शिक्षणव्यवस्थेतील मनुवाद !

तुम्हाला रोहित वेमुला आठवतोय का ? तोच तो हैद्राबादच्या केंद्रीय विद्यापीठाचा विद्यार्थी ! विद्यापीठातील ब्राह्मणी शक्तींनी हॉस्टेलबाहेर काढल्यावर तो आपल्या रुममधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन बाहेर पडला होता. भारताचा कार्ल सगान बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या या बुद्धीमान व बाणेदार आंबेडकरवादी युवा विद्यार्थ्याचा शिक्षणव्यवस्थेतील मनुवादी प्रवृत्तीने निष्ठूर बळी घेतला.
दुसरे उदाहरण डॉ पायल तडवी या आदिवासी तरुणीचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करणाऱ्या या बुद्धिमान तरुणीचा जातीवरून एवढा छळ करण्यात आला की , तिने चिठ्ठी लिहून स्वहत्या केली. त्यानंतर तिच्या सहाध्यायींना अटक झाली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
या दोन प्रकरणांचा विविध कारणास्तव प्रसारमाध्यमांत गाजावाजा झाल्यामुळे जनतेला उच्च शैक्षणिक क्षेत्रांतील मनुवाद समजून तरी आला. परंतु अशी शेकडो प्रकरणे दरवर्षी होत असतात. काहींची नोंद होते, तर काहींची नोंद देखील होत नाही ! काही वर्षांपूर्वी मुंबईतून गांधीनगर आयआयटी येथे शिकायला गेलेल्या एका अतिशय हुशार ओबीसी मुलाची छळवणूक करून त्याला कॅालेज सोडण्यास भाग पाडले. त्याच्या सुशिक्षित वडीलांनी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ संसाधन मंत्रालयासह अनेक दरवाजे ठोठावले. परंतु कुठेही न्याय मिळाला नाही.
उच्च शिक्षणातील या मनुवादी प्रवृत्तीचे एक प्रमुख कारण म्हणजे या क्षेत्रांतील शिक्षकवृंदांत अनुसूचित जाती-जमाती व ओबीसींचे प्रतिनिधीत्व नाही. केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने २०१९ साली लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार २३ आयआयटी मधील ६,०४३ शिक्षकांपैकी अवघे १४९ हे अनुसूचित जातींचे व २१ हे अनुसूचित जमातींचे होते. एकूण शिक्षकांच्या संख्येशी तुलना करता ही संख्या अवघी ३% एवढीच भरते.
त्याचप्रमाणे १३ आयआयएमच्या एकूण ६४२ शिक्षकांपैकी अनुसूचित जातीचे केवळ ४ तर अनुसूचित जमातीचा केवळ एक शिक्षक असल्याचे केंद्र शासनानेच सांगितले आहे. अनुसूचित जाती-जमातींची एकूण लोकसंख्या ही २५% आहे , ही वस्तुस्थिती विचारात घेतली तर शिक्षक भरतीतील पक्षपाताचा व त्या अनुषंगाने उच्च शिक्षण संस्थांतील मनुवादाचा उलगडा होतो !
हा पक्षपात उघड करणारी एक लक्षणीय बातमी तारीख ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रिंट’ या ॲानलाईन पोर्टलने टाकली आहे. मद्रास आयआयटी मधील तथाकथित व स्वयंघोषित उच्च जातीयांनी अनुसूचित जाती- जमाती व ओबीसी यांच्या भरतीत कसे अडथळे आणले हे विपीन वेतील नावाच्या प्राध्यापकाने पत्र लिहून थेट प्रधानमंत्री यांना कळवल्याचे बातमीत म्हटले आहे. मद्रास म्हणजे चेन्नई हा आपल्या पेरियार रामासामी नायकर यांच्या द्रविड चळवळीचा बालेकिल्ला ! तिथे अशी अवस्था तर इतरत्र काय परिस्थिती असेल ?
या संदर्भात एन सुकुमार यांनी ‘कास्ट डिस्क्रिमिनेशन इन इंडियन युनिवर्सिटीज’ असे पुस्तकच लिहिले आहे. त्यात उच्च शिक्षणातील जाती आधारित पक्षपाताचा सविस्तर उहापोह केला आहे. ज्या कोणाला आपली संस्कृती फार थोर व सर्वसमावेशक वाटत असेल त्यांनी आपले भ्रम दूर करण्यासाठी तरी अशी पुस्तके जरूर वाचावीत !
यांतील डोळ्यांत भरणाऱ्या विसंगती म्हणजे पाश्चात्य देशांत ‘डायव्हरसिटी इंडेक्स’ म्हणजे ‘वैविधता सूचकांक’ वापरून तिथे शिकलेले तथाकथित व स्वयंघोषित उच्चजातीय विद्यार्थी (व त्यांचे ‘सुसंस्कृत’ पालक !) भारतातील जाती आधारीत आरक्षणाला विरोध करण्यात सर्वात पुढे असतात. डायव्हरसिटी या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे विविधता ! यानुसार आपल्या संस्थेत जगातील विविध देश-संस्कृतीचे विद्यार्थी शिकावेत , असे तेथील शासनाचे धोरण असते. या एक प्रकारच्या राखीव जागाच आहेत ! म्हणजे पाश्चात्य देशातील राखीव जागांचा फायदा घेणारे मनुवादी , भारतातील राखीव जागांना मात्र विरोध करतात ! मनुवाद हे कसे सैतानाचे तत्त्वज्ञान आहे , हे यांवरुन सिद्ध होते.
यांवर उपाय काय ? उच्च शिक्षण घेणाऱ्या आरक्षित संवर्गातील विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संघटन अशा प्रकारांना आळा घालू शकते. मूळ बामसेफचे संस्थापक सदस्य असलेले डॅा अमिताभ यांनी त्यांचे सहकारी प्रा एन एल साव यांच्या सहाय्याने असे संघटन उभारले होते. मुंबईतील ‘बानाई’ संघटनेचा अध्याय तेथूनच रंगात आला. प्रा साव यांनी नंतर प्राध्यापकांचे संघटन बांधून थेट विद्यापीठातील राखीव जागा भरण्याची चळवळ चालवली. आज जागोजागी दिसणारे प्राध्यापक हे प्रसिद्धीचा हव्यास न बाळगलेल्या अशा निरलस व सेवाभावी कार्यकर्त्यांच्या कष्टांचे फळ आहे. मुंबई , पुणे , औरंगाबाद , नागपूर येथील डॅा आंबेडकर मेडिकोज असोसिएशन देखील कार्यरत आहे. विशेषत: उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे असे संघटन प्रत्येक शहरांत निर्माण करायला हवे. हे संघटन संस्थेचे प्राचार्य / डीन तसेच शिक्षकांशी नियमितपणे संवाद साधून अनेक अडचणी सोडवू शकते. या संवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर पालकांशी आपणांस वेळोवेळी संवाद साधावा लागतो , याचा संस्थेतील शिक्षक – प्राचार्य यांच्यावर सुपरिणाम होऊ शकतो. याद्वारे शैक्षणिक क्षेत्रातील मनुवादी माणसांत येऊ शकतात !
——— शुद्धोदन आहेर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत