भगवान बुद्धांची शिकवण
भाग ७२
भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत
बौद्ध आणि ब्राम्हणी कर्मसिद्धान्त समान नाहीत
काही अज्ञ असे म्हणतात की, बौद्धधर्म अथवा ब्राम्हणी वा हिंदुधर्म एकच आहेत. त्यात त्यांचा हेतू बहुसंख्य अज्ञ समाजाची बुद्धि-पुरस्पर दिशाभूल करणे हा असतो.
बुद्धांचा कर्मसिद्धान्त ब्राम्हणी कर्मसिद्धान्तापेक्षा भिन्न आहे. याबाबतची वस्तुस्थिती काय आहे, याचे सूक्ष्म परीक्षण करणे आवश्यक आहे. बुद्धांच्या कर्मसिद्धान्ताचा गर्भितार्थ, उद्देश हा ब्राम्हणी कर्मसिद्धान्ताच्या गर्भितार्थापेक्षा वेगळा आहे.
हिंदू कर्मसिद्धान्त हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानीत नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही.
ब्राम्हणी कर्मसिद्धान्त हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मान्तरी चालू राहते. बौद्व धर्म आत्माच मानीत नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धान्तास लागू होत नाही. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदुधर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही. आत्मा देहातून निघून जातो. ही विधाने बौद्ध सिद्धान्ताला लागू नाहीत.
हिंदू कर्मसिद्धान्ताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्या वेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात. आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते. याप्रमाणे हिंदूंचा हा सिद्धान्त आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धान्ताशी विसंगत आहे.
म्हणजेच बौद्ध कर्मसिद्धान्त आणि हिंदू कर्मसिद्धान्त हे एकच असू शकत नाहीत. म्हणून हे दोन्हीही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल.
गतकर्मांचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानीत नव्हते
कर्मसिद्धान्त (The Law of Karma) बुद्धांनी सांगितला व स्पष्ट केला होता. ‘कराल तसे भराल’ असे सांगणारे तथागत पहिलेच होते. (Reap as you sow)
ते कर्मसिद्धान्तावर इतका भर देत होते की, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धान्ताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था (moral order) अशक्य आहे.
हिंदू कर्मसिद्धान्ताप्रमाणे गतजन्मींच्या कर्माचा परिणाम वर्तमान जीवनावर होतो. या कर्मसिद्धांतानुसार, माणूस गरीब कुळात जन्मास आला तर त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म. तो श्रीमंताच्या घरात जन्मला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म. जन्मतःच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म.
हा अत्यंत दुष्ट सिद्धान्त आहे. कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला, प्रयत्नांना काहीच स्थान उरणार नाही. सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल.
ह्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की, गत कर्माचा वारसा कसा लाभतो? त्याची प्रकिया कशी असते? वांशिकतेच्या दृष्टीने गत कर्माचे रूप कसे असते? ते वंशानुगत मातापितरांपासून चालत आलेले असते (inherent), की नंतर स्वतः संपादलेले (acquired) असते? आपल्या मातापितरांपासून आपल्याला काय मिळते?
विज्ञान सांगते, जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील अंड्यांत प्रवेश होतो; तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो. वीर्यजंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्राणूत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ. प्रत्येक मनुष्यप्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणांच्या युतीने होत असतो.
ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धांकडे आला होता, त्याला माणसाची उत्पत्ती मातापितरांमुळेच होते, असे बुद्धांनी सांगितले.
हिंदू सिद्धान्त मात्र वेगळा आहे. तो सिद्धान्त म्हणतो की, शरीर वंशानुगत मातापित्यांपासून प्राप्त होते. परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे. अर्थात कोठून? हे काही हा सिद्धान्त सांगू शकत नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धान्त हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे, हे ठरविण्यास शास्त्र/विज्ञान कसे सहाय्य करू शकेल?
विज्ञानानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धान्ताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धान्ताप्रमाणे गत कर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर, स्वतः आपण आपल्यासाठी, आणलेला वारसा आहे. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो. सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणते. अशा प्रकारचा सिद्धान्त बुद्धीस पटणारा ठरत नाही.
बुद्ध असल्या बुद्धीविसंगत सिद्धान्तावर विश्वास ठेवीत नाही.
बुद्धांचा कर्मसिद्धान्त हा विज्ञानाशी सुसंगत आहे. पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर त्यांचा विश्वास नव्हता. जन्म हा मातापित्यांपासून आहे आणि बालकाला जन्मत: जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापाकडून; असे बुद्ध मानीत असल्यामुळे बालक हे स्वत:च वारसा घेऊन येते यावर ते कसा विश्वास ठेवणार?
गतजन्मीच्या कर्माचा सिद्धान्त हा शुद्ध ब्राम्हणी सिद्धान्त आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात, आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात. म्हणून ‘गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते!’ याच्याशी ते सुसंगत आहे, परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धान्ताशी ते अगदी विसंगत आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२३.२.२०२४
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ चतुर्थ खंड भाग दुसरा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत