७५ हजार पदांच्या भरतीची प्रतीक्षाच

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यात १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार सरळसेवेची पदभरती करण्याची सरकारने घोषणा केली असली तरी सर्व पदे अद्याप भरलेली नाहीत. डिसेंबर महिना सुरू असताना काही विभागांच्या परीक्षांचे निकालही अद्याप जाहीर झालेले नाहीत.
राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी करून ७५ हजार नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. त्यानुसार शासनाच्या ३२ विभागांपैकी काही विभागांनी आवश्यक रिक्त जागांची माहिती गोळा करणे, भरती कशा रीतीने करणे, भरती प्रक्रियेचे निकष, भरतीसाठी खासगी संस्थांची निवड करणे आदीविषयी कार्यवाही राबविण्यास सुरुवात केली. त्यानुसार गृह विभागाने १८ हजार पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली.
सहकार विभागाने जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्टमध्ये ३०९ पदांसाठी परीक्षा घेतली. पशुसंवर्धन विभागाची जुलैमध्ये जाहिरात आणि ऑगस्टमध्ये ४४९ पदांची, महसूल विभागाने जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ४७९३ पदांची ऑगस्टमध्ये परीक्षा घेतली. वन विभागाने २४१७ पदांसाठी ऑगस्टमध्ये परीक्षा, कृषी विभागाने २१८ पदासाठी सप्टेंबरमध्ये तर, अर्थ व सांख्यिकी २६० जागांसाठी ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेतल्या आहेत. मात्र, या सर्व ८४४६ जागांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत. ते कधी लागणार याकडे या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचे डोळे लागले आहेत. याशिवाय ग्रामविकास विभागाने ४ ऑगस्ट रोजी १९,४६० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र, काहीना काही कारणांमुळे या पदांची परीक्षा झालेली नाही. या परीक्षेचीही उमेदवार वाट पाहात असून ही परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थी लक्ष वेधत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत