” देव दगडात नसून माणसात शोधणारे थोर संत गाडगेबाबा.”
23 फेब्रुवारी 2024 संत गाडगेबाबा ह्यांच्या जयंती निमित्त
आधुनिक महाराष्ट्रात संत, महंत, बाबा, बापू, माता ह्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा भक्त परिवार देखील लक्षणीय असल्याचे दिसते. ते खरे संत, महंत आहेत की खोटे, भोंदू आहेत ह्याचा निर्णय त्यांच्या भक्तांनी घ्यायचा असून प्राप्त परिस्थितीत असे दिसते की, ते काहीही उद्योग धंदा करीत नसले तरी त्यांचा एकूणच श्रीमंती थाट, त्यांचे राहणीमान, त्यांचे आश्रम,
स्थावर मालमत्ता चकित करणार्या आहेत. हे सर्व वैभव आले कुठून? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु गेल्या काही काळात त्यांच्या बद्धल उजेडात आलेल्या प्रकरणांचा आणि त्यामुळे त्यातील काहींना तुरुंगवासाची करावी लागलेली वारी, न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षा ह्यांचा विचार केल्यास त्यांच्यात बहुसंख्य बाबा हे भोंदू, स्त्री लंपट, अत्याचारी, व्यभिचारी असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच सध्याचे बिघडलेले समाजस्वास्थ्य, स्वार्थी मानसिकता, समाज सेवेच्या नावाखाली पोसलेली
खिसाभरू वृत्ती ह्या पार्श्वभूमीवर
, “गोपाला, गोपाला, देवकी नंदन गोपाला” असे म्हणत कीर्तन करणारे, केसांच्या झिंज्या, खापराच्या तुकड्याची टोपी, ठिगळं जोडलेले कपडे , दाढीचे खुंट वाढलेले, एका कानात कवडी ,तर दुसऱ्यात फुटक्या बांगडीची काच, हातात खराटा अशा अवतारातील गाडगेबाबा नजरेसमोर उभे राहतात. ज्यांनी समाज प्रबोधनाची कास धरून निस्वार्थीपणे सामाजिक सुधारणा,अंधश्रद्धा निर्मूलन,जातिभेद, दिन दुबळ्या गरीब, अनाथ, अपंग लोकांच्या उत्थानासाठी घरादारावर नांगर फिरवून, गावोगाव भटकंती करीत, कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहून, आपल्या कार्याचा अवीट ठसा उमटविला. त्या गाडगेबाबांची प्रकर्षाने आठवण आल्याशिवाय रहात नाही.
त्यांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असून, जन्म 23/02/1876 रोजी शेंडगाव,तालुका दर्यापूर,जिल्हा अमरावती येथे गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी नेसत्या वस्त्रानिशी समाज सुधारणेसाठी गृहत्याग केला. त्यावेळी त्यांची पत्नी 3 महिन्यांची गरोदर होती.
ते गावोगाव भटकून समाज प्रबोधन करीत. ते ज्या गावी जात, प्रथम तो परिसर झाडूने स्वच्छ करीत. ते पाहून कुतूहलाने लोक जमा होत. तेव्हा त्यांना समजेल अशा सोप्या वर्हाडी बोलीभाषेत समाजातील दांभिक रुढी, परंपरा,अंधश्रद्धा ह्यावर हल्ला करून शिक्षण,,स्वच्छता, चारित्र्य ह्यांची शिकवण देत.
बाबा आषाढी आणि कार्तिकी वारी निमित्त पंढरपुरला जायचे. पण ते कधीच मंदिरात गेले नाहीत. तेथे ते कीर्तनात रंगून जायचे. ” लोक हो बाप्पा, देव देवळात नसून माणसात
बघा. दिन दलित, गरीब, अनाथ अपंग ह्यांची सेवा करा. सर्व माणसं
सारखी असून भेदभाव, अस्पृश्यता पाळू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. चोरी करू नका. सावकाराकडून कर्ज काढू नका. कितीही गरिबी असली तरी लेकरा बाळांना शिक्षण द्या. असे त्यांचे प्रबोधनात्मक कीर्तन
उत्तरोत्तर रंगतदार होत जाऊन श्रोत्यांना अंतर्मुख करी.त्या काळातील कमाल जातीयतेमुळे अस्पृश्यांना देवदर्शन दुरूनच होते तसेच त्यांना जवळ देखील कुणी येऊ देत नव्हते. त्यामुळे बाबांनी पंढरपुरात अस्पृश्यांसाठी वेगळी धर्मशाळा बांधली.
एखाद्या गावात सार्वजनिक विहिरीच्या परिसरात पालापाचोळा, घाण दिसली की, खराट्याने घाण स्वच्छ करीत गावकऱ्यांना सांगत, बाबांनो, ह्या घाणीमुळे रोगराई येते.ती आली की, लोक देवाला नारळ फोडतात. त्यामुळे रोगराई जाते. ह्या अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला करीत “स्वच्छ करा, स्वच्छ करा, गाव आपला स्वच्छ करा.जिकडे तिकडे घाण, तुम्हाला अन्न तरी कसे गोड लागते? अशा पद्धतीने स्वच्छतेचे महत्व पटवून देत.
त्यांची गावोगाव भटकंती सुरू असतांना, रूनमोचनच्या यात्रेच्या वेळी, नदीपात्रात यात्रेकरूंच्या आंघोळी आणि अन्य कारणाने जमीन निसरडी झाल्यामुळे अनेक यात्रेकरू घसरून पडले.तर काही जखमी झाले. ते पाहून बाबांनी टिकाव, फावड्याने ती जमीन खणून, त्यावर सुकी माती टाकल्यामुळे ती वापरण्यायोग्य झाली. हे करतांना मामेभाऊ बळीरामने त्यांना पाहिले. त्याने बाबांची आई, बायको, आणि मुलगा गोविंद ह्यांची भेट घालून दिली. तेव्हा आई, बायकोने घरी येण्याचा आग्रह केला. तेव्हा बाबा म्हणाले की, आई, मी आता तुझ्या बरोबर येतो. पण जर मला उद्या मरण आले तर काय करशील? त्यापेक्षा मला समाजाचे कार्य करू दे. असे सांगून गुंगारा देत पसार झाले.
देवाचं भजन करा, पण देवाला कोंबडं, बकरे कापू नका. मुक्या जिवाचा बळी देऊ नका. बळी दिलेला जीव देव खात नाही. माणसंच खातात. असे स्पष्ट करीत
येड लागलं जगाला, देव म्हणती दगडाला, तुम्हाला कुणी तयार केले? देवाने. देव कशातून तयार झाला? दगडाने. दगड कुणी फोडला? वडारानं. त्याची मूर्ती कुणी बनवली? शिल्पकारानं. मग देवाचा बाप कोण? येड लागलं जगाला, देव म्हणती दगडाला. अशा प्रकारे प्रश्नोत्तरांच्या खुमासदार शैलीतून प्रबोधन करीत.
लोकांची बाबांवर नितांत श्रद्धा होती. त्या श्रद्धेपोटी
मिळालेल्या देणग्यांतून ठिकठिकाणी अनाथालये ,शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा उभारल्या.
मी पामर परीट समाजात जन्माला आलो. परटाचा धंदा कपडे धुवून, घाण स्वच्छ काढण्याचा. मला देवाने कपडे धुण्यासाठी पाठविले नसून, समाजात ज्या वाईट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा,अज्ञान , जातीयतेचा मळ साचलाय, तो धुवून काढण्यासाठी पाठविले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा समकालीन होते. गाडगेबाबा जरी डॉ. आंबेडकरांपेक्षा 15 वर्षांनी मोठे असले तरी अन्य राजकिय व समाज सुधारकांपेक्षा
डॉ. आंबेडकरांच्या कार्याने ते अत्यंत प्रभावित होते. दोघांमध्ये दाट ऋणानुबंध होता. तो ऋणानुबंध दोन व्यक्तींमधील नसून आचार ,विचार, तत्त्वनिष्ठता, आणि परस्परांच्या कार्याचा आदर ह्यातून निर्माण झाला होता. त्याला तत्त्वनिष्ठ बैठक असल्यामुळे तो शेवटापर्यंत टिकला. त्यांच्यात कधीच मतभेदांची दरी निर्माण झाली नाही. ह्या ऋणानुबंधातूनच गाडगेबाबा कीर्तन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य आणि कर्तुत्वाचा आवर्जून उल्लेख करीत.
दोघांचे कार्य समान असून कीर्तन हे गाडगेबाबांच्या लोक प्रबोधन, जागृतीचे माध्यम होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ते कार्य सामाजिक चळवळ आणि राजकिय माध्यमातून केल्याचे दिसते. ह्या दोन्ही महापुरुषांना एकमेकां बद्धल आदर, प्रेम, जिव्हाळा, समन्वय आणि प्रचंड आत्मीयता होती. त्यामुळे बर्याचदा ते एकमेकांशी सल्ला मसलत करीत.
14 जून 1951 ला गाडगेबाबा आजारी असल्यामूळे
दादर येथील दवाखान्यात अॅडमिट झाले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय कायदेमंत्री होते.
ते दिल्लीला जाण्यासाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला पोहोचले असतांना, तिथे त्यांना ही बातमी समजली. तेव्हा त्यांनी पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून गाडगेबाबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दवाखाना गाठला. इतके त्यांचे परस्पर प्रेम होते.
बाबांचे मुंबईत कीर्तन असतांना डॉ. आंबेडकर संधी मिळेल तेव्हा कीर्तन ऐकायला जात असत. कीर्तनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जमिनीवर बसुन कीर्तन ऐकत. ते म्हणायचे, जिथे गाडगेबाबा, तिथे घाण असूच शकत नाही.
आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त मी अभिवादन करतो.
जयभीम.
अरुण निकम.
9323249487.
संदर्भ. शाहीर बाबासाहेब देशमुख ह्यांचे कीर्तन.
डॉ. आंबेडकर आणि संत गाडगेबाबा.
लेखक. प्रा. डॉ. नरेश शंकरराव इंगळे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत