महाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीस विनम्र अभिवादन.

२३ फेब्रुवारी दिन विशेष

बुद्धीप्रामाण्यवाद – अंधश्रद्धा निर्मुलन करणारे, बहुजनांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि परिसर स्वच्छतेचे आग्रही राहणारे
राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीस विनम्र अभिवादन.

राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ मुर्तीजापूर मधील एका खेड्यात झाला.आणि २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे वयाच्या ८०व्या वर्षी देहावसान झाले.

राष्ट्रीय संत गाडगे महाराज म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद – विज्ञानवादी दृष्टिने अंधश्रद्धा निर्मुलन तथा सत्याचे आचरण

महाराष्ट्रातील अलीकडच्या काळातील संतांमधील शेवटची कडी म्हणजे संत तुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा अतिशय सुंदर ग्रंथ लिहिला या माध्यमातून अतिशय सुंदर व्यावहारिक ज्ञान त्यांनी लोकांपर्यंत पोहचविले. तुकडोजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व व्यसनमुक्ती केली हे आपण प्रामुख्याने वाचत व ऐकत आलो आहोत.

गाडगे महाराज . खर म्हणजे परीटाच्या / धोब्याच्या घरात जन्म झालेला हा मुलगा दुसऱ्या वर्गाचेही शिक्षण त्याला प्राप्त झालेले नाही ह्या अर्थाने त्याला खरे तर अशिक्षित म्हटले पाहिजे. ह्या माणसाने अत्यंत ताकदीने महाराष्ट्राला बुद्धीप्रामाण्यवाद दिला जनसामान्यांपर्यंत तो ताकदीनं पोहोचवला ही फार महत्वाची गोष्ट आहे.

खरं पाहता संत गाडगे महाराज यांनी नवी परंपरा निर्माण केली गाडगे महाराजांचे वैशिष्ट्य असे होते की हा माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कुणालाही पाया पडू देईना. जेंव्हा लोक संत म्हणून त्यांच्या पाया पडायला यायचे तेंव्हा हे त्यांना काठीने मार द्यायचे आणि म्हणायचे – ‘माझ्या पाया तुमी कायले पडता त्यापेक्षा आपल्या आई बापाच्या पाया पडा !’

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एक इंग्लंडची नौका पाण्यामध्ये बुडाली होती आणि कल्पना अशी होती की इंग्लंडने आपल्या देशातील सर्व सोनं भारतामध्ये पाठवण्यासाठी या नौकेचा वापर केला होता. आणि युद्ध काळात ही नौका बुडाली आणि भारताच्या जवळच समुद्रामध्ये तळाशी ते सर्व सोनं गेलेलं आहे ह्या अफवेचा फायदा घेवून गाडगे महाराज जनतेचे प्रबोधन करायचे . प्रबोधन करत असतांना सत्यनारायणाचा उल्लेख करायचे. आता सत्यनारायण हा भारतीय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्याला धर्माचा भाग मानून प्रत्येकजण सत्यनारायण करतांना दिसतो. घरी लग्न असलं की -सत्यनारायण मुलाच लग्न -सिंगल सत्यनारायण, मुलीचं लग्न – डबल सत्यनारायण, ह्या पद्धतीन हे सत्यनारायण चालतात एव्हढच नव्हे तर माझा एक व्यवसायिक इंजिनिअर मित्र प्रोजेक्ट चालू केला म्हणून – सत्यनारायण, पूर्ण झाला म्हणून सत्यनारायण.खास करुन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आवर्जुन सत्यनारायण असे सत्यनारायण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होतांना दिसतात. गाडगे महाराज ह्या सत्यनारायण कथेचा उल्लेख करून म्हणायचे ( गाडगे महाराजांचे कीर्तन म्हणजे लोकांना एक मोठी पर्वणीच असे. ते लोकांपुढे उभे राहून लोकांशी संवाद साधत असत. लोकांना प्रश्न विचारत असत आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये त्यांचे कीर्तन रंगत जात असे. लोकांना ते जाहीररित्या प्रश्न विचारायचे – )

सत्यनारायण
‘काउन रे तुमी सत्यनारायण करता ना ? मग सत्यनारायण केल्यावर पोथिमदे लिवलय ना – बुडालेली नाव वर येते ! मग आता सत्यनारायण कराव, जे आता इंग्लंडची नाव पाण्यात बुडाली, तीच्याव लई मोठ सोन है, अरे सत्यनारायण करा ते नाव वर काढा , आपल्या देशाच लई भलं होऊन जाइल !’
असं म्हटल्यावर लोक गप्प रहायचे कारण लोकांना माहित होत की सत्यनारायण करून नाव काही वर येणार नाही.

गाडगे महाराज या सत्यनारायणाच्या पोथिचा उल्लेख का करायचे हे समजून घेण्यासाठी ह्या पोथिकडे जरा पाहू – सत्यनारायण – अध्याय -४ साधुवाण्याचा

साधुवाण्याची मुलगी कलावती सत्यनारायण करत होती । एव्हढ्यात तिच्या कानी वार्ता आली । तिचा पती स्वगृही परत आलेला आहे । ती वार्ता ऐकताच ती तडक समुद्रकिनारी निघाली । सत्यनारायण अर्धवट सोडून , प्रसाद भक्षण न करता ती तडक समुद्रकिनारी धावत गेली । समुद्र किनारी जाउन पहाते तर तर काय तिचा पिता धाय मोकलून रडतो आहे । स्वत:चा उर बडवून घेतो आहे । … ती पित्याला विचरती झाली । बा तुंम्ही का रडता आहात । … यावर पिता उद्गारला , – हे कालाव्ते भरपूर धन धान्य आणि संपत्ती घेवून मी इथवर आलो । माझ्यासमवेत तुझा पती म्हणजे माझा जावई होता । मी खाली उतरलो , तुला निरोप पाठवला आणि बघता बघता संपूर्ण जहाज पाण्यामध्ये बुडालं । त्यासोबत सारी धनसंपत्ती पाण्यात बुडाली । एव्हढंच नव्हे तर तुझा पती माझा जावई पाण्यात बुडाला । बराच कालावधी झाला तरी तो वर आलेला नाही । त्यामुळे तो मृत झाला अस मला वाटत । आणि जावई वियोगाच्या दु:खान मी उर बडवून घेतो आहे । … हे कलावती ऐकताच पती वियोग झाला अस तिला कळलं । तिलाही अतीव दु:ख झालं । तीही धाय मोकलुन रडू लागली । स्वत:चा उर बडवून घेऊ लागली । …. तेवढ्यात आकाशवाणी झाली …. ( मित्रांनो तेंव्हा आकाशवाणी एकच होती आज सारखी मुंबई केंद्र, पुणे केंद्र अशी नव्हती ) …. हे कालावते तू रडून उपयोग नाही । धाय मोकलून उपयोग नाही । कारण तू सत्यनारायण देवाचा कोप ओढवून घेतला आहेस । पतीची वार्ता ऐकताच तू पतीप्रेमापोटी सत्यनारायण अर्धवट टाकलास । प्रसादसुद्धा भक्षण न करताच तू समुद्र किनारी गेलीस । त्यामुळे सत्यनारायण देवांचा अपमान झाला । त्यामुळे सत्यनारायण देव अत्यंत क्रोधीत झाले । आणि त्यांनी जहाजच्या जहाज तुझ्या पतीसमवेत पाण्यात बुडवलं । तुला जर तुझा पती परत हवा असेल तर साग्रसंगीत सत्यनारायणाची पूजा कर । सात्यनारायाणाला प्रसन्न करून घे । त्यानंतर तुझा पती तुला परत मिळेल.।……
( मला अजुनही कळत नाही कलावती पती प्रेमापोटी सत्यनारायण सोडून धावत गेली असेल , राहिली पूजा अर्धवट, काय बिघडलं? दोघही परत आले असते मग दोघांनी ही मस्त जोड्याने हाताला हात लाऊन पूजा केली असती ……पण नाही … मला सोडून कशी काय नवऱ्याकडे चालली … बुडव त्याची नाव … असला हा आपला देव ! … असा कसा देव असू शकेल ? त्याला एव्हढा राग ? सवता आहे का ? या पद्धतीने आपण जर विचार केला तर यातील विरोधाभास आपल्या लक्षात येईल. आज प्रल्हाद शिंदे नामक गायकाच्या ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ या मराठी गीताने तर हा सत्यनारायण समाजमनावर अधिकृतच करुन ठेवला आहे.हि शोकांतिका आहे.)

हे ऐकल्यानंतर कलावतीने डोळे पुसले । ती स्वत:च्या घरी आली घरी आल्यावर तिने साग्रसंगीत सत्यनारायणाची पूजा केली । त्यानंतर अतिशय भक्ती भावाने प्रसाद भक्षण केला …. आणि पहाता पहाता समुद्रात बुडालेली नाव वर आली, एव्हढंच नव्हे तर समुद्रात बुडालेला नाका तोंडात पाणी गेलेला तिचा पती जिवंत वर आला. तिची बुडालेली सर्व धनसंपत्ती परत मिळाली । … हे आपण सार ऐकतो, नंतर सत्यनारायण देवाला भक्तिभावाने हात जोडतो. आणि म्हणतो हे सत्यनारायण देवा जसं कलावतीला तीच बुडलेल सर्व मिळाल तस आम्हालाही आमच बुडालेल सारं आम्हाला मिळवून दे !. या पद्धतीन सत्यनारायणाची पूजा गावोगाव चालत असते.

या सत्यनारायण कथेचा उपयोग करून गाडगे महाराज विचारायचे – अरे पोथीत लिवलय ना , सत्यनारायण केला की नाव वर येते ? मंग आता करा सात्यनारायण आणि बुडालेली नाव वर काढा ! आपल्या देशाला लई सोनं भेटन ! देशाच भलं होऊन जाइल ! … ह्यावर लोक गप्प बसायचे. मग ह्या गप्प बसलेल्या लोकांना गाडगे महाराज डिवचून म्हणायचे


‘काउन रे एका सत्यनारायणान होत नाही काय ? मंग दहा दहा सत्यनारायण घाला !धा सत्यानारायनान होत नसन तर दहा हजार सत्यनारायण घाला !इथून सत्यनारायण पावत नसन तर ममैय (मुंबई) च्या समुद्राजवळ जा … पैसे मी देतो … तिथ सत्यनारायण करा पण बुडालेली नाव वर काढा !’ अस म्हटल्यावर लोक गप्प बसायचे … मग चिडल्याचा आविर्भाव आणून म्हणायचे – ‘दहा हजार सत्यनारायण घालून जर ते नाव वर येत नायी ! तर कायले ती खोट्टारडी पोथी वाचता ? कायले तो खोट्टारडा सत्यनारायण करता ? आणि वरून त्याले सत्यनारायण, म्हणता ?’वरून ते असही म्हणायचे – ‘चालले बह्याड बेल्हे , सत्यनारायण करायले !

आज कुणी सत्यनारायण करू नका हे आमच म्हणन नाही! पण दुसरी इयत्ता ही न शिकलेल्या माणसाचे एक वाक्य लक्षात ठेवा – ‘चाल्ले सारे च्या सारे , बह्याड बेल्हे , सत्यनारायण करायले !’

गाडगे महाराजांचे आणखी एक वैशिष्ट्य होते की,
त्यांनी जिथे जिथे यात्रा होतात त्या सर्व ठिकाणी ते जायचे. गरिबांच्या खाण्या पिण्याची सोय करायचे मित्रांनो गरीब लोकांना रहाण्यासाठी अशा ठिकाणी सोयी नसतात म्हणून त्यांनी ठीक ठिकाणी अनेक धर्मशाळा काढल्या अशा शेकडो धर्मशाळा बांधणारा माणूस, अनेक शाळा बांधणारा माणूस, अनेकांना फुकट खाऊ घालणारा माणूस, मंदिरामधून लोक नदीच्या पात्रामध्ये स्नानाकरिता उतरतात, पाय घसरून पडतात, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी घाट बांधले. परंतु एकही मंदिर त्यांनी बांधले नाही. गाडगे महाराज कधीही मंदिरात देवाच्या दर्शनाला गेले नाहीत. कारण – गाडगे महाराज माणसामध्ये देव पहाणारे माणूस होते.

गाडगे महाराज लोकांना विचारायचे –

काउन रे तुमी देव मानता का नाय ?
लोक म्हणायचे – हो जी ! आमि देव मानतो !
अरे मी बी देव मानतो ! माहा देव माझ्या मनात असते !
“तुमचा देव कुठ र्हायते रे!
लोक म्हणायचे ‘आमचा देव देवळात र्हायते !’
अरे तुमच्या देवळातल्या देवाला धोतर असते का न्हायी ?
लोक म्हणायचे – ‘हो जी असते !’
मंग तुमच्या देवळातले देवाले धोतर कोन नेसवते रे ?
लोक म्हणायचे- ‘आमीच नेसवतो जी !’
काउन देवाले धोतर नेसता येत नाय काय ?
त्यावर लोक म्हणायचे- ‘नाय जी नाय नेसता येत !’
अरे व्वा रे व्वा तुमचा देव ! ज्या तुमच्या देवाले सोताच धोतर नाय नेसता येत , तो तुमाला काय नेसवणार रे ? … ( या पद्धतीचे प्रश्न विचारून माणसांना ते विचार करायला प्रवृत्त करत.)

पुढे ते म्हणत – काय रे देवाला निवद दाखवता का नाय ?
लोक म्हणायचे – ‘हो जी दाखवतो !’
मंग काय करता ?
लोक म्हणायचे – हातात काठी घेवून बसतो !
कायले काठी घेवून बसता ?
लोक म्हणायचे- नाय मंजे ते कुत्र येते, मांजर येते त्याले हाकलाय लागते न व !
अरे वा रे वा तुमचा देव ! तुमच्या देवाले सोताच्या निवदावरच कुत्र न मांजर हाकलता येत नाय तो तुमचं गंडांतर काय हाकलणार रे ?
(या पद्धतीने ते लोकांना विचार करायला भाग पाडत असत समजावत असत ! )

बळीप्रथा
एवढच नव्हे तर ज्या ठिकाणी बळी दिले जात अशा ठिकाणी गाडगे महाराज जात. लोक तिथे कोंबडी बकरी कापत असत बाजूला त्यांची मुले असत बहुदा मुलांसंदर्भात नवस फेडणे असे. तिथेही उभे राहून गाडगे महाराज लोकांना प्रश्न विचारत –
‘काय करून ऱ्हायला रे ?’
न्हायी जी नवस फेडून राहिलो, म्या म्हन्ल माह पोरग ठीक झालं की कोंबड कापीन !’
‘अरे कोंबड कुनाच लेकरू हाय ?’
‘देवाचच लेकरू हाय !’ ‘आन तूह लेकरू ?’
‘माह व्ह्य ना जी !’

‘आन तू कोनाचा रे ? मी माह्या बापाचा न जी !’
‘म्हन्जे शेवटी कोनाचा ?
‘देवाचं लेकरू !’
‘मंग तूह लेकरू बी देवाचच न ?
:’हो जी !’
अरे तूच त म्हनते कोंबड बी देवाचं लेकरू आणि तूह बी देवाचं लेकरू . आणि आताच मला सांगत होतास की कोंबड कापलं की देव प्रसन्न होते तूह पोरग बी देवाचं लेकरू है … काप त्याले आणि घे देवाले प्रसन्न करून ! … असं म्हटल्यावर लोकांच्या अंगावर शहारे येत असत आणि त्यांना कोंबड कापायची हिम्मत देखील होत नसे.

मानवता
गाडगे महाराज पंढरपूरच्या यात्रेत प्रबोधनासाठी जायचे – अरे संत ज्ञानेश्वरांनी , तुकारामांनी सांगितलेय देव माणसात असते
तरी तुमी हित आले … देव चरा – चरात आहे अस म्हनता …. आणि चंद्रभागेत आंघोळ करून हित वाळवंटात लोटे घेवून बसता …सगळ वाळवंट घाण करून टाकता …हे साफ कोण करणार रे ? … ते विठोबाचे हात कमरेवर हैत .. तुमचे पण हात कमरेवर हैत .. ते कमरेवरचे हात काढा .. हातात झाडू घ्या .. माझ्यासोबत हे वाळवंट झाडून काढा ..अस म्हणणारे गाडगे महाराज लोकांना स्वच्छतेच आणि आरोग्याचे महत्व लोकांना पटवून सांगायचे. आणि म्हणायचे –

देवळात देव नसते, देव माणसाच्या मनात र्हायते !
ज्या मानसाले खायला भेटत नसन त्याले खायला द्याव !
ज्याले शिक्षण नसन त्याले शिक्षण द्यावं !
ज्याले आसरा नसन त्याले आसरा द्यावं !
देव माणसाच्या मनात राह्यते, देवळात रहात नायी, देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट र्हायते !

हा ताकदीचा बुद्धीप्रमाण्यवाद आपण समजून घेतला पाहिजे.

चमत्कार होत नाहीत असे सांगणारे गाडगे महाराज लोकांच्या /महिलांच्या अंगात देव्या येण्यासंमंधी म्हणायचे –
अरे हिच्या अंगात देवी येते सात सात दिवस आंग नाय धूत आनि हिच्या अंगात देवी येते काय देवीला काम धंदा नाय काय रे ? घूस हिच्या अंगात घूस तिच्या अंगात !

या पद्धतीन अत्यंत ताकदीन बुद्धिप्रामाण्यवाद मांडणारे चमत्कारांना विरोध करणारे संत गाडगे महाराज १९५६ साली त्षांचे निधन झाले.

ज्या गाडगे महाराजांना पाहिलेली, त्यांचे कीर्तन ऐकलेली, त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झालेली माणसे आजही असतांना, प्रबोधनकार ठाकरें सारख्यां व्यक्तीने त्यांचे चरित्र लिहिले आहे.

काय म्‍हणाले होते गाडगे महाराज की, आले होते डॉ.बाबासाहेबांच्‍या डोळ्यात पाणी

गाडगेबाबा आणि बाबासाहेबांची भेट

१४ जुलै १९५१ मध्‍ये संत गाडगेबाबा यांची प्रकृती ठीक नव्‍हती. ते मुंबईत होते. ही माहिती एका सहका-याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यापर्यंत पोहोचवली. बाबासाहेब तेव्‍हा कायदेमंत्री होते. त्‍याच दिवशी सायंकाळी कामानिमित्‍त त्‍यांना दिल्‍लीला जायचे होते. पण गाडगेबाबांच्‍या प्रकृतीची बातमी ऐकताच त्‍यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी या बातमी घेऊन येणा-या सहका-यासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये पाहोचले.

गाडगेबाबा कधीही कुणाकडून काही स्‍वीकारत नसत. पण त्‍यांनी बाबासाहेबांकडून घोंगड्या स्‍वीकारल्‍या.

गाडगेबाबा तेव्‍हा म्‍हणाले होते, “डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर, तुमचा एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे.”

डॉ. बाबासाहेब म्हणाले, “बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.” या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विज्ञानधिष्टित समतामुलक प्रेरणादायी स्मृतीस विनम्र अभिवादन.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!