प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

१० फेब्रुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थापना दिन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. कवी मंगेश पाडगांवकरांनी विद्यापीठ गीत लिहिले आहे. त्यांचे शब्द आहेत, ‘पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान, ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’. या शब्दांप्रमाणेच विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानी नव्हे, तर कर्मशील बनविण्यासाठीही विद्यापीठ प्रयत्नशील असते. स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळामध्ये राज्यातील १२ जिल्ह्यांमधील उच्चशिक्षणाच्या विविध सुविधा पुरविण्याची जबाबदारी या विद्यापीठावर होती. १९६४ साली कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पुणे, नगर, नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचे कार्य सुरू राहिले. १९९० साली जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांसह दादरा-नगर हवेलीच्या केंद्रशासित प्रदेशामधील महाविद्यालये या विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर जून २०१४ पासून हे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणून ओळखले जात आहे. पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल आहे. ४११ एकरांच्या या संकुलामधून विविध पदव्युत्तर विभाग आणि प्रशासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलामधील मुख्य इमारत ही समस्त पुणेकरांसाठी शैक्षणिक अस्मितेचे प्रतीक ठरते. तिची प्रासादतुल्य अशी मुख्य इमारत. ब्रिटिश गव्हर्नरांच्या पुण्यातील मुक्कामासाठी एकोणिसाव्या शतकात बांधण्यात आलेली इटालियन शैलीतील ही देखणी वास्तू म्हणजे पुण्याला मिळालेला एक ऐतिहासिक वारसा आहे.

ब्रिटिशांच्या काळात ही इमारत म्हणजे सत्तेचे केंद्र होते. या राजभवनाचे ज्ञानभवनात रूपांतर झाले, ते पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर. १ जून १९४९ पासून या वास्तूमध्ये विद्यापीठाचा कारभार सुरू झाला. विद्यापीठाची बहुतेक प्रशासकीय कार्यालये सुरुवातीला याच वास्तूत होती. विद्यापीठाचा व्याप वाढत गेल्यानंतर अन्य प्रशासकीय इमारती बांधल्या गेल्या; परंतु या वास्तूतील गजबजाट काही कमी झाला नाही. विविध पदव्युत्तर विभाग सामावून घेणारे हे संकुल बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधाही पुरविते. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ. एम.आर. जयकर यांच्या नावानेच ओळखले जाणारे ‘जयकर ग्रंथालय’ केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर विद्यापीठाबाहेरील संशोधक आणि अभ्यासकांनाही खेचून आणते. इथे जवळपास साडेतीन लाख पुस्तके आणि दीड लाखांवर नियतकालिके आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधील जवळपास सातशे महाविद्यालये, १८५ मान्यताप्राप्त संस्था आणि वीसहून अधिक संशोधन संस्थांना सोबत घेत विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य सुरू आहे. मुख्य संकुला मध्ये असलेल्या चाळीसहून अधिक पदव्युत्तर विभागा मधून विद्यापीठ केंद्रावरील अभ्यासक्रम चालविले जातात. त्यामध्ये काही पदवीचे, काही पदविका व बहुतांश पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालतात. विज्ञानाच्या क्षेत्रातील जवळपास २५ विभागांमधून विद्यार्थ्यांना पारंपरिक विषयांसोबतच उपकरणशास्त्र, पर्यावरणशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वातावरण व अवकाशशास्त्र, माध्यम आणि संज्ञापन अभ्यास, आरोग्यशास्त्र, सायंटिफिक कम्प्युटिंग, बायोइन्फर्मेटिक्स, सेन्सर स्टडिज अशा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या विषयांच्या अभ्यास करण्याची संधी उपलब्ध आहे. विद्यापीठामध्ये असलेल्या तंत्रज्ञान विभागाने अगदी मोजक्या काळामध्येच आपल्या कार्याच्या आधारे संशोधनाच्या क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागामार्फत (पुम्बा) चालणारे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठीही आकर्षणाचे विषय ठरतात.

मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत विद्यापीठामध्ये एकूण २४ विभागांचे कार्य चालते. त्यामधील परकीय भाषा विभागातील अभ्यासक्रमांना नियमित विद्यार्थ्यां सोबतच नोकरदार वर्गाकडूनही मोठा प्रतिसाद मिळतो. मानवशास्त्र, संरक्षण व सामरिकशास्त्र, बुद्धिस्ट स्टडिज सेंटर, विधी विभाग, यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर ऑफ इंटरनॅशनल सिक्युरिटी अॅण्ड डिफेन्स अॅिनालिसिस (वायसी-निसदा), स्त्री-अभ्यास केंद्र आदी विभागांमधील अभ्यासक्रम सामाजिक शास्त्रांमध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकी शिक्षणाच्या चौकटीबाहेरील जगाची ओळख करून देण्यासाठी उपयुक्त ठरतात. भिन्न अभिरुची असूनही एका विशिष्ट विषयाकडे वळण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेमधील शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग, ललित कला केंद्र गुरुकुल, जयकर ज्ञानस्रोत केंद्र, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, कौशल्य विकास केंद्र ही महत्त्वाची केंद्रे ठरतात. याव्यतिरिक्त विद्यापीठामध्ये विविध विषयांना वा विचारांना वाहिलेली वेगवेगळी १७ अध्यासने स्थापन करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून संबंधित विषयांसाठीची वा विचारांवर आधारित सखोल संशोधने करण्याची संधीही मिळते. विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांतील अभ्यासक्रमांचेही फायदे व्हावेत, यासाठी गेल्या काही काळामध्ये विद्यापीठाने नामांकित परदेशी विद्यापीठांसोबत सामंजस्य करारही केले आहेत. अशा सर्वच शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या पसंती क्रमातील वरचे स्थान राखून आहे.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!