8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने– राजाराम सूर्यवंशी

हा दिवस साजरा करतांना आपण आपल्या महाराष्ट्रापुरता व देशापुरता विचार केला असता ,” सावित्रीबाई झाली नसती तर? ” हा विचार प्रथम डोक्यात येतो .आणि मनात व डोळ्यात काळाकुट्ट अंधार दाटून येऊन ,स्त्रियांच्या गुलामीच्या शृंखला नाचू लागतात…..! आपण तमोयुगात प्रवेश करतो….!!
या पार्श्वभुमीवर सावित्रीबाई फुले कार्य आपल्या डोळ्यात अंजन घालून जाते व त्या आपल्या ,समस्त भारतीय महिलांच्या खऱ्या मुक्तीदात्या वाटू लागलात . नव्हेच सावित्रीबाई फुले या तमाम भारतीय महिलांच्या मुक्तीदात्याच आहेच ही ओळ अधोरेखीत होते .
आज विविध क्षेत्रात भारतीय स्त्रीयांनी जी आघाडी घेतली आहे ,या विशाल देशावर सलग एक दशकभर एक स्त्री पंतप्रधान म्हणून राज्य करु शकते ,दोन स्त्रिया वेगवेगळ्या कालखंडात या देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान होऊ शकतात या किमया काय आपोआप घडल्या ?
शासन ,प्रशासन ,पोलीस,लष्कर ,आरोग्य ,अंतरिक्षगमन, परदेशगमन ,व्यापार ,उद्योग ,न्यायपालिका यांसारख्या अनेक महत्वपुर्ण क्षेत्रात आज स्त्री पुरुषापेक्षा फार मागे नाही .हे शक्य झाले ते केवळ त्या साध्वी क्रांतिज्योतीने समस्त स्त्रियांसाठी शाळांचे दरवाजे उघडले म्हणून !
या स्त्रियांच्या प्रगती मागे सावित्रीबाईंनी आटवलेले रक्त कारणीभूत नाही काय ?
सावित्रीबाईंच्या कपाळी बसलेला तो एक एक दगड कारणीभूत नाही काय?,ज्या दगडाने सावित्रीबाई घायाळ होत होत्या .
मुलींना शिक्षणाची दारे खुली व्हावी म्हणून; त्या शिकून शहाण्या व्हाव्यात म्हणून सावित्रीबाईंचे उपाशीपोटी मर मर शिकवणे कारणीभूत नाही काय ?
अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील ,पण त्यासाठी भारतीय स्त्रियांना स्वतःशीच प्रामाणिक राहावे लागेल. सावित्रीबाईंचा त्याग त्यांना सतत आपल्या डोळ्यापुढे ठेवावा लागेल.भारतीय महिलांनो लक्षात ठेवा ,सावित्रीबाईंच्या सन्मानातच तुमची पुरुषप्रधान संस्कृतीतून मुक्ती आणि तुमचा सन्मान दडलेला आहे ! समतावादी समाजनिर्मितीसाठी तुम्हाला सावित्रीबाईंचा थोर आदर्श डोळ्यापुढे ठेवावाच लागेल ! !
(मी लिहिलेल्या “युगस्त्री सावित्रीबाई फुले” या चरित्र ग्रंथाच्याचौथ्या आवृत्त्याच्या पान १४८ वरुन.- राजाराम सूर्यवंशी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत