‘एबीपीमाझा’ वर उद्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळा

नागरिकांमधून निवडल्या गेलेल्या नऊ कर्तबगार स्त्रियांचा गौरव करणारा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२३’ हा सोहळा १० डिसेंबर (रविवार) रोजी ‘एबीपी माझा’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
याच सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या नव्वदाव्या जन्मदिनानिमित्ताने सादर करण्यात आलेल्या ‘स्वराशा’ हा त्यांच्या उत्तमोत्तम गीतांचा कार्यक्रमही पाहायला मिळणार आहे. त्यात धनश्री देशपांडे, केतकी चैतन्य, राधिका नांदे आणि सोनाली कर्णिक यांनी गाणी सादर केली आहेत.
मुंबईत शिवाजी पार्क येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहा’त नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवलेल्या नऊ स्त्रियांचा तर सन्मान करण्यात आलाच, परंतु यंदाचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना प्रदान करण्यात आला. स्त्रियांकडे असलेली संकटांवर मात करण्याची जिद्द आणि आपल्याबरोबर इतरांना पुढे घेऊन जाण्याचा भगिनीभाव या गुणांचा उत्सव असलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे रविवारी दुपारी ४ वाजता ‘एबीपी माझा’वर प्रक्षेपण होणार आहे.
या पुरस्कारांचे हे दहावे वर्ष आहे. यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’साठी निवड झालेल्या नऊ ‘दुर्गां’मध्ये ‘कचरावेचक ते पर्यावरणरक्षक’ असा प्रवास केलेल्या सुशीला साबळे, ‘खेळघर’च्या माध्यमातून शाळेपलीकडचे शिक्षण देणाऱ्या शुभदा जोशी, बहुविकलांग व गतिमंद मुलांसाठी गेली ४१ वर्षे काम करणाऱ्या रेखा बागूल, अंधत्वावर मात करत एक आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. कल्पना खराडे, शेतीचा गंध नसतानाही आव्हानांना तोंड देत यशस्वी शेतकरी झालेल्या संगीता बोरस्ते, भारतातील पहिली त्वचापेढी सुरू करणाऱ्या डॉ. माधुरी गोरे, सात लाख हेक्टर जमिनीवर पाणलोट कामे करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैशाली खाडिलकर, शेती आणि जैवतंत्रज्ञानातले संशोधन करणाऱ्या डॉ. रेणुका करंदीकर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताची जागतिक विजेती ठरलेली पहिली महिला खेळाडू अदिती स्वामी, यांचा समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत