महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

रामाचे प्रतीक व राजकारणाचा धंदा – डॉ अनंत दा. राऊत

  आज विशिष्ट श्रद्धा विषयाचा इतका दबाव वाढवलेला आहे की त्या विषयाबद्दलच्या वेगवेगळ्या बाजू मांडणे फारच मुश्किल होऊन बसले आहे.पण भारतीय संविधानाने दिलेल्या विचार स्वातंत्र्याचा वापर करत विवेकशील लोकांना काही तथ्यांची मांडणी करणे आवश्यक असते. ही मांडणी कुणाच्या भावनेला दुखावण्यासाठी नसते तर सकलजनांचे खरे हित कशात आहे हे सांगण्यासाठी असते.
    कोणत्याही धातूपासून बनवलेल्या शिल्पात प्राण अथवा जिवंतपणा नसतोच. कोणत्याही माणसांमध्ये आणि कोणत्याही मंत्रामध्ये निर्जीव वस्तूत प्राण ओतण्याची क्षमता मुळीच नसते. ती असती तर कुठेतरी ती सिद्ध झालेली दिसली असती. असे असले तरी शिल्प कलेकडे एका मूल्यात्मक दृष्टिकोनातून विवेकाने पाहता आले पाहिजे. विशिष्ट मूल्ये आणि जीवनादर्शाचे प्रतीक म्हणून विशिष्ट शिल्पाकडे पाहता येते. ती मूल्ये व त्या आदर्शांना अनुसरून जगण्याची प्रेरणा देण्याचे काम शिल्पे करू शकतात. आशा शिल्प कलेचा वापर वर्तमानात भारत देशाला प्रगतीपथावर नेऊ शकणारी संविधान मूल्ये रुजवण्यासाठी करणे आवश्यक असते. त्यासाठी भारताच्या सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य लढ्यातील कर्तृत्ववान महामानवांची शिल्पे अधिक उपयुक्त ठरतात. अशी शिल्पकला आपण विकसित देखील केलेली आहे. अशा शिल्पकलेला वर्तमानात अधिक महत्त्व देण्याची गरज आहे. जुन्या सरंमजामदारी, चमत्कृतीजन्य, अद्भुत कल्पनारम्य युगात घेऊन जाणाऱ्या शिल्पांपेक्षा नवीन मानवी आदर्शांची शिल्पे महत्त्वाची आहेत, याचे भान सामान्य जनतेला आले तर फार बरे होईल.
 राम या प्रतीकाचा भारतीय जनमानसावर फार मोठा प्रभाव आहे. या प्रतीकातून सत्यनिष्ठा, एक वचनीपणा, वडीलधाऱ्यांचा आदर, अपार बंधुप्रेम ही मूल्ये नक्कीच प्रकट होतात. पण राम हे प्रतीक निर्विवादपणे आदर्श प्रतीक म्हणून सर्वांनी स्वीकारलेले नाही. पेरियार रामास्वामी नायकर यांचे 'सच्ची रामायण' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'रिडल्स इन हिंदूईझम'ही पुस्तके वाचली तर आपल्या ते लक्षात येईल.अयोध्या नगरी ही रामाची किंवा बाबराची नाही तर ती बुध्दाची आहे अशी अनेक पुराव्यांसह मांडणी करणारा एक वर्गही भारतात आहे, परंतु त्या वर्गाकडे आज पूर्णपणे दुर्लक्ष केले जाताना दिसते. रामायण हे बुद्धाच्या नंतर रचले गेलेले आहे आणि राम हा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोकाचा नातू राजा बृहद्रथ याला मारून ब्राह्मणी प्रतिक्रांती करणारा पुष्यमित्र शुंग आहे, अशी मांडणी बामसेफने केलेली आहे.
वाल्मीकी रामायणाच्या उत्तरकांडात ७३ ते ७६ या सर्गामध्ये आलेली शंबुकाची कथा कुणीही स्वतः वाचू शकते. या कथेत राम राज्यात ब्राह्मणाचा बारा वर्षाचा मुलगा मरतो. तो ब्राह्मण आपल्या मुलाचे प्रेत घेऊन रामाच्या दारात येतो. "हे कसले तुझे आदर्श राज्य?तुझ्या राज्यात काहीतरी पाप घडले आहे, म्हणून माझा बारा वर्षाचा मुलगा वारला." असे तो रामाला म्हणतो. काय पाप घडते आहे, याचा शोध घेण्यासाठी राम आपले दूत सारीकडे पाठवतो. त्या दूतांना एका जंगलात शंबूक नावाचा तपस्वी तपश्चर्या करताना दिसतो. तो तपस्वी ब्राह्मण अथवा क्षत्रीय असता तर काही प्रश्नच नव्हता. परंतु तो शूद्र म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंबात जन्मलेला होता व शूद्र असूनही तपश्चर्या करत होता. म्हणजेच ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत होता. शूद्राने ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणे हे राम राज्यात घोर पाप मानले जात  होते. ज्ञान घेण्याचा प्रयत्न करण्याचे महापाप केल्यामुळे रामाने स्वतःच्या म्यानातली तलवार काढून शंबुकाचा शिरच्छेद केला आणि स्वर्गातील ३३ कोटी देवांनी रामाने हे फार महान काम केल्याबद्दल रामाच्या डोक्यावर फुलांचा वर्षाव केला. अशी ही कथा आहे.ही कथा माझ्या मनाची नाही तर वाल्मिकी रामायणात सामावलेली आहे.या कथेतून राम हा राजा च्या डोक्यावर फुलांचा वर्षाव करणारे ३३ कोटी देव विषमतावादी वर्ण व्यवस्थेचे पक्के रक्षक होते असा अन्वयार्थ निघतो. ज्यांना वर्णव्यवस्थेने ज्ञान घेण्याचा अधिकार दिला, श्रेष्ठतेचे स्थान दिले त्यांच्या दृष्टीने राम हा आदर्श असू शकतो परंतु ज्या राम राज्यात शूद्राति शूद्रांवर ज्ञानबंदी होती त्या शुद्रांनी राम राजाला आदर्श राजा का मानावे हा प्रश्न यापूर्वी अनेक विद्वानांनी मांडलेला आहे.आजही तो प्रश्न अस्तित्वात आहेच.
 भाजपवाल्यांनी तर राम हा राजकारणाच्या धंद्याचा विषय बनवलेला आहे हे सर्व सुज्ञांना माहित आहे. सर्वसामान्य माणसांनी परस्परांना भेटल्याबरोबर रामराम करून अभिवादन करणे आणि भाजपवाल्यांनी कंठरवाने जय श्रीराम म्हणणे यातील भावनेत फार मोठा फरक आहे. रामाच्या प्रतीकाला राजकारणाचा धंदा बनवून स्वतःची सत्तेची पोळी भाजून घेणे. लोकांना कल्पित विश्वात घेऊन जाणे. त्यांची धर्मनशा अधिकाधिक गडद बनवत नेणे आणि आपण देशाचे सारे काही कशे भांडवलदारांच्या घशात घालतो आहोत याकडे जनतेचे लक्ष जाऊ नये याची व्यवस्था करणे. हे जे राजकारण चाललेले आहे ते फार घातक आहे. लोकांची धर्म नशा वाढवल्याने लोक अधिक अंधश्रद्ध बनतात. त्यांच्यात बुद्धिवाद व विज्ञानवादाचा विकास होत नाही. लोकांची तर्कशीलता मरून जाते. ज्या लोकांची तर्कशीलता मरून जाते ते लोक नवे काहीही निर्माण करू शकत नसतात. असे लोक केवळ धर्म धुंदीत राहतात. धर्म धुंदीत राहणाऱ्या लोकांवर अनभिशक्तपणे राज्य करणे फार सोपे असते. त्यासाठी हुकूमशाही प्रवृत्तीचे लोक नेहमीच सामान्यजणांची धर्म धुंदी वाढवण्याचे काम करत असतात. सारा इलेक्ट्रॉनिक मीडिया आज वर्तमान सरकार व भांडवलदारांचा बटीक बनलेला आहे. हा मीडिया लोकांची धर्म धुंदी मोठ्या प्रमाणात वाढवतो आहे. त्यामुळे लोकांना अन्न,वस्त्र, निवारा, उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य सुविधा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, असे वाटतच नाही. या गोष्टींची पूर्तता झाली नाही तरी हरकत नाही. पण राम मंदिर तर झाले ना. असे लोकांना वाटते आणि भांडवलदारधर्जिने लोक विना तक्रार त्यांच्यावर सत्ता गाजवू शकतात. आज भारतात विवेकशील, तर्कशीलतेने विचार करणारे लोक नाहीतच असे नाही. ते भरपूर आहेत आणि ते आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. खरेच वर्तमानात आपले हित व्हावे असे वाटत असेल जनतेने विवेकशील लोकांचा विचार स्वीकारणे आवश्यक आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!