मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक
शिक्षण वाचवण्याचे रणशिंग फुंकणारी, नांदेड शिक्षण बचाव परिषद!
२८ जानेवारी २०२४ रोजी नांदेड नगरीत तिसरी विभागिय 'शिक्षण बचाव परिषद' संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हस्ते झाले.मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मंचावर शिक्षण बचाव समितीचे राज्य समन्वयक रमेश बिजेकर, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, परिषदेचे स्वागताध्यक्ष मा.एकनाथदादा पवार, मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांची मंचावर उपस्थिती होती. प्रास्ताविक व्यंकटराव चिलवरवार यांनी केले. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था धोक्यात आली असून शिक्षकांसह सर्व समाजघटकांनी पुढाकार घेऊन ही व्यवस्था वाचवावी लागेल असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.मानवाच्या विकासात शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असताना सरकार त्यापासून पळ काढत असल्याने शिक्षण बचाव परिषद आयोजित करावी लागत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. परिषदेचे बीजभाषण करताना शिक्षण बचाव मंचचे राज्य समन्वयक रमेश बिजेकर म्हणाले की फुले-शाहू-आंबेडकरांमुळे सर्वसामान्याला शिक्षण मिळाले परंतु सरकारची धोरणे शिक्षणाचे खाजगीकरण करून सरकार सर्वसामान्यांना शिक्षणची दारे बंद करणारी असल्याने शिक्षण बचाव चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप द्यावे लागेल. शिक्षण आणि शिक्षकांचे प्रश्न विधिमंडळाच्या वेशीवर टांगण्यासाठी घटनाकारांनी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निर्माण केले.या मतदार संघाचे राजकीयीकरण झाल्याने शिक्षण व शिक्षकांचे प्रश्न विधिमंडळात बेवारस झाले असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी केले.
उद्घाटन सत्रानंतर या परिषदेत दोन सत्रे झाली. पहिले सत्र लेखक आणि विचारवंत प्रा. डाॅ. पुरूषोत्तम जुन्ने यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या सत्रांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आमच्यासाठी आहे काय? या विषयावर पीपल्स कालेज नांदेडचे प्रा. डाॅ. डी. एन. मोरे यांनी प्रकाश टाकला. अशैक्षणिक कामांची व्याप्ती व त्याचे शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणारे परिणाम या विषयावर मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी भाष्य केले. अध्यक्षीय समारोपात प्रा. डाॅ. पुरूषोत्तम जुन्ने यांनी या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने झालेल्या मांडणीचा आढावा घेत शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण रोखण्याची गरज प्रतिपादन केली.
समारोप सत्राचे अध्यक्ष सत्यशोधक सभेचे मा प्रभाकर गायकवाड होते. या सत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मिथक या विषयावर प्रा. डाॅ. रेणुकादास उबाळे यांनी प्रकाश टाकला. शिक्षण बंदी आंदोलनात्मक भूमिका कामगार नेते काॅम्रेड आण्णा सावंत यांनी विषद केली. मराठवाड्याचे शैक्षणिक वास्तव या विषयाचे विवेचन आकडेवारीसह लेखक विचारवंत प्रा. डाॅ. मारोती तेगमपुरे यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रभाकर गायकवाड यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांची परंपरा आणि मनुवादी परंपरा यातील संघर्ष परिषदेसमोर उलगडून दाखवला. परिषदेत तेरा ठराव पारित करण्यात आले.परिषदेस डॉ. बालाजी कोम्पलवार, उपप्राचार्य नाना शिंदे, आनंद मोरे, डॉ. डी. एन. मोरे, डी बी नाईक आर. पी. वाघमारे, तानाजी पवार, विठ्ठल चव्हाण, प्रा. परशुराम येसलवाड, तानाजी पवार, जी पी कौशल्य, विजयालक्ष्मी स्वामी, मन्मथ मठपती, डी जी तांदळे, अशोक मस्कले, राम यडते, वसंत माने, मोहन पिनाटे, राजेश जाधव, विनोद भुताळे, बालाजी टिमकी कर यांच्यासह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून शेकडो प्रतिनिधी परिषदेस उपस्थित होते. सर्व सत्रांचे बहारदार सुत्रसंचालन प्रा. आनंद करणे यांनी केले. या परिषदेद्वारे शिक्षण बचावचे रणशिंग फुंकण्यात आले.
राजकुमार कदम.
सरचिटणीस
मराठवाडा शिक्षक संघ.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत