बौद्ध धम्मामध्ये वैशाख पौर्णिमा या मंगल दिनाचे विशेष महत्व

बौद्ध धम्मामध्ये वैशाख पौर्णिमा या मंगल दिनाचे विशेष असे महत्व आहे. कारण या दिवशी तथागत भगवान बुद्ध यांच्या जिवनात तिन विशेष घटना संयोगाने याच दिवशी घडल्या आहे. पहिली घटना राजा शुद्धोधन यांची पत्नी राणी महामाया यांच्यापोटी सिद्धार्थ गौतम यांचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी लुम्बिनी या ठिकाणी झाला.
दुसरी घटना म्हणजे दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने अत्यंत्य कठोर परिश्रमपूर्वक प्रयन्त करून वयाच्या ३५ व्या वर्षी बोधगया या ठिकाणी सम्यक संबोधी प्राप्त केली. तो ही दिवस हा वैशाख पौर्णिमेचा होता.
तिसरी घटना या विश्वातील सर्व मनुष्य प्राणी सुखी होवो यासाठी तथागत भगवान बुद्ध यांनी सलग ४५ वर्षे सतत न थकता न थांबता सधम्म्माचा प्रचार व प्रसार केला. अखेरीस तथागत भगवान बुद्ध यांनी वयाच्या ८० व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला शरीराचा त्याग केला. तो ही महापरिनिर्वाणाचा दिवस हा वैशाख पौर्णिमेचा होता.
तथागत भगवान बुद्ध यांच्या जिवनातील एकूण तिन घटना वैशाख पौर्णिमेला घडल्या असल्याने ही त्रिविध वैशाख पौर्णिमा म्हणून संपूर्ण विश्वातील बौद्ध अनुयायी मोठ्या श्रद्धायुक्त चित्ताने व तितक्याच हर्षोल्लासाने साजरी करतात. या जगातील सर्वश्रेष्ठ बुद्ध धम्म व संघ या त्रिरत्नाप्रती श्रद्धाभाव व्यक्त करतात.
तसेच स्वतःच्या निवासस्थानी,बुद्ध विहारात,सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेवून भगवान बुद्ध यांची प्रज्ञा,शील करुणा,मैत्री,शांती या नितीमूल्याची शिकवण अंगिकारण्याची सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण करतात.
या दिवशी बुद्ध विहारातिल तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीसमोर आकर्षक सजावट करून विहाराची स्वच्छता,रंगरंगोटी व रोषणाई करून दीपदान उत्सव देखील साजरा करतात. बुद्ध विहाराच्या सर्व बाजूला दिवे लावून प्रकाश केला जातो.प्रत्यक्ष वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्त होण्याच्या वेळेला श्रद्धेने म्हणजेच सकाळी ४ वा. वाजेपासून बुद्ध विहारात मोठी गर्दी केली जाते. सामुहिक ध्यानसाधना,अष्टशील,संपूर्ण सूत्रपठण,धम्मदेसना,गोरगरिबांना वस्त्र,आवश्यक वस्तूचे दान, रुग्णांना औषधें ,फळे ,पुजनीय भिक्खू संघाला भोजनदान,चिवरदान,अष्टपरिष्कर दानकर्म करून पुण्यअर्जित करतात व या दिवशी अष्टशीलाचे पालन करतात .
या कृतीकार्यक्रमामध्ये सहपरिवार पांढरे कपडे परिधान करून लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. अश्या रीतीने बौद्ध राष्ट्रामध्ये वैशाख पौर्णिमा साजरी केली जाते. प्रत्येक बौद्ध अनुयांनी धम्मातील पंचशिल,आर्य अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता सोबतच महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञेचे श्रद्धापूर्वक निष्ठेने व दृढ निश्चय करून पालन केल्याशिवाय आदर्श समाजाची निर्मिती होणे शक्य नाही. त्यामुळे लहान मुले,युवक युवती,महिला व पुरुष आदी.सर्वांच्या वयोगटाचा विचार करून काही कृती कार्यक्रम सुचविले आहे.
वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने व्यक्ती,परिवार,संस्था,बुद्ध विहार कमिटी,महिला मंडळ आदी. खालील बावीस कृती कार्यक्रम राबविता येतील-
१)वैशाख पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आदल्या दिवशी सहपरिवार पांढरे कपडे परिधान करून बुध्दविहारात जाणे.
२)बुद्ध विहाराच्या स्वच्छतेच्या,सजावटीच्या सांघिक कार्यामध्ये सर्वानी मिळून उत्स्फूर्तपणे श्रमदान देवून सहभाग घेणे.
३)स्वतःच्या निवासस्थानी तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची आकर्षक मांडणी करून सजावट करणे.
घरावर पंचशिल ध्वज लावणे.
४)परिसरातील जवळच्या बुद्धविहारात वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने नियोजित कार्यक्रम नियोजनाच्या मिटिंगमध्ये वेळोवेळी सहभाग घेणे. व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनां तन,मन,धन देवून सहकार्य करणे.
५)बुद्ध विहारातील कार्यक्रमाची माहितीची पत्रके वितरण करणे. लोकांना या कार्यक्रमामध्ये सहपरिवार होण्यासाठी प्रोत्साहित करणे.
६) वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धविहारातील सार्वजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे. बुद्ध वंदनेमध्ये व रॅलीमध्ये सहपरिवार सहभाग घेणे
७)बुद्ध विहारात जाताना पुष्प,अगरबत्ती,मेणबत्ती,फळे,आदी. सोबत नेणे.
८)बुद्ध विहारातील दानपेटीमध्ये यथाशक्ती आर्थिकदान करून पुण्य अर्जित करावे.
९)स्वतःच्या निवासस्थानी बुद्धपुजा आयोजित करून परिसरातील नागरिकांना खिरदान,भोजनदान आदी. दानकर्म करावे.
१०)निवासस्थानी,बुद्ध विहारात लहान मुलांसाठी ,महिलासाठी,युवकांसाठी विशेष सामुहिक ध्यानसाधना आयोजित करावी.
११) वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध विहारात किंवा निवासस्थानी तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्या प्रतिमांची पुष्प,धूप ,दीपाने पुजा करून त्रिसरण,अष्टशील ग्रहण करावे. बुद्धपुजा,भिमस्मरण,भिमस्तुती,त्रिरत्न वंदना,परित्राणपाठ,सब्बसुख गाथा,धम्मपालन गाथा घेवून शेवट करावा .
१२)निवासस्थानी किंवा बुद्ध विहारात भिक्खू संघाला आमंत्रित करून भोजनदान,चिवरदान,औषधदान,फळेदान,अष्टपरिष्कारदान,आर्थिकदान आदी. सत्कर्म करावे.
१३)गरिबांना जिवनावश्यक वस्तूचे दान करावे.
१४रुग्णांना फळे वाटप करावे
१५)गरीब विद्यार्थांना शालेय साहित्य वितरण करावे
१६)रक्तदान शिबीर आयोजित करावे
१७)वृक्ष लागवड करावी
१८)सर्वरोग निदान शिबीर आयोजित करावे
१९)स्वयंरोजगार,व्यवसाय मार्गदर्शन,प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावी
२०)लहान मुलांसाठी,महिलासाठी,युवकांसाठी आनापान,धम्म संस्कार,श्रामणेर शिबिरे आयोजित करावे
२१)बौद्ध धम्माचे साहित्य,पुस्तके,ग्रंथ मोफत वितरण करावी.
२२)बुद्ध विहारासाठी तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती दान करणे .
अश्या प्रकारे वरील बौद्ध धम्म संस्कृती टिकविण्यासाठी आपणाला जे जे कार्य करणे शक्य असेल ते अवश्य करावे. व या वैशाख पौर्णमेच्या निमित्ताने काया,वाचा व मनाने धम्मपालन करून महान पुण्य अर्जित करावे.
सर्वाना त्रिविध वैशाख पावन पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा व मंगल कामना !
सबका मंगल हो !
आयु. मिलिंद उद्धवराव बनसोडे (बौद्धाचार्य)
विपश्यना धम्मसंडे स्कुल धम्मप्रशिक्षक
संस्थापक अध्यक्ष चारिका फाऊंडेशन ,नाशिक
मो. ९९६०३२००६३
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत