भारतीयांची मानसिकता संवैधानिक मूल्यांची कदर करणारी झाल्यास लोकशाहीला धोका नाही.

- सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर
डोंबिवली
दिनांक ९ मार्च:
स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या संवैधानिक मूल्यांची कदर करणारी जनतेची मानसिकता दृढ झाली तर भारतीय लोकशाहीला कोणताही धोका उरणार नाही, असे प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी डोंबिवली येथे केले.
सुमेरू प्रकाशनच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या पाच पुस्तकांचं प्रकाशन महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा.डॉ. प्रदीप आगलावे यांच्या हस्ते झाले त्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते.
प्रा. आनंद देवडेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात बौद्ध धम्माकडून घेतलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मानवी मूल्ये आणि बाबासाहेबांनी अनुयायांसह केलेला बौद्ध धम्माचा स्वीकार यांचा सारासार बुद्धीने अन्वयार्थ लावल्यास भारतीयांची संवैधानिक मूल्यपोषक मानसिकता तयार करण्यासाठीच बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता हे लक्षात येते.
आतापर्यंत एकूण पंचावन्न पुस्तकांचं लेखन करणाऱ्या प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या लेखक म्हणून गतीची आणि उत्साहाची विशेष दखल घेऊन प्रा. देवडेकर आपल्या भाषणात म्हणाले की, प्रा. शुक्राचार्य गायकवाडांची ही छोटी छोटी पुस्तकं ज्ञानवर्धक आहेत परंतु प्रा. गायकवाड सरांसारख्या अनुभवी लेखकांकडून समाजाला दिशादर्शक व अंतर्मुख करणाऱ्या लेखनाची अपेक्षा आहे.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रदीप आगलावे आपल्या भाषणात म्हणाले की, भारतीय लोकशाही दृढ करण्यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे महान कार्य भारतीय जनतेने समजून घ्यायला हवे.
ॲड. संघराज रुपवते, दैनिक सम्राटचे संपादक कुणाल बबन कांबळे, प्रा. भरत शिरसाठ, डॉ. अनुप्रिया खोब्रागडे, ज्येष्ठ बौद्धाचार्य बगाडे गुरुजी इत्यादींची लेखक शुक्राचार्य गायकवाड यांच्या लेखक म्हणून कार्याचा गौरव करणारी समयोचित भाषणं झाली. त्यानंतर लेखक शुक्राचार्य गायकवाड यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.
समीक्षक प्रदीप जाधव यांनी केलेल्या समर्पक शब्दांतील सूत्रसंचालनाने संपन्न झालेल्या या देखण्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बौद्ध धम्म परिषदेचे सचिव गुणाजी बनसोडे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत