प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण भाग २०
मागील भागात
१. अविद्या (Ignorance, Lack of Knowledge)
२. संस्कार (Conception)
३. विज्ञान (Consciousness) ४. नामरूप (Mind and Body)
५. षडायतन
६. स्पर्श
७. वेदना
या कड्यांबद्दल माहिती घेतली. आता पुढील कड्यांची माहिती घेऊया.
८) तृष्णा
प्रतित्यसमुत्पादाची आठवी कडी म्हणजे तृष्णा.
एखादी वस्तू प्राप्त करण्याची सतत व प्रबळ इच्छा म्हणजेच तृष्णा होय.
वेदनेमुळे तृष्णा उत्पन्न होते.
रुप, काम, मैथून, शब्द, गंध, रस, स्पर्श इत्यादी लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी युक्त असलेली भावना म्हणजे तृष्णा होय. तृष्णेमुळे दु:खाची निर्मिती होत असते. मोह किंवा अविद्येमुळे आपण कोणत्याही वेदनेवर लोभाची किंवा द्वेशाची प्रतिक्रिया व्यक्त करित असतो. यालाच तृष्णा म्हणता येईल.
एखादी न आवडणारी व्यक्ती, वस्तू किंवा स्थिती आपल्यासमोर आली तर ती नकोशी वाटून आपण त्याचा द्वेष करायला लागतो. मनातील संस्कार नकाराची भावना व्यक्त करतात. याच भावनेने आपण दु:खी होत असतो.
किंवा याच्या उलट एखादी आवडणारी व्यक्ती, वस्तू किंवा स्थिती आपल्यासमोर आली तर ती आपल्याला हवी-हवीशी वाटून आपण त्याचा लोभ करायला लागतो. मनातील संस्कार आवडल्याची भावना व्यक्त करतात. याच लोभाच्या, आसक्तीच्या भावनेने क्षणीक सुख मिळते. तेव्हा सुखद वेदना उत्पन्न होते. परंतु ती दूर गेली की आपण दु:खी होत असतो. म्हणजेच ती वस्तू दूर करण्याची तृष्णा निर्माण होते. अशा तर्हेने एखादा तिरस्कार, घृणा किंवा आसक्ती यांच्या हव्यासामुळे दु:खाचे कारण बनते. मोह म्हणजे अज्ञान किंवा अविद्या यामुळेच हे लोभ, द्वेशाचे चक्र सुरु राहते.
तृष्णेचे तीन प्रकार आहेत.
१. कामतृष्णा
इंद्रिय तृष्णेलाच कामतृष्णा म्हणतात. मानवाच्या सहा इंद्रिय म्हणजे डोळा, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन यांचे सहा विषय आहेत. ते म्हणजे पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे, स्पर्श करणे व मनात कल्पना किंवा विचार येणे. यात ही इंद्रिय तृष्णा बाधलेली राहते.
२. भवतृष्णा
भवतृष्णा ही काम तृष्णेशी निगडीत आहे. इंद्रियांच्या काम सुखासाठी जास्त वेळ जीवंत राहण्यासाठी ही तृष्णा कार्यरत असते.
३. विभवतृष्णा
ही सुद्धा इंद्रिय सुखाशी निगडीत आहे.
वेदनेचा निरोध केला असता तृष्णेचा निरोध होतो.
९) उपादान
प्रतित्यसमुत्पादाची नववी कडी म्हणजे उपादान. तृष्णेमुळे उपादान उत्पन्न होते.
उपादान म्हणजे घट्ट पकडून ठेवणे. जरी एखाद्या घट्ट पकडून ठेवलेल्या गोष्टीपासून त्रास, कष्ट, दु:ख होत असले तरी ती गोष्ट न सोडणे.
तृष्णेचा हळूहळू आपल्या मनात संचय वाढत जातो. त्यामुळे त्याची मनावर घट्ट पकड बसते. तृष्णेच्या याच संचयाला उपादान म्हणतात. तृष्णेच्या संग्रहाने अर्थात उपादानाने प्रभावित होऊन मनुष्य पुढील कर्म करीत असतो. उपादान चार प्रकाराचे आहेत. पहिले कामउपादान म्हणजे सर्व प्रकारच्या आनंद देणार्या, सुख देणार्या, आवडणार्या आणि लैंगिक समाधान देणार्या गोष्टीसंबंधी अत्यंत पराकोटीचे आकर्षण असणारी विचारसरणी.
दुसरे दृष्टीउपादन म्हणजे असा विश्वास की, ‘हे एकच बरोबर आहे व बाकीचे चुकीचे आहे’ असा एकांगीपणाची विचारसरणी.
तिसरे उपादान म्हणजे कर्मकांडाने मनुष्य पवित्र होतो, त्याच्यावर कोणतेही संकट येणार नाहीत किंवा आलेल्या संकटाचे निवारण होईल, त्याला भौतिक लाभ होईल, त्याला सुख मिळेल अशा प्रकारची विचारसरणी.
चौथे सत्कायदृष्टी उपादान म्हणजे ‘मी’, ‘माझे’, ‘माझा आत्मा’ अशी आत्मभावाचे दृष्टी व नेहमी बदलत असणार्या जगाला न बदलणारे आहे, आत्मा कायम टिकणारा आहे अशी धारणा बाळगणारी विचारसरणी.
तृष्णेचा निरोध केला असता उपादानाचा निरोध होतो.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२.१.२०२४
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत