वैज्ञानिक दृष्टिकोन , एक मूल्य:-निर्भयता
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रारंभ युरोपमध्ये सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे अलीकडच्या 500 वर्षांपूर्वीच्या दरम्यान झाला असे मानण्यात येते; परंतु तपासणीची विकसित यथायोग्य अचूक पद्धत हे त्याचे केवळ एक रूप आहे. त्याचा गाभा आहे, प्रस्थापित मताला स्वतःच्या प्रज्ञेने निर्भयपणे व आव्हान देण्यात आणि त्यासाठी मृत्यूदंडापर्यंत सोसाव्या लागणाऱ्या सर्व हालअपेष्टा हसतमुखाने स्वीकारण्यात. त्याची सुरुवात होते इ.स. पूर्व ३९९ साली. अथेन्स नगरीच्या लोकसभेत सॉक्रेटिस वर चालवलेल्या अभियोगा चे वेळेपासून तेथील राज्यकर्त्यांच्या मते सॉक्रेटिसचे प्रतिपादन याचा अर्थ पाखंड माजवणे असाच होता. त्यासाठी सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्राशन करणे किंवा स्वतःच्या मताचा जाहीर त्याग करून राज्य सोडून जाणे, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सॉक्रेटिसने शांतपणे विषाचा प्याला प्राशन केला. आपल्या विवेकबुद्धीचा आवाज व आग्रह कायम ठेवण्यासाठी सारे स्वजन आणि समाज यांच्या विरुद्ध उभे राहण्याचे धैर्य ज्या समाजात ज्या प्रमाणात प्रगटले त्या त्या प्रमाणात अंधश्रद्धेची जोखडे झुगारणे व विज्ञानाची कवाडे उघडणे शक्य झाले.
स्वतःच्या मतांसाठी मृत्यू पत्करावयाचा ही संस्कृती सॉक्रेटिसने प्रथम जगात आणली. सॉक्रेटिसची ही परंपरा ज्या काळात लुप्त झाली, त्या काळात युरोपची प्रगती देखील कुंठित झाली. वैज्ञानिक दृष्टिकोन व बौद्धिक साधन सामग्री बरोबरच स्वतःच्या जीवाची बाजी लावून समाजाची मानसिकता निर्भयपणे तयार करण्याचे काम ७०० वर्षांपूर्वी युरोपमध्ये चालू झाले. यातून प्रबोधनाची (रेनेसाँ) पहाट झाली खरी; पण तो संघर्ष जीवघेणा आणि दीर्घकाळ होता. रॉजर बेकन (१२१४ – १२९४) विद्यार्थी असतानाच अॅरिस्टॉटलचे वचन व त्याचे सिद्धांत प्रयोग करून पाहिल्या शिवाय मी मानणार नाही, असा पीळ दाखवू लागला. ‘सत्यज्ञान हे धर्मग्रंथांवरून मिळत नाही, ते अंधश्रद्धेने प्राप्त होत नाही, ते फक्त बुद्धी, स्वानुभव, चिंतन, प्रयोग यांनीच प्राप्त होते.’ असे तो सांगू लागला. तो स्वतः फ्रान्सिस्कन पंथांचा धर्मगुरू असल्याने त्याच्या पंथाच्या धर्माचार्यांनी त्याला देह दंडाऐवजी आजन्म अंधार कोठडीची कनवाळू सजा दिली . जगाला ज्ञान किरणांनी उजळून टाकण्याची इच्छा धरणाऱ्या या ज्ञानी पुरुषाला मृत्यूपर्यंत (२४ वर्षे) अंधारकोठडीत काढावी लागली.
भारतात मात्र चार्वाक आणि बुद्धानंतर पाश्चात्य विद्येचा प्रभाव निर्माण होईपर्यंत मधल्या दोन हजार वर्षांत ‘विचार तर कराल’ हा पुकारा करण्यासाठी हौतात्म्य पत्करून जनमानसाला जाग आणण्याचे प्रयत्न झालेच नाही. ‘सुधारक’ कार गोपाळ गणेश आगरकर असे म्हणाले होते की नुसते ज्ञान वाढून उपयोग नाही, त्याप्रमाणे वागण्याचे धैर्य यावयास हवे. न्या. महादेव गोविंद रानडे हे विधवाविवाह व प्रौढ कुमारिका विवाह यांच्या बाजूचे सुधारक होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. म. फुले त्यांना म्हणाले. ‘झाले ते वाईटच झाले; पण आता तुम्हाला एक संधी आहे. तुम्ही पुनर्विवाह करताना विधवेशी किंवा प्रौढ कुमारीकेशी करा.’ विचार म्हणून न्या. रानडेंना हे मत मान्यच होते; परंतु ते अंमलात आणले असते, तर घरच्यांच्या आणि समाजाच्या रोषाचे बळी व्हावे लागले असते. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्षात विवाह परंपरेप्रमाणे लहान मुलीशीच केला. तेव्हापासून महाराष्ट्रात ‘कर्ते सुधारक’ आणि ‘बोलके सुधारक’ हे शब्द अस्तित्वात आले. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी की, ही निर्भयता फारच थोड्या लोकांना संपूर्णपणे आचरणे शक्य होते. ती निर्भयता व कृतीशीलता ज्यांना जमत नाही त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा, रूढीपरंपरा बदलण्याचा, विवेकवादाचा केलेला उच्चार हे ढोंग ठरत नाही. कारण हा उच्चारदेखील संघर्षांना जन्म देतो आणि तो उच्चार करण्यासाठीही निर्भयता लागतेच. रिचर्ड डॉकिन्स लिहितात, “आपल्या बाळाला अवैज्ञानिक व चुकीचे संस्कार बहुतेक वेळा आई कडून ही मिळू शकतात. त्याचा दुष्परिणाम आयुष्यभर टिकू शकतो.”
आज भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनाची स्थिती निराशाजनक आहे. .सर्व साधारण माणसे सोडा पण विज्ञानपदवीधर, तसेच शासनातील उच्चपदस्थ अधिकारी,ह्यांना ही वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी माहिती नसते असे दिसते.” एखादी गोष्ट किंवा एखादे विधान सत्य असण्याची शक्यता आहे का ? हे जाणण्यासाठी कोणी थोर व्यक्ती ने सांगितले,कुठे पुस्तकात लिहिले आहे, धर्म ग्रंथात लिहिले आहे म्हणून ते खरे किंवा सत्य आहे असे मानू नका तसेच इतर सर्वजण ते खरे मानतात म्हणून आपण ही खरे माना असा , पूर्वग्रह न ठेवता, बुद्धी, ज्ञान, अनुभव, कॉमनसेन्स् यांचा वापर करून, तर्कशुद्ध विचाराने खरे खोटे ठरविणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असणे.
तसेच आपल्या आसमंतात काय घडते ? कसे घडते ? याविषयी कुतूहल असणे, निरीक्षणे करणे, त्याचे कारण शोधणे, त्याचा कार्य-कारण भाव समजून घेणे या गोष्टीही वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आवश्यक आहेत. संविधाना नुसार प्रत्येक भारतीयाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार व प्रसार करणे हे कर्तव्य सांगितले आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासासाठी पोषक वातावरण हवे. भारतात ते नाहीच. इथे देव-धर्म-श्रद्धा यांचा नेहमीच सुळसुळाट असतो.
आपले पालक, आसपासची मोठी माणसे, काय बोलतात, शाळेत शिक्षक काय सांगतात, टीव्हीवर काय दाखवतात, ते बालक पाहाते, ऐकते. त्याच्या डोक्यात बसलेल्या खोट्या व चुकीच्या गोष्टी काढून टाकणे अवघड असते. बालपणी मेंदूवर झालेले संस्कार दृढ होतात. भांड्यावर कोरलेले नाव जसे सहजी पुसता येत नाही, तसेच बालपणी मेंदूवर बिंबवलेले संस्कार जाता जात नाहीत.
मेंदूवर होणारे चुकीचे व अज्ञानाणे भरलेले संस्कार टाळण्यासाठी प्राथमिक शाळा ते पदवी च्या अभ्यासक्रमांत वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयाचा समावेश हवा. तर्कसंगत विचार, विश्लेषण, चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे, या गोष्टी शिकवायला हव्यात. पण हे कठीण दिसते. कारण अभ्यासक्रम समितीचे बहुतेक सदस्य श्रद्धाळू असणार. शिक्षक, प्राध्यापक हे बहुसंख्येने रूढिग्रस्त असतात. त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे वावडे असते. हे चित्र आमूलाग्र बदलले तरच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होऊ शकेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत