वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आरोप महापालिकेचे नियोजन फसले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमी परिसरात बुधवारी दाखल झाले होते. लाखोंच्या संख्येने आलेल्या अनुयायांच्या सोयीसाठी पालिका प्रशासनाने योग्य नियोजन केले नाही, त्यामुळे अनुयायांची मोठी गैरसोय झाली. तसेच पालिकेने माहितीपत्रकात दिलेल्या सुविधांपैकी प्रत्यक्षात अनेक सुविधा बंदच होत्या, परिणामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालिका प्रशासनाने केलेले नियोजन फसले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.
शिवाजी पार्क मैदानात २२ युनिट शौचालये उभारण्यात आली आहेत, असे पालिकेच्या माहितीपत्रकात नमूद आहे. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी केवळ शौचालयांचे १० युनिट उभारण्यात आले होते. तसेच पिण्याच्या पाण्याचे ३४० नळ आणि १६ टँकर पालिकेकडून उपलब्ध होणार होते, मात्र वास्तवात केवळ १२० नळ अनुयायांच्या सेवेसाठी होते, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळेकर यांनी केला. पालिका अधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळले. अनेक अनुयायांनी पालिकेच्या नियोजनाचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत