भगवान बुद्धांची शिकवण-भाग ९०
पुत्र राहूलला तथागतांचा उपदेश
एकदा तथागत राजगृहाच्या वेळूवनात राहात होते. त्याच वेळी राहूल अम्बलठ्ठिका येथे राहत होते.
संध्याकाळ होता होता तथागत बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले. त्यांना दुरुन येताना बघून राहुलने आसन सिद्ध केले व पाय धुण्यासाठी पाणी ठेवले.
ध्यान संपवून आल्यावर राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून तथागतांनी आपले पाय धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन तो बसला.
राहुलला उद्देशून तथागत बोलले की, “जाणूनबुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही, त्याला शक्य असलेले कोणतेही पापकर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की, थट्टेतसुद्धा खोटे बोलणार नाही.”
“तसेच प्रत्येक गोष्ट करताना वा प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर.”
“तुला एखादी गोष्ट करावयाची असेल तेव्हा तू नीट विचार कर की, ती करण्याने तुला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दुःखोत्पादक किंवा दुःखपरिणत आहे काय? विचारांती जर तुला वाटले, ती तशीच आहे तर ती गोष्ट तू करु नकोस.”
“पण जर तुझी खात्री पटली की, तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी.”
“प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा. असे होण्याने द्वेषभावना नष्ट होईल.”
“करुणेत तुझा विकास व्हावा. असे होण्याने पीडा नष्ट होईल.”
“परहित संतोषात तुझा विकास व्हावा. असे होण्याने पराङ्मुखता नष्ट होईल.”
“संयमित शांत वृत्तीत तुझा विकास व्हावा. असे होण्याने विसंगती नष्ट होईल.”
“देहभ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा. त्यामुळे विकारवशता नष्ट होईल.”
“नश्वरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा. असे होण्याने अहंकार गळून पडेल.”
तथागत बुद्धांनी असे सांगितले. त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१२.३.२०२४
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत