प्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण भाग १७

१) अविद्या
प्रतित्यसमुत्पादाची पहिली कडी म्हणजे अविद्या.
अविद्या म्हणजे चार आर्यसत्याचे अज्ञान. या चार आर्यसत्याचे यथार्थ ज्ञान नसणे. अशा अविद्य लोकांना त्यांच्या मनाविषयी व शरीराविषयी तीन प्रकाराचे भ्रम निर्माण होत असतात.
आपले शरीर आणि मन म्हणजे मी, माझे व माझा आत्मा’ हे भ्रम वाढत गेल्यावर हव्यास निर्माण होतो. हा हव्यास वाढल्यानंतर वर्तमानातील आणि भविष्यातील जीवनक्रम घडविणारी कृत्ये घडत असतात.
२) संस्कार
प्रतित्यसमुत्पादाची दुसरी कडी म्हणजे संस्कार. अविद्येमुळे संस्कार उत्पन्न होतात.
ज्यांना चार आर्यसत्याचे यथार्थ ज्ञान झाले त्यांची प्रज्ञा विकसित होत असते. ते जग जसे आहेत तसे पाहतात. अज्ञान नष्ट होते. अविद्या नष्ट होऊन त्यांचे संस्कारही नष्ट होतात. ते असंस्कारीत होतात. त्यांना निर्वाण प्राप्त होते.
संस्कार म्हणजे कृत्य करणे, योजना करणे, काम करण्यासाठी हालचाल करणे की ज्यामुळे त्या कृत्याचा, योजनेचा कामाचा परिणाम नैतिकदृष्ट्या चांगला किंवा वाईट, कुशल किंवा अकुशल, पुण्यमय किंवा पापमय होत असतो. चांगल्या अथवा वाईट कृत्याचा झालेला परिणाम म्हणजेच संस्कार. संस्कार आपल्या वर्तमान आणि भविष्यातला शारीरिक, वाचिक आणि मानसिक सर्व कृत्याचा जीवनक्रम ठरवीत असतात.
अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो.
३) विज्ञान
प्रतित्यसमुत्पादाची तिसरी कडी म्हणजे विज्ञान. संस्कारामुळे विज्ञान उत्पन्न होतात. विज्ञान म्हणजे जाणणे, निरनिराळ्या प्रकारे अनुभूती घेणे. आपण आपल्या पाच इंद्रियाद्वारे आणि मनाद्वारे निरनिराळ्या प्रकारची अनुभूती घेत असतो. जसे आपण आपल्या डोळ्याद्वारे बाह्य वस्तूमात्र जाणत असतो. कानाद्वारे आवाज जाणत असतो. नाकाद्वारे वास जाणत असतो. जिभेद्वारे चव जाणत असतो. त्वचेद्वारे स्पर्श जाणत असतो. आणि मनाद्वारे कल्पना आणि विचार जाणत असतो. अशा तर्हेने विज्ञान सहा प्रकारचे आहेत. चक्षू विज्ञान, कर्ण विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, स्पर्श विज्ञान आणि मनोविज्ञान. तसेच ज्याचा परिणाम कुशल कर्मात होतो व ज्याचा परिणाम अकुशल कर्मात होतो अशा प्रकारचे दोन विज्ञान आहेत. दृश्य आकृती आणि रंग, आवाज इत्यादी इंद्रिय विषय असले आणि त्याचा संबंध अनुक्रमे डोळे, कान इत्यादी इंद्रियांशी आला तरच विज्ञान जागृत होते, इतर वेळी नाही. त्याचप्रमाणे कल्पना आणि विचार हे इंद्रिय विषय मनात आले तरच मनिंद्रिय विज्ञान जागृत होते, ह्यावरुन असे स्पष्ट होते की इंद्रिय आणि विषयाचा एकमेकांशी संबंध आलाच तर विज्ञान जागृत होते. जसे आपण पुस्तक वाचत असताना आपले मन जर दुसरीकडे गुंतले असेल तर उघड्या डोळ्यांनी आपण केवळ पुस्तकाकडे पाहत असतो. परंतु त्यात काय लिहिले आहे ते आपल्या लक्षात येत नाही. कारण त्यावेळी आपले चक्षुंद्रियविषय विज्ञान जागृत नसते. म्हणून इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियाच्या विषयाचा एकमेकांशी संबंध असतो. ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणूनच विज्ञान सुध्दा शाश्वत नाही तर ते क्षणाक्षणाला बदलत असतात.
संस्काराचा निरोध केला असता विज्ञानाचा निरोध होतो.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.३०.१२.२०२३
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत