणि त्यातून हे स्पष्ट झाले की हे नाटक संपूर्णपणे काल्पनिक कथानकावर आधारलेले असून, इतिहासाची तोडफोड करून सावरकरांनी उद्दामपणे बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची खिल्ली उडवली आहे. या नाटकाच्या मांडणीला “माकडाचे शेपूट कुत्र्याला, आणि कुत्र्याचे शेपूट गाढवाला” लावल्यासारखी अव्यवस्थित आणि बिनमूल्य रचना आहे. यातून हिंसावादाचे उदात्तीकरण आणि अहिंसेचे खच्चीकरण करण्यात आले आहे.
या नाटकाला विरोध नाशिकमध्ये पूर्णपणे शांततामय, कायदेशीर मार्गाने करण्यात आला. शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने भदंत यु. नागधम्मो (महाथेरो), भदंत सुगत (थेरो), भदंत बुद्धसिरी, के.के. बच्छाव, ताराचंद मोतमल, बाळासाहेब शिंदे, समाधान तिवडे, संजय तेजाळे, संतोष अंभोरे, जयवंत खंडाळे,गुणवंत वाघ आणि इतर उपासकांनी एकत्र येऊन निवेदन सादर केले. नाशिकचे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नाट्य परिषदेचे अधिकारी आणि नाटकाचे व्यवस्थापक श्री. राजेंद्र जाधव यांच्याशी चर्चा करून, नाटकावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली.
नाट्य आचारसंहितेच्या चौकटीत हे नाट्य बसत नसल्याने व कायदेशीररित्या कोणत्याही परवानग्या न घेता हे विवादास्पद नाटक कसे सादर केले जाते,याची दखल घेऊन मा.पोलिसआयुक्त कर्णिक सर व संपूर्ण पोलिस प्रशासनाने ही त्वरित निर्णय घेतला. यानंतर अवघ्या एक तासातच हे नाटक रद्द करण्यात आले, अशी माहिती राजेंद्र जाधव यांनी दिली. आम्ही काही जणांनी यासंदर्भात तिकिटासाठी संपर्क साधला असता त्यांनी नाटक रद्द झाल्याचे स्पष्टपणे सांगितले.
या नाटकात वापरण्यात आलेली काही पात्रे पूर्णतः काल्पनिक असून खोट्या इतिहासावर आधारलेली आहेत. विशेषतः *“शाक्य कुळातील सेनापती विक्रमसिंह व त्याचा मुलगा वल्लभ” ही पात्रे इतिहासात *कधी अस्तित्वातच नव्हती.* बौद्ध वाङ्मय, इतिहास आणि ग्रंथांमध्ये यांचा कोणताही उल्लेख आढळत नाही. तरीही, अशा खोट्या पात्रांच्या आधारे तथागत बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर शंका निर्माण करणारे आणि भिक्षू संघाला दुर्बल ठरवणारे प्रसंग या नाटकात आहेत – हे पूर्णतः धादांत खोटे, अपप्रचारक आणि दुर्भावनापूर्ण आहे.
सावरकरांना भारतात परकीय आक्रमणाचा संपूर्ण दोष बुद्ध तत्त्वज्ञानावर ढकलायचा आहे, हे नाटक पाहिल्यावर स्पष्ट होते. अशा वेळी, भगवान परशुरामांनी २१ वेळा पृथ्वीवरून क्षत्रियांचा संहार केला आणि तरीही क्षत्रिय परंपरा कशी चालू राहिली यावर आधारित काल्पनिक नाटक लिहिले असते, तर त्या पातळीवर कुठे पोहोचेल, हे सावरकर अनुयायांनीही विचार करायला हवे.
हे नाटक ‘ऐतिहासिक’ असल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात हे काल्पनिक व खोट्या गोष्टींनी भरलेले नाट्य आहे. त्यात नाट्यसंहितेच्या नियमांचेही उल्लंघन आहे. प्रेक्षकांना दिशाभूल करून हिंसावादाचे अप्रत्यक्ष समर्थन आणि समाजाला तात्त्विक दिशाभ्रष्टता करण्याचे धोकादायक कृत्य या नाटकातून घडते.
भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने भारताला जगभरात शांततेचा अग्रदूत म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. *पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी देखील परदेशात जाऊन गर्वाने म्हणतात, *“मी भगवान गौतम बुद्धांच्या भूमीतून आलो आहे.”* यातूनच अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचे जागतिक महत्त्व अधोरेखित होते.
या पार्श्वभूमीवर, सावरकरांच्या नाटकात करण्यात आलेली बौद्ध तत्त्वज्ञानाची विटंबना केवळ धर्मद्रोह नव्हे, तर राष्ट्रद्रोह आहे. ही विकृती कोणत्याही संवेदनशील, तत्त्वज्ञानी आणि जबाबदार नागरिकाने स्वीकारू नये. नाशिकमध्ये झालेली ही घटनाक्रमा शांतीपूर्णपणे आणि कायद्यानुसार हाताळली गेली – हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संवैधानिक विरोधाची एक उदाहरणात्मक प्रक्रिया होती.
लेखन – किरण रामी बाबुराव मोहिते
📞 ९५६१८८३५४९
साभार – व्हिडिओ सह्याद्री दूरदर्शन टीव्हीवरील रेकॉर्डिंग
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत