.. संविधानवादी हिंदू व्हावे !

प्रा. रणजित मेश्राम
संघ-भाजपने निर्माण केलेल्या आव्हानांना उत्तर वा पर्याय, संविधानवादी (Constitutionalist) भूमिका होऊ शकते. विचार व्हावा.
प्रामुख्याने हिंदू बांधवांनी या संदर्भात गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा !पंत .. ते .. पंतप्रधान, नंतर पंतप्रधान .. ते .. परमात्मा .. असा काहीसा देशाचा प्रवास सुरु आहे. दरम्यान विद्यापीठ, शिक्षण बोर्ड आदी ‘शाखा’ होताहेत.
अशा काळात जे सुज्ञ हिंदू आहेत त्यांनी यावर व्यक्त व्हायला हवे. बरेचदा ही अव्यक्तता नंतर फार भारी पडते.
आंबेडकरवाद्यांच्या व्यक्ततेला मर्यादा आहेत. हवा तो परिणाम मिळत नाही, हे कडवे सत्य आहे.अव्यक्ततेला मौन किंवा दुर्लक्षतेची जोड असते. त्याचमुळे करणाऱ्यांना ‘प्रवृत्तीरोपण’ सोपे गेले. गफलतीत गमावणेच असते.
आधी, ‘हिंदू मार खाणार नाहीत’ सांगत हळूच शिरले. नंतर, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ सांगत रोवून घेतले. तोपर्यंत सत्ताप्राप्ती होऊन गेली. नंतर जय शिवाजी जय भवानी. पुढे जय श्रीराम.
आता उशिरा हिंदू जागा होऊ पाहतोय !
प्रधानमंत्री अलीकडे जी अचाट वक्तव्ये करतात तिथे केंद्रबिंदू हिंदू असतो. म्हणून हिंदूंची जबाबदारी मोठी झालीय. भारतीय या नात्याने तिला बहुसंख्यकतेचे मोठेपण आलेय. ती जशी सत्तेशी संलग्न आहे तशीच मत्तेशीही असावी. हिंदू तुष्टीकरण हे आधी हिंदूंनी लक्षात घ्यायला हवेय.
‘मंगळसुत्र’ ‘मुजरा’ सांगण्याइतपत आपण ‘कळप’ झालो काय ? कुणीही यावे अन् हाकलत न्यावे .. ! इथे दृढ, सुदृढ भूमिका निर्णायक ठरु शकेल !
मानसिक संकट लक्षात येणे, ही प्राप्तीच ! वेगवेगळ्या पातळ्यांवर लोक बोलताहेत. ते व्यक्ती वा प्रतिकाविरुध्द मर्यादित होऊ नये. प्रवृत्तीविरुध्द व्हावे. प्रतिक्रियेपुरते सिमित राहू नये.
तशीही संघीय चाल आता उघड पडलीय. लक्षात आलेय. राजकीय नेते सुध्दा बोलायला लागले आहेत.
याचमुळे राजकीयता आता वैचारिकतेकडे नेणे क्रमप्राप्त झालेय. इथे हिंदू बांधवांची जबाबदारी वाढतेय. इंडिया आघाडी नेते, राहुल गांधी बोलले आहेतच, भारताचे संविधान हे बाबासाहेबांच्या निर्मिती सोबतच ते गांधीजी .. बसवण्णा .. पेरियार .. बुध्दा .. यांची 'सोच' आहे.
ही सोच, हीच वैचारिकता !
यामुळेच, यापुढचे राजकारण हे विचारकारण करावे. संघवादी .. मार्क्सवादी .. गांधीवादी .. आंबेडकरवादी ..
.. तशाच वळणाने संविधानवादी !
ते केवळ राजकीय सारीपाट ठरु नये. ठरले ते निदानदेई ठरावे. ती केवळ निवडणूक नसावी. ती कल्याणप्रक्रिया असावी.
ते ‘देशघडण’ असेल. ते ‘लोकघडण’ असेल. त्यासाठी राजकारण !
लोकही दक्ष असतील. असावेत. संविधाननिर्दिष्ट मार्गावर जागता पहारा असेल !
वैचारिकता व अंमलता असे जोडनाते असेल !
० रणजित मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत