प्रवाशांना सुखरूप पोहोचवून ST चालकाने सोडले प्राण:हिंगोली बसस्थानकाच्या विश्रांती कक्षात घेतला अखेरचा श्वास.
सोलापूर येथून प्रवासी घेऊन हिंगोलीकडे निघालेल्या बस चालकाला रस्त्यातच अस्वस्थ वाटू लागले गंगाखेड येथे रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन प्रवाशांना सुखरुप हिंगोली बसस्थानकावर पोहचविल्यानंतर चालकाने कर्मचारी विश्रांती कक्षात प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. सुरेश सदाशिव सलामे (५५) असे चालकाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या बाबत आगाराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सुरेश सलामे हे मागील २५ वपर्षापासून हिंगोली आगारामध्ये चालक यापदावर कार्यरत आहेत. मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील असलेले सलामे हे मागील काही वर्षापासून हिंगोलीत राहतात.
दरम्यान, गुरुवारी दुपारी तीन वाजता लातुर-हिंगोली बस घेऊन ते लातुर येथून निघाले होते. त्यानंतर त्यांना गंगाखेडजवळ अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी तेथील रुग्णालयात जाऊन प्राथमिक उपचार घेतले अन बस घेऊन पुन्हा हिंगोलीकडे निघाले. रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना हिंगोलीच्या बसस्थानकावर सुखरुप सोडून त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटत असल्याने ते जून्या कर्मचारी विश्रांती कक्षात जाऊन झोपले. लातुर -हिंगोली बस नंतर हिंगोली आगाराची कोणतीही बस रात्री परत येत नसल्यामुळे जुन्या कर्मचारी विश्रांतीकक्षात कोणीही गेले नाही.
त्यानंतर आज सकाळी या कक्षात काही कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी चालक सलामे हे मृतावस्थेत आढळून आले. याप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आगार प्रमुख थोरबोले, वाहतुक नियंत्रक एफ. एम. शेख, कर्मचारी मुकेश ठोंबरे, पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, जमादार संजय मार्के, अशोक धामणे याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयत सलामे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला आहे. या घटनेमुळे आगार प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत