महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

नाताळ निमित्त एक पोस्ट फिरत होती. ती म्हणजे अरे आपला वासुदेव असतांना सांताक्लॉज़चे काय कौतुक लावले आहे? यावर प्रा. सुमित गुणवंत यांचे उत्तम विश्लेषण

“आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेले विकृत माणसं..?”

वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही..
उलट भटक्यांच्या केल्या गेलेल्या पिळवणुकीची ती सांस्कृतिक व्यवस्थाच वाटत आलीय.
संस्कृतीच्या तथाकथित उच्चजातीतील ठेकेदारांनी कधीतरी आठवड्यातून एखादा दिवस पोतराज, पिंगळा, वासुदेव होऊन भीक मागावी मग त्यांना समजेल संस्कृती जपणे किती अवघड आहे,

वासुदेवाचं गाणंच फक्त सुंदर असतं हो …जगणं नसतं.
पोतराजाचा आशीर्वाद चांगला असतो हो …आयुष्य अजिबात नसतं.
सोसायट्यांमध्ये तर पाट्या असतात “फेरीवाल्यांना बंदी अन्यथा कारवाई केली जाईल” (या वाक्यात वासुदेव , पिंगळा ,पोतराज इत्यादी सायलेंट आहेत)
आणि ही कारवाई ठेचून मारण्या इतपत केलेली आहे’
ज्यांना तुम्ही तुमच्या सोसायटीत एंट्री देत नाहीत ते तुमच्या समाजाच्या संस्कृतीचे वाहक कसे असतील..?

वासुदेव,पिंगळा ,पोतराज ही आमची संस्कृती म्हणून अभिमानाने सांगणाऱ्यांना आपल्या लेकरांनी संस्कृती जपण्यासाठी पिंगळा,पोतराज, वासुदेव होऊन फिरलेलं चालेल का..?
एवढंच काय तर स्वतः वासुदेव, पिंगळा, पोतराज यांना सुद्धा आपल्या पोरांनी आपण जे करतो ते करू नये असंच वाटतं..
मग यात नेमकी कोणती संस्कृती आहे.?
अभिनय म्हणून ही पात्र साकारून पैसे कमावणे आणि मजबुरीत उदरनिर्वाहासाठी हे आयुष्य जगणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे..
तमाशावर चित्रपट काढून निर्माते दिग्दर्शक कलाकार श्रीमंत झाले..
पण ज्यांच्या आयुष्यावर चित्रपट निघाले त्यांच्या आयुष्याचा तमाशाच झालाय..
आम्ही मासे मटण आवडीने खातो, पण ज्यांच्याकडून हे विकत घेतो त्यांच्या वस्तीचा तिरस्कार करतो.

आपल्या घरातील पोरांनी फॅशन म्हणून केस वाढवले तर लगेच वाक्य असतं ” काय पोतराज व्हायचं का.?”
सहजच लहान पोराने बोटांनी काही वाजवल तर
“काय डफड घेऊन देऊ का?”
आम्ही तुळशीच लग्न मोठ्या थाटामाटात लावतो पण गरीबाच्या लग्नाला मदत तर सोडा पण साधे लग्नाला जाण्याचेही कष्ट घेत नाहीत.

वासुदेवाची वारी नेहमीच तुमच्या दारावर येते पण कधीतरी तुमची ही वारी वासुदेवाच्या दारावर जाऊद्या आणि पहा त्या रुखमाईच्या डोळ्यात समजेल तुम्हाला तिचा पांडुरंग किती फाटका आहे.
जा जाऊन पहा, मरीआईचा गाडा ओढणाऱ्या पोतराजाच्या संसाराचा गाडा कसा मोडकळीस आलाय,
पहा जागे होऊन तुम्हाला झोपेतून उठवणाऱ्या पिंगळ्याच्या आयुष्यातील रात्र तशीच आहे,
तुम्हाला प्रसन्न पिंगळावेळ देणाऱ्या पिंगळ्याची अजूनही चांगली वेळ आलेली नाही,
लहान मुलांना विरंगुळा म्हणून दाखवतो ना
—हा पहा वासुदेव, हा पहा पोतराज, हा पहा पिंगळा,
घेऊन देता ना डमरू, प्लास्टिकच डफड, ताशा, छोटासा ढोलक,
करतो ना स्वतःच्या पोरांचा मेकअप सांस्कृतिक कार्यक्रमांना?

मग एकदा त्यांच्याही मुलांची अवस्था पाहायला पाहिजे…फाटक्या तुटक्या कपड्यात कळकटलेल्या शरीराने रापलेले, बालपण हरवलेली उद्याची त्यांची पिढी डोळ्यांआड कशी करू शकतो..?
सिग्नलवर भीक देतो, खाऊ देतो आणि त्याच्या बदल्यात तोच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून स्वतःच कौतुक करून घेतो,
साधं भीक सुद्धा फुकट न देणारे आपण लोककला जपा म्हणून गळा का काढतोय..?
लोककला जपा म्हणून आपण एका खूप मोठ्या लोकसमूहाचाच गळा दाबत आहोत हे आपल्या कधी लक्षात येणार?

दारात आलेल्या भिकाऱ्याला भीक देऊन काहीतरी मोठी समाजसेवा केली अशा अविर्भावात वावरणाऱ्या संस्कृतीच्या ठेकेदारांना एकच सांगणे आहे की कधी तरी संस्कृती जपण्यासाठी न बोंबलता स्वतः कृती करा,

एक तरी लेकरू संस्कृतीला सोडा,
पोतराज व्हा, मरीआईचा गाडा ओढा,
पिंगळा व्हा, पहाटे गाणं म्हणत फिरा,
वासुदेव व्हा अंगावर चिंध्या बांधून भीक मागा,
घरातील स्त्री मुरुळी सोडा,
संस्कृती जपायची म्हणजे हे तर करावेच लागेल ..?
जमेल ना माझ्या प्रिय ठेकेदारांनो ?
किती दिवस भटक्या जाती जमातींची पिळवणूक करणार ?
व संस्कृती संस्कृती म्हणून विकृतीच रक्षण करणार आहात..?
“आमचा सांता हरवलेला नाही आमचा विवेक हरवलाय”
“आमच्या संस्कृतीची तुळस हरवलेली नाही,
आमचा विकृतीचा कळस झालाय”
आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेले विकृत माणसं आहोत..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!