‘पनौती’ काय बला आहे ? – प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार मा. रणजितजी मेश्राम
राजकारणाचे असेच असते. ते घायकुतीचे नाही. ते क्रिया प्रतिक्रिया दोन्हींशी खेळत असते. मुरब्बी सांगतात, ते दमाने, धीराने घ्यावे. केंव्हा चलती, बेंगती होईल सांगून नसते ! ‘पनौती’ शब्दावरुन निघाले. एकदम कोसळावा तसे झाले. प .. म्हणजे पनौती ! मलाही वाटले, ही काय बला ? माहिती घेतली तर कळले, अशुभ .. अपशकून या अर्थाने घेतला जातो. हिंदी .. उर्दूत बऱ्यापैकी बोलचालीत आहे. झर्रकन दिवा लागला.
सध्या हा शब्द वापराच्या उच्चांकावर आहे. वापराचे नमुने कळले. एखाद्याचे दुकान चालत नसले, तर तो सहज म्हणतो, ‘क्या मालूम किसकी पनौती लग गयी.’ एखाद्याचे काम सफल होत नसेल तर तो म्हणेल, ‘कोणाची पनौती लागली कोण जाणे कामच होत नाही.’ तसा हा अंधश्रद्धेचा मनोखेळ आहे. अशी काही पनौती वगैरे नसते. पण अंधश्रध्दाळुंना कोण सांगेल ?
या शब्दाने अलिकडे राजकारणात उडी घेतली. राजकारण व्यक्तिकेंद्री झाले की असे होणारच ! अमुक आहे तर ‘मुमकीन’ आहे तमुक आहे तर ‘गॅरंटी’ आहे, अशातून हे निपजते.
राजकारणात विचारधारा वा पक्षनाव लपविण्याचे असेही तोटे असतात. मागे ‘फेकू’ शब्दही निघाला होता. पण ‘पनौती’चे बोचरेपण वेगळेच आहे. फारच दुखरा आहे. कुठून एकदम उपटला कोण जाणे ? एखादा शब्द लोक जेंव्हा डोक्यावर घेतात तेव्हा तो आवरणे अवघड जाते. पनौती चे असेच होते की काय ? हिटलर जाऊन शंभरेक वर्षे झाली. त्याचा आपला काय संबंध ? तो तिकडचा, जर्मनीचा. पण आजही गावातील माणूस, एखादा टर्रेबाजीने वागला तर सहज म्हणतो,’आपल्याला हिटलर समजतोस काय’ ? शब्दाचे असेच असते. तो डोक्यात घुसला की भीनला समजा.
हे चांगले की वाईट, शहाण्यांनी विचार करावा !
प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार- मा. रणजितजी मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत