
उत्तरेतील तीन राज्यांत भाजप ने विजय मिळविला तर तेलंगणात काँग्रेसने. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भारत राष्ट्र समितींचे (बीआरएस) यांचे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुका जिंकून विजयाची हॅटट्रिक करण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. यामुळे भारत राष्ट्र समितीला देशपातळीवरील पक्ष बनविण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेलाही ब्रेक लागणार आहे.
कर्नाटकपाठोपाठ तेलंगणांमधील या यशामुळे कॉंग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये दक्षिणेत मोठे बळ मिळणार आहे. काँग्रेसच्या या विजयात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि तेलंगणाचे पक्ष निरीक्षक माणिकराव ठाकरे यांचाही मोठा वाटा आहे. तेलंगणा राज्याच्या स्थापनेचे हिरो असलेले केसीआर यांनी २०१४ आणि २०१८ ची विधानसभा निवडणूक जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. त्यांनी दहा वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र कातेश्वर धरण प्रकल्पावरून झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि प्रस्थापिताविरुद्धचा असंतोष त्यांना भोवला. भाजपने तेलंगणात आपल्या तीन खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तरीही थोडेफार संख्याबळ वाढविण्या इतपतच या पक्षाला यश मिळाले.
कर्नाटकप्रमाणेच काँग्रेसने तेलंगणातही निवडणूक जाहीरनाम्यात सहा हमी दिल्या होत्या. घरातील कर्त्या महिलेच्या खात्यावर दरमहा अडीच हजार रुपये, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास ही महालक्ष्मी योजना, रयतू भरोसा योजने अंर्तगत फाळ्याने शेती करणाऱ्या शेतकन्याला दरवर्षी १५ हजार, शेतमजुराला १२ हजार रुपये आणि भातपिकाला ५०० रुपये बोनस, गृहज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक घरात २०० युनिट पर्यंत मोफत वीज, इंदिरा अम्मा योजनेअंतर्गत तेलंगणा चळवळीतील सैनिकांना २५० चौरस यार्डचा भूखंड, बेघरांना जागा व प्रत्येकी ५ लाख रुपये, युवा विकासम योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ५ लाखांचे विद्याभरोसा कार्ड, प्रत्येक मंडलामध्ये तेलंगणा इंटरनॅशनल स्कूल, ज्येष्ठांसाठी दरमहा ४ हजार रुपये पेन्शन व १० लाखांपर्यंतचा राजीव आरोग्यश्री विमा या हमींचा समावेश आहे. त्यांची पूर्तता करण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल.
कॉंग्रेसला बहुमत मिळवून देणारे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हेच विजयाचे शिल्पकार ठरते. मुख्यमंत्रिपदाचे दावेदारही तेच असतील. रेवंथ रेड्डी यांना तेलंगणा राष्ट्र समितीने २०१४ च्या निवडणुकीत विधानसभेचे तिकीट नाकारते होते. यामुळे त्यांनी केसीआर यांची साथ सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत