अष्टपैलू व्यक्तिमत्व – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हंसराज कांबळे
८६२६०२१५२०
नागपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगातील पुस्तकाचा यात धर्म , राजकारण , सामाजिक सगळ्या पुस्तकाची पाने चाळली होती . वाचन केली होती. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण धर्मशास्त्र या नावाने संबोधतो. सगळ्या धर्माचा अभ्यास करून धर्माबद्दल बोलताना ते म्हणतात –
प्रश्न फक्त इच्छेचा आहे. आज बौद्ध धर्म देशांनी मनावर घेतले व लोकांची मनोभूमिका जाणून घेतली तर बौद्ध धर्म जगभर पसरण्यास व त्याची वाढ होण्यास मुळीच कठीण जाणार नाही. केवळ स्वतः आदर्श बौद्ध बनून कर्तव्यच्युत राहणे हे खऱ्या बौद्धाचे लक्षण नव्हे. बौद्ध धर्म प्रसारासाठी अहोरात्र झटणे हे खऱ्या व आदर्श बौद्धांचे कर्तव्य होय. ही बाब बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार करणे म्हणजेच मानव जातीची सेवा करणे होय. ही बाब बौद्ध राष्ट्रांनी ध्यानात घेतली तर मला विश्वास वाटतो की , बौद्ध धर्म वृद्धीची लाट कधीही थोपविली जाऊ शकणार नाही.
संदर्भ – बुद्ध – मार्क्स आणि धम्माचे भवितव्य. लेखक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पृष्ठ क्रमांक 24.पैरा – शेवटचा. अनुवादक- रत्नाकर गणवीर.
निरंतर अभ्यास करणे आणि अभ्यास करून त्याचा अर्थ लावून योग्य तो तर्कसंगत निष्कर्ष काढणे हेच काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र केलेले असुन त्याच त्यांच्या सकारात्मक दूरदृष्टीपणामुळे शक्य होऊ शकले. अभ्यासक्रमीके बद्दल बोलताना आणि लिहिताना म्हणतात – *भाराभर ग्रंथ नुसते वाचून काय उपयोग ? गाढवाच्या पाठीवर ग्रंथ लादण्यापासून गाढवाला जेवढा लाभ तेवढाच लाभ फार तर अशा वाचनाने होऊ शकेल. ग्रंथ वाचून रसग्रहण करण्याची शक्ती पाहिजे. नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजे. सिद्धांत परिपोष करता आला पाहिजे*.
संदर्भ – खंड. क्र.१८ भाग – ३ पृष्ठ. क्र.४४२ पैरा – ३.
यातील प्रत्येक शब्द लाखमोलाचा आहे. पण विशेष म्हणजे यातील –
ग्रंथ वाचून रसग्रहण करण्याची शक्ती , नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजेत.
आणि –
सिद्धांत परिपोष करता आला पाहिजे.
हे तिन्ही सूत्र फारच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक आहेत. यातील एकाही तत्त्वाची उणीव होता कामा नये. कारण त्यामुळे अर्थ आणि सार किंवा निष्कर्ष बिघडतात. वाचनाबरोबरच वक्तृत्व कसे असावे हा गुण सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंगी बानलेला होता. कितीही केवळ पुस्तकी घोडे असू द्या पण सुसंगत तर्काच्या मैदानाचे कागदी घोडे एक पाय सुद्धा नाही. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते पहा-
*या सभागृहात जर कोणाला आपले म्हणणे मान्य करून घ्यायचे असेल तर ते फक्त वक्तृत्वाच्या जोरावरच. त्याला आपल्या विरुद्ध बाजूला वादविवाद करून आवर्जून आपल्या बाजूला ओढून घ्यावे लागेल. मग तो वादविवाद काही वेळा सौम्य असेल किंवा काही वेळा तिखट असेल पण तो नेहमीच तर्कशुद्ध व विचारशील असला पाहिजे*.
संदर्भ – खंड क्र.१८ भाग – ३ पृष्ठ. क्र.७७ – ७८.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार 10 ऑक्टोबर 1947 रोजी सिद्धार्थ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. त्यांनी पार्लमेंट मध्ये कायदे केले जातात त्याबद्दल बोलताना व्यक्त केले आहेत. हा समूह समाज माध्यम म्हणजे एक प्रकारचे सभागृह आहे. म्हणून आपले विचार व्यक्त करताना तर्कशुद्ध विचारशील असणे गरजेचे आहे. राजकीय तत्त्वज्ञानाच्या बाबतीत सलोख्याचा मार्ग की , दमन तंत्राचा मार्ग निवडायाचा याविषयी राजकीय तत्त्वज्ञानाच्या एका महान शिक्षकाच्या एडमंड बर्क च्या एका चिरस्मरणीय विधानाची आठवण करून देताना डॉ . बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –
केवळ बळाचा वापर हा तात्पुरताच असतो. काही काळाकरिता त्यामुळे सत्ता गाजवता येईल . परंतु त्यामुळे पुन्हा त्यांना अधिपत्याखाली ठेवण्यासाठी बळाचा वापर करण्याच्या गरजेला कायमचे दूर करता येणार नाही. ज्या राष्ट्राला कायमचे अधिपत्याखाली ठेवावयाचे आहे त्यावर अशा पद्धतीने शासन करता येत नाही.
दुसरा आक्षेप –
बळाच्या परिणामकारकतेच्या अनिश्चितते बाबत आहे. बळाच्या वापरातून नेहमीच दहशत निर्माण होईल असे नाही आणि सुसज्ज सैन्य म्हणजे विजयी नव्हे. जर तुम्हाला यश मिळाले नाही तर मग कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. वाटाघाटी अपयशी ठरल्यावर फक्त बळाचा वापर होतो. परंतु बळाचा वापरही अपयशी ठरला तर वाटाघाटीच्या अशाच उरत नाहीत. दयेच्या मोबदल्यात कधीकधी सत्ता व अधिकार मिळवता येतात. परंतु शक्तिपात व पराभूत झालेल्या हिंसेला भीक म्हणून सत्ता व अधिकार कधीही मानता येत नाही.
पुढे ते म्हणतात की –
बळाच्या वापराला माझा पुढचा आक्षेप असा आहे की , प्रयत्नाची पराकाष्टा करून तुम्ही जे मिळवाल त्याला तुम्ही हानी पोचवाल. तुम्ही जे मिळविता ते त्याच्या मूळ स्वरूपात मिळत नसते. ते अवमूल्यन झालेले , रसातळात गेलेले , उजाड झालेले आणि नाश पावलेल्या स्वरूपाचे असते.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे. खंड.१८ भाग – १ . पृष्ठ. क्र.२४२ . पैरा – पहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म समजण्यासाठी क्रांती प्रतिक्रांती, बुद्ध आणि कार्ल- मार्क्स तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म अभ्यास करायला सांगितले होते. स्वतःचा अभ्यास सांगितले नाही. आपण उच्चशिक्षित असूनही हिंदू धर्मातील रूढी परंपरांना मानतो. तसेच बौद्ध होऊनही अशा खुळ्या समजुती आणि अंधश्रद्धा वर विश्वास ठेवतो. ही त्यांच्या विचाराची पायमल्ली आहे. जनजागृतीचा विस्तव हा तेवित राहिला पाहिजे. विचार शून्यता हरवलेले व विकृत बुद्धीचे लोक नवनवीन क्लृप्त्या शोधून समाजामध्ये विचाराचे संभ्रम निर्माण करतात ते आपल्या जीवन शैलीला घातक आहे ह्याबाबत ते म्हणतात –
भारतामध्ये बहुसंख्य जनता अज्ञान आणि भोळसर खुळ्या कल्पनेत गुरफुटून गेली आहे. नव्हे. येथील समाज रचनाच खुळ्या कल्पनांना जन्म देते. म्हणून उपास – तापास नवस – सायास , देव – देवऋषी करणे म्हणजे धर्मपालन करणे अशी लोकांची भावना झालेली आहे. या खुळ्या आणि धर्मभोळ्या जनतेची या कल्पनेतून सुटका कराव्याच पाहिजे. विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठीच उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा प्रगती करण्याकरता केला पाहिजे तरच भारत उन्नताअवस्थेला जाईल.
संदर्भ – खंड. क्र.१८ भाग – ३ पृष्ठ. क्र.३८८ . सर्वात खालचा पैरा आणि पृष्ठ. क्र.३८९ . सुरुवातीच्या तीन ओळी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वरील तत्व विवेचनात धर्मशास्त्राचे महत्त्व सांगितले आहे , देशभक्तीची तळमळ आणि मनुष्याच्या उद्धारा संबंधीचे उदात्त विचार आहेत. मानवतेचा मूर्तिमंत अविष्कार असुन मानवतेला आवाहन आहे.जिज्ञासूपणा चौकसपणा , संशय आणि प्रश्न निर्माण केला पाहिजे तरच सत्य काय आहे ते समजून येईल याबद्दल लिहिताना आणि बोलताना ते म्हणतात –
*केवळ नवे ज्ञान मिळविणे हे सामाजिक प्रगतीचे पूर्व चिन्ह आहे. ही ज्ञानसंपदानाची प्रक्रिया योग्य होण्यासाठी " जिज्ञासूपणा , चौकसपणा आवश्यक आहे. जिज्ञासा म्हटली की संशय आलाच. कारण संशया शिवाय प्रश्न नाही आणि प्रश्नाशिवाय ज्ञान नाही. ज्ञान ही जड , स्थिर किंवा अक्रियाशील प्रक्रिया नाही. ज्ञान मिळवावेच लागते. त्याचा शोध घ्यावा लागतो. त्यासाठी परिश्रम आणि त्याग याची आवश्यकता असते." अर्थातच आपण आधीच याबाबती संतुष्ट आहोत. त्याबाबत आपण प्रयत्न वा परिश्रम करणार नाही .अंधार दिसलाच नाही तर प्रकाशासाठी कोण प्रयत्न करणार. एखाद्या गोष्टीबद्दल आपली खातरजमा झाली असेल तर पुढे आपण चौकशी करतो कशाला ? करणारच नाही. शोध प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी संशय आलाच पाहिजे. आपण असे मान्य केले पाहिजेच की , सर्व प्रगतीचा निर्माता हा संशय आहे. जिज्ञासा हीच प्रगतीकारक होय*
संदर्भ – RIDDLES IN HINDUISM. हिंदुत्वातील कुठ प्रश्न. अनुवाद. डॉ. न. म. जोशी. पृष्ठ. क्र. ( VII) .
जर जिज्ञासा नाही , संशय नाही , प्रश्न निर्माण केले नाही तर हे उच्च शिक्षण कोणत्या उपयोगाचे ? असे उच्च शिक्षण फक्त कागदाचा तुकडा समजण्यात येईल. एवढेच नाही तर ज्यांनी आपल्या अफाट उच्च कोटीच्या विद्वतेने आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण मिळवून शिक्षणाची सोय केली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पायमल्ली करीत आहात हे सिद्ध होईल. आपणा सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला प्रत्यक्ष शब्द प्रेरणादायी , मार्गदर्शक आणि लाख मोलाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की , महाराष्ट्रातील शेतकरी – कामगार पक्षाशी तुम्ही करार का केला नाही ? त्यावेळेस ते म्हणाले होते –
पूर्वी ब्राह्मणेत्तर पक्ष अस्तित्वात होता . आपल्या प्रांतातच नव्हे तर मध्यप्रांत वऱ्हाड, मद्रास येथेही असा पक्ष अस्तित्वात होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली म्हणून या पक्षाचे अनुयायी आपणास ज्योतिबा फुले यांचे अनुयायी म्हणवू लागले . पण ह्या पक्षातील लोक केवळ नाममात्र अनुयायी राहिले. ज्योतिबाचा कार्यक्रम , त्यांचे धोरण ह्यास या पक्षातील लोकांनी तिलांजली दिली. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आपल्याच हाताने जमिनीत गाडून देऊन लोक काँग्रेसमध्येही सामील झाले. हा ब्राह्मणेत्तर पक्ष काही दिवसांनी काळाने नामशेष झाला.
संदर्भ – नाशिक येथे दिलेले भाषण. दलित बंधू . दि.६ डिसेंबर १९५१ वरून घेतलेले. जनता वृत्तपत्र.दिनांक.८ डिसेंबर १९५१ रोजीचे .
पुढे महात्मा ज्योतिबाचा अनुयायी व त्यांच्या कार्याबद्दल ते म्हणतात –
ज्योतिबाचा अनुयायी म्हणून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की ,” मीच तेवढा खरा आज ज्योतिबांना एकनिष्ठ राहिलो आहे.” आणि मला अशी खात्री आहे की , या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला , त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी त्यांना ज्योतिबाचे धोरण , त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे. समाजातील 80 टक्के लोकांस विद्या प्राप्त करून देणे आणि त्यांना सामाजिक , आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे दिसत असता स्वराज्य , स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा ? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे. मागासलेल्या वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष आज जनतेचे नेतृत्व घेऊ शकत नाही. हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. समाजवादी पक्षानेही या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
संदर्भ – उपरोक्त.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशप्रेम, तळागाळातील जीवन जगत असलेल्या लोकां विषयीची तळमळ , आपल्या देशाचे स्वातंत्र्य टिकवले पाहिजे , स्वातंत्र्य टिकवून आपला देश समृद्ध राखायला पाहिजे. या देशात कम्युनिस्ट राजवट आली तर काय होईल याचा त्यांनी विचार केला आहे काय ? सारे उद्योगधंदेच नव्हे तर सारी शेती, जमीन , घरे सर्व काही सरकारच्या मालकीची होतील आणि हे सर्व हुकूमशाही राजवटीखाली पार पाडण्यात येईल. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे . शेळी होऊन आणखी किती दिवस जगणार ? आज ना उद्या अन्यायविरुद्ध तोंड दिलेच पाहिजे. आपण जर अन्यायाचा प्रतिकार करणार नाही तर आपला उद्धार कधीच होणार नाही. सामाजिक क्रांती घडवून आणण्याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात-
*सामाजिक क्रांती घडवून पाहणाऱ्या महाभागांच्या नशिबी निंदा आणि शिव्याशाप यांच्या माळा येतात. त्यांच्यावर मरणप्राय संकटे कोसळतात. समाजातील घातक परंपरा , अमानुष चालीरीती नि प्रचलित धर्मभोळेपणा याचा नायनाट करण्यासाठी ते झगडतात म्हणून ते रूढीप्रिय बहुजनांच्या क्रोधास बळी पडतात . हा अनुभव काही नवा नाही*.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. लेखक धनंजय किर. पृष्ठ. क्र.८२ . पैरा. खालून दुसरा.
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तुलनात्मक अभ्यास करून , दूरदृष्टीपणा ठेवून विचार केले वरून आजही त्यांचे विचार तंतोतंत खरे ठरत आहे. हाच त्यांच्या विचार प्रणालीचा दूरदृष्टीपणा आहे.
दि.३ डिसेंबर २३
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत