सरकारच्या धोरणांवर दलित पँथरच्या दराऱ्याचा प्रभाव होता – ज. वि. पवार


मुंबई :
आंबेडकरी चळवळीने बाबासाहेबांच्या पश्चात बौद्ध धम्म दीक्षा समारंभाचे यशस्वी आयोजन करून बौद्ध धम्म खेड्यापाड्यात पोहचवण्याची ऐतिहासिक कामगिरी पार पाडली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भूमिहीनांचा लढा, रिडल्स, नामांतर इ.लढ्यांतून चळवळीची धग टिकवून ठेवली. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून संसदीय राजकारणावर आपला ठसा उमटवला; इतकंच नव्हे तर पुढच्या टप्प्यात त्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात दलित पँथरच्या रुपाने जो धाक आणि दरारा निर्माण केला त्याचा प्रभाव देशपातळीवर पडून सरकारच्या धोरणांत सुद्धा त्याचे प्रतिबिंब दिसू लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार यांनी मुंबईत चेतना महाविद्यालयात बोलतांना
वांद्रे, मुंबई येथील चेतना महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही जयंती निमित्त डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ‘आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे टप्पे ‘ या विषयावर ज.वि.पवार बोलत होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ज.वि. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील प्रवेशाबाबतचे ऐतिहासिक संदर्भ देत या विषयाबद्दल श्रोत्यांची जिज्ञासा जागृत केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपप्राचार्य प्रा. कृष्णा निकुंभ व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गिरीश साळवे यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात चेतना संस्थेचे अध्यक्ष पं. श्रीदत्त हळदणकर यांच्या हस्ते ‘ अध्यासन पत्रिका ‘ या अध्यासनाच्या वार्षिक मुखपत्राचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यासनाचे सरचिटणीस प्रा. किरण राजभोज यांनी केले. अध्यासनाच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती कोषाध्यक्ष प्रा. डॉ. कैलाश लांडगे यांनी करून दिली. तर उपाध्यक्ष प्रा. चंद्रकांत चिकणे यांनी सादर केलेल्या सुश्राव्य भीमगीतांनी वातावरणात रंग भरलेल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहचिटणीस प्रा. डॉ. तनुजा कोळी यांनी केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत