शिक्षण महर्षी दादा, पीएचडी व लावलेला दिवा…!

दादा म्हणजे प्रचंड शिक्षण घेतलेले व्यक्तिमत्व . इयत्ता पहिली मध्ये जेव्हा ते पास झाले तेव्हा संपूर्ण गावभर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी इयत्ता दुसरी सुद्धा पास केले, संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांची चर्चा सुरू झाली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी तिसरीत ऍडमिशन घेतले , आणि बघता बघता ते तिसरी सुद्धा पास झाले. संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या तिसरी पास झाल्या निमित्त पेढे वाटण्यात आले . नंतर ते म्हणाले,आता मी चौथी सुद्धा शिकणार , बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे त्यांनी प्रचंड अभ्यास करून चौथी बोर्डाची परीक्षा पास केली . संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फटाके वाजले .
नंतर पाचवी, सहावी आणि सातवी चा खडतर प्रवास सुरू झाला . वाचनाची आवड , शिकण्यासाठी काही पण करण्याची तयारी , 23 तास अभ्यास , आणि एक तास झोप , अशी कठोर मेहनत करून ते सातवीची बोर्डाची परीक्षा पास झाले . दादा ची लोकांनी हत्तीवरून मिरवणूक काढली. संपूर्ण महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला . दादा चे यश पाहून शासनाकडून धरणामध्ये समुद्राचे खारे पाणी सोडण्यात आले.
आता संपूर्ण भारताचे लक्ष त्यांच्या आठवीच्या परीक्षेवर होते, इतिहासाची प्रचंड आवड असणाऱ्या दादांनी , ‘ काका मला वाचवा ‘ या ऐतिहासिक वाक्यातून धडा घेतला . आणि तेव्हाच ठरवले की भविष्यात काकाच्या पाठीत खंजीर खुपसायचा .
नववीत गेल्यावर नागरिकशास्त्रा मधील राज्यशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला . विचारधारा- फिचारधारा काही नसते , फक्त सत्तेची खुर्ची मिळाली पाहिजे , असे महान ज्ञान त्यांना तेव्हा प्राप्त झाले . संपूर्ण एशिया खंडामध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. संपूर्ण चीनची गुप्तचर यंत्रणा यांच्या मागावर असायची.
नंतर जगातील पहिला मुलगा दहावी पास होणार होता, नासाचे सायंटिस्ट उपग्रहातून यांच्यावर देखरेख करत होते. दादांना गणिताची प्रचंड आवड , पाण्यातून पैसा मिळू शकतो हे ज्ञान त्यांनी दहावीला घेतले , आणि त्यांचे आयुष्य सिंचले गेले . पृथ्वीतलावरील पहिला दहावी पास झालेला मुलगा म्हणजे दादा. त्यानंतर शिक्षण नव्हते. अमेरिका लंडन येथील विद्यापीठांनी मीटिंग घेऊन दादा चे ऍडमिशन नाकारले , कारण एवढ्या हुशार विद्यार्थ्याला कोण शिकवणार ? हा सर्वात मोठा प्रश्न लंडन आणि न्यूयॉर्क मधील प्राध्यापका समोर होता.
असे उच्च विद्या विभूषित उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले , हे महाराष्ट्राचे भाग्य समजावे. त्यामुळेच पीएचडी करून काय दिवे लावणार असा प्रचंड विद्वत्ता पूर्ण प्रश्न त्यांनी विधानसभेत उपस्थित केला . त्यांनी हजारो करोड रुपये कमवलेले , त्यासाठी त्यांना पीएचडी करावी लागली का ? , सकाळी चार वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांना पीएचडी ची गरज लागली का ? सख्या चुलत्याला धोका देताना त्यांना पीएचडी ची गरज लागली का ? धरणात मुतण्यासाठी त्यांना पिएचडी ची गरज लागली का ?……नाही ना.
मग , Phd करून तुम्ही काय दिवे लावणार आहात ? हे वाक्य ऐकून आम्ही धन्य झालो . किती हा शिक्षणाचा ध्यास , किती ज्ञानाची आवड , किती हे संशोधन , असा उपमुख्यमंत्री होणे नाही.
सिद्धार्थ शिनगारे
छत्रपती संभाजीनगर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत