“मराठा समाजातील मुलांना ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?…”त्यावर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर

“मराठा समाजातील मुलांना ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आमची मुले हुशार असतानाही, आरक्षणात बसत असूनही आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं होतं.
त्यांच्या या विधानाचे पडसाद सामिजक आणि राजकीय पद्धतीने उमटले. यावरून आता पुन्हा एकदा ओबीसी नेते आणि महायुतीतील मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे. बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
“आमच्या हाताखाली त्यांनी काम करणं एवढी आमची लायकी नाही. आमची खरंच लायकी नाही. जातीनिहाय आम्ही लहान आहोत, ते मोठे आहेत. एखादा कलेक्टर कांबळे असला तर त्याच्या हाताखाली मराठा समाजाने काम कसं करायचं?” असा खोचक प्रश्न छगन भुजबळांनी विचारला.
ते पुढे म्हणाले की, मग त्या कलेक्टरच्यावर सुपर कलेक्टर नेमायला हवा. एखादा आदिवासी चीफ इंजिनिअर झाला तर कसं काय काम करायचं? एखादा सुपर चीफ इंजिनिअर नेमला पाहिजे. आमची लायकी नाहीय. मराठ्यांची सगळी लायकी आहे. ते आमच्यापेक्षा उच्च आहेत. म्हणून त्यांच्याकडे सगळी सुत्रे असली पाहिजेत. मराठा समाजातील मुलं शिकतात, कलेक्टर होतात, एसपी होतात. कशासाठी? शेवटी त्यांची चाकरी करायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे”, अशीही उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत