दुसरे आर्यसत्य – दु:ख समुदय भाग १२

दु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. दु:ख समुदय म्हणजे दु:खाचे कारण. मनुष्याला दु:ख का होते ? त्याला दु:ख का भोगावे लागते ? त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किंवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो.
परंतू दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मीच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामूळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते.
तृष्णा
दु:ख निर्मितीच्या मागे तृष्णा हे एक कारण आहे. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हाच त्या गोष्टीविषयीची आसक्ती वाटत असते. ज्या गोष्टीविषयीची आपणास अनुभव नाही त्या गोष्टीविषयीची सहसा तृष्णा उत्पन्न होत नाही. एखाद्या रुपावर आपण आसक्त होतो; तेव्हा साहजिकच सुखवेदना निर्माण होतात. सुखवेदनाची आसक्ती झाली की नैसर्गिकरीत्या त्या सुखवेदनाची निर्मिती करणार्या रुपाची आसक्ती होते. अशा रितीने वेदनेमुळे तृष्णा निर्माण होते. जेव्हा सुख निर्माण होते; तेव्हा अधिकाधीक सुख मिळण्यासाठी पुन: पुन्हा तृष्णा निर्माण होते. म्हणून तिला पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा असे म्हणतात. हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. तृष्णा म्हणजे तहान. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखादी गोष्ट प्राप्त कराविशी वाटते, तेव्हा त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, अशा लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात.
लोभ
लोभ म्हणजेच अपुरेपणा, हावरटपणा आणि अतृप्तता दर्शवणारी माणसाच्या मनाची स्थिती होय. लोभी माणूस कधिही तृप्त होत नाही. लोभामध्ये माणसाची आवड, इच्छा, ओढ, लालसा, हाव, मालकीहक्क, किर्तीलोभ, अपत्यलोभ, संपत्तीलोभ इत्यादी भावणा दिसून येते. लोभातून दु:ख निर्माण होते. लोभातून भय निर्माण होते. अनिर्बंध लोभाने आणि पूर्वग्रहकलुषित मनाने किंवा मिथ्यादृष्टीने जर एखादी गोष्ट केली, तर तो लोभ लवकर जात नाही. उदाहरणार्थ जर एखाद्या वरिष्ट वर्गाने खालच्या वर्गावर स्वत:चे हित जोपासण्यासाठी वर्चस्व प्रथापित करण्याचा मोह झाला असेल तर त्यांचा मोह लवकर सुटणार नाही. त्या प्रयत्नांत त्यांना अनेकदा अपशय जरी आले तरी त्यांचा लोभ आणि मोह कमी होणार नाही. उलट त्याची तिव्रता विफलतेतून आणि निराशेतून आणखी वाढत जाईल. अशा मिथ्यादृष्टी असणार्या लोभाला मान्यता देणार्या तत्त्वांना नाकारले तरच तो लोभ नष्ट होऊ शकतो. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दु:ख आणि भय यापासून मुक्तता लाभते.
लोभ आसक्ती निर्माण करतो आणि आसक्ती चित्ताला गुलाम करतो. आसक्तीमूळे दु:ख आणि भय उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे, त्याला दु:ख नाही भय नाही. जो कामभोग अथवा कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे, त्याला दु:ख नाही व भय नाही.
द्वेष
जेव्हा एखाद्यी व्यक्ती स्व:ताचा हेतू साध्य न झाल्यामुळे, किवा स्व:ताची अस्मिता दुखावली गेल्यामुळे अंतर्गत असमाधानी असतो, तेव्हा तो आपला रोष इतरांवर काढत असतो. यातूनच द्वेष किवा तिरस्कार निर्माण होऊ शकतो. द्वेषामध्ये तिटकारा, तिरस्कार, राग, चीड, असंतोष, सूड यासारख्या मानसिक प्रवृती कार्य करीत असतात. यातूनच अपेक्षाभंग, उदासिनता, निराशा, धास्ती, भय यासारख्या वृती मनामध्ये डोकावतात. वस्तुमात्राच्या अस्थिरतेमुळे, असुरक्षेमुळे, आणि असमाधानकारकतेमुळे अशा वृती उत्पन्न होत असतात. वस्तुमात्राचे योग्य आकलन न झाल्यामुळे मनाची अशी अवस्था होत असते. द्वेषामुळे व्यक्तीमध्ये व समाजामध्ये दु:ख निर्माण होते.
द्वेषाबरोबर मिथ्यादृष्टीचा मोहसुध्दा असेल तर तो द्वेषाला अधिकच वाढवतो. उदाहरणार्थ मिथ्यादृष्टीने काही वर्ण, जाती-जमाती किंवा धर्म-संप्रदाय सामाजीक, धार्मिक व नैतिक दृष्टया तिरस्करणीय ठरविले तर त्यामुळे उत्पन्न होणारा द्वेष फार जहाल स्वरुप धारण करु शकते. जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा व भारतामध्ये दलित वर्गांचा झालेला छळ हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.
मोह
मोह म्हणजे अज्ञानाने, गोंधळून टाकणारी वैफल्याची आणि असहायतेची मानसिक स्थिती होय. मोहाच्या हट्टापायी चुकीच्या मतप्रणालीवर अनाठायी विश्वास ठेऊन त्याचे विपरीत परिणाम मनुष्याला भोगावे लागतात. मोहामुळे लोभ आणि द्वेश उत्पन्न होते. मूर्खपणा, कमीबुध्दी, गोंधळ, चार आर्यसत्याविषयी अज्ञान, पूर्वग्रहकलुषितपणा, कल्पनासृष्टीतील हटवाद, जहालमतवाद, मिथ्यादृष्टी, अहंभाव इत्यादी कमी-अधिक तीव्रतेच्या वृती मोहामध्ये सामावलेले असतात. लौकिक आणि कर्माच्या दृष्टीने मोह असणे हा फार मोठा दोष आहे. मोहामूळे जर एखादे कर्म केले तर त्या कर्माच्या परिणामापासून त्या माणसाची सुटका होण्यास वेळ लागतो.
मोह असल्याशिवाय लोभ किंवा द्वेष उत्पन्न होऊ शकत नाही. भगवान बुध्द म्हणतात की, ‘सर्व अकुशल धम्माचे (स्थितीचे) मूळ मोह आहे, ते मोहात एककेंद्रित होतात आणि मोह नष्ट केला म्हणजे सर्व अकुशल धम्मसुध्दा नष्ट होते. मोह आंधळेपणाने, अजाणतेपणे स्विकारले जात असते. त्यात वास्तवता व सम्यकदृष्टीचा अभाव असतो. थोडक्यात सर्व अकुशल कर्माचे मूळ म्हणजे मोह होय. मोहामुळे म्हणजे अज्ञानामुळे माणसाला मिथ्यादृष्टी निर्माण होते. यामुळे त्याला शाश्वतवादी अथवा उच्छेदवादाची भवतृष्णा अथवा विभवतृष्णा होत असते.
तृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा व विभवतृष्णा.
कामतृष्णा
कामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधिही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनूष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो.
भवतृष्णा
भवतृष्णा म्हणजे दृष्टी. आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी बाळगणे म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किंवा पुन:पुन्हा जन्म घेण्याची लालसा. या लालसेमूळे जगाच्या दु:खात मोठी भर पडली आहे. शंभर वर्षे जगूनही मनुष्य अतृप्तच राहतो. मरणाला माणूस भीत असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, “शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा ! ”
विभवतृष्णा
विभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा,प्या आणि मजा करा कारण उद्या मरणारच आहे, अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांध बनतात आणि शेवटी दु:ख ओढवून घेतात.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२४.१२.२०२३
टीप- ‘भगवान बुद्धांची शिकवण’ हे माझं पुस्तक Amazon Kindle वर असून त्यावर आधारित ही लेखमाला सादर करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत