महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-१० (१३ जुन २०२४)

(सामाजिक विचारांचा ऐतेहासिक विकास (क्रमशः..)
भारतातील सामाजिक विचारांना जाणून घेण्यापूर्वी आपण खालील दोन महत्वपूर्ण सामाजिक विचार जाणून घेवूयात:
१. प्लेटोचे सामाजिक विचार: प्लेटोने मानवी स्वभाव व मानवी वर्तन या संबंधीच्या कल्पना विकसित केल्यात. मानवी वर्तनाच्या संदर्भात प्लेटो म्हणतात की, “समाजाकडून ज्या प्रकारच्या वर्तनाचे शिक्षण माणसाला मिळते, त्या प्रकारचे वर्तन तो करतो.” अर्थात, समाजातच मानवी वर्तनाची जडण घडण होते. पुढे ते असे म्हणतात की, “जर आपल्याला आदर्श समाज पाहिजे असेल तर सामाजिक शिक्षणाची व्यवस्था समाजाने अशा रीतीने तयार केली पाहिजे की, आपल्या इच्छेनुसार आपण आदर्श समाज निर्माण करू शकू.” समाजाला स्त्री व पुरुष या दोहोंचीही गरज असल्याने त्यांना समान हक्क मिळाले पाहिजेत, असे प्लेटोचे मत होते.
२. अॅरिस्टॉटलचे सामाजिक विचार: मानवी स्वभावाची संकल्पना विषद करतांना अॅरिस्टॉटलने, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, असे म्हटले आहे. मानवाला सतत इतर मानवांच्या सहवासाची आवश्यकता असते. मानवाला एकांत आवडत नाही. कोणताही मानव कोणत्याही अटीवर एकांतात राहू शकत नाही. अॅरिस्टॉटलची नैतिक तत्वे ही कारणमीमांसेवर अवलंबून आहेत. अॅरिस्टॉटलच्या मते,”मानवाचा सर्वात मोठा सद्गुण म्हणजे त्याची तर्कबुद्धी होय. म्हणून, तत्व चिंतनात खरे सुख असते. व्यक्ति वर्तनाच्या आधारेच समाजाची वैशिष्ठ निर्धारित होतात”.
वरील प्रमुख दोन प्राचीन सामाजिक विचारांच्या अनुषंघाणे, खाली दिलेले, “प्राचीन भारतातील सामाजिक विचार” बघूया:
भारतीय सामाजिक विचारांचा इतिहास हा खूप प्राचीन आहे. वेद, उपनिषदे, स्मृति, पुराणे, रामायण, महाभारत, या हिंदूंच्या धर्मग्रंथात भारतीय समाजाच्या सामाजिक विचारांचे मूळ आढळते. भारतीय सामाजिक विचारांचे उगमस्थान म्हणून, “मनुस्मृति” चा उल्लेख करावा लागेल. मनूने सामाजिक जीवना संबंधीचे विस्तृत विचार मांडलेले दिसतात. वर्णव्यवस्था हा भारतीय समाज व्यवस्थेचा आधार आहे. मनू म्हणतो की, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णाची उत्पत्ति विराट पुरुषाच्या अनुक्रमे मुख, बाहू, मांडी आणि पाया मधून झाली. जातीव्यवस्था ही सुद्धा भारतीय समाजाची एक वैशिष्ठपूर्ण सामाजिक संस्था आहे. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था या दोन सामाजिक संस्थांच्या आधारावर सामाजिक संबंधाबाबत नियम मांडण्यात आले आहेत. हिंदू धर्मामध्ये संस्कारांना विशेष महत्व दिले जाते.
भारतीय सामाजिक विचारांमध्ये फक्त हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाचा विचार करणे योग्य ठरणार नाही. त्या दृष्टीने, बौद्ध, जैन इत्यादि धर्मांच्या विचारसरणीचा देखील विचार करणे गरजेचे आहे. क्रमशः…
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर (३०-३१) या ग्रंथातून)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत