गाझा पट्टीत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त, हमासच्या हवाई दलाचा वरिष्ठ कमांडर मारला गेल्याचा दावा.

इस्राइली सुरक्षा दलांनी काल रात्रीपासून गाझा पट्टीत हवाई आणि जमिनीवरून हल्ले करीत दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्याचा विडा उचलला आहे. या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा वरिष्ठ कमांडर मारला गेल्याचा दावा इस्राइलने शनिवारी केला.
गाझा पट्टीत काल रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा प्रमुख मुराद अबू मुराद याला ठार केल्याचा दावा इस्राइली सुरक्षा दलांनी केला आहे. या हल्ल्यात हमासचे हवाई मुख्यालयही उद्ध्वस्त झाले असल्याचे सांगण्यात आले. इस्राइली हवाई दलाने (आयएएफ) ‘एक्स’ या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे.
‘‘आयएएफ’च्या लढाऊ विमानांनी काल रात्री संपूर्ण गाझा पट्टीवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. यामध्ये हमासचे अनेक अड्डे नष्ट करण्यात आले. तसेच हमासचा गाझा पट्टीतील मुख्य गट ‘नुख्बा’वरही हल्ले केले,’’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘आयएएफ’च्या दाव्यानुसार इस्राइलच्या हल्ल्यांमध्ये अबू मुराद ठार झाला आहे. गेल्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी ग्लायडरच्या मदतीने हवाई मार्गाने इस्राइलमध्ये घुसखोरी केली होती. या ग्लायडरना अबू मुरादनेच मार्गदर्शन केले होते, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इस्राईल’ने दिले आहे.
तसेच, इस्राइलच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी काल ‘हमास’च्या मुख्यालयावरही हल्ला केला. तेथून त्यांच्या हवाई हल्ल्यांचे व्यवस्थापन केले जात होते. गाझा शहरातील हमासचा हवाई माहिती विभागाचा मुराद अबू मुराद प्रमुख होता. तो ठार झाला असल्याचा दावा इस्राइली हवाई दलाने केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत