बुद्धपुरुष कबीर यांची जयंती आहे. त्या निमित्त…

अतुल भोसेकर
कहे कबीर….
भारताची भूमी ही विचारवंतांची भूमी म्हटली जाते. जगातील संशोधक जेव्हा बाह्यजगताचा शोध घेत होते तेव्हा येथील विचारवंत मनाच्या अभ्यासात गुंतले होते! भ.बुद्धांपासून सुरु झालेली ही मनोतत्वज्ञानाची नाळ कबिरांपर्यंत येते आणि तेथून पुढे नाथ संप्रदाय पर्यंत पोहचते.
कबीरांच्या नावाभोवती खूप गूढ तयार झाले आहे. त्यांच्या जन्माबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. विणकर असलेल्या निमा आणि निरू यांना हे अनाथ मुल सापडले आणि त्या बाळाला या दोघांनी आपलंसं केलं. विणकाराच्या घरात वाढलेल्या कबीरजी शेवट पर्यंत विणकरच राहिले – लौकिक आणि तत्वज्ञानिक अर्थाने! सुताची वीण विणताना त्यांनी आयुष्याची वीण देखील उलगडून दाखविली!
कबीरजींनी विणताना अनेक दोहे रचित गेले. त्यांच्या शिष्यांनी ते लिहून काढले आणि नंतर “बीजक” या नावाने प्रसिद्ध केले. त्यांचे दोहे पंजाबी, राजस्थानी, खडी बोली, अवधी, ब्रजभाषी अशा विविध भाषेतील संमिश्र शब्दांनी बनले होते. अनेक बोली भाषांच्या मिश्रणामुळे कबीरांचे दोहे सर्वसामान्यांना समजणारे ठरले.
समाजामध्ये असलेल्या कुप्रथा, अंधश्रद्धा, कर्मकांड यांवर कबीरजींनी कुठलाही शब्दच्छल न करता रोखठोक प्रश्न उपस्थित केले. भ.बुद्धांनी विकसित केलेल्या अंतःर्मनाचा प्रवास, कालौघात इथल्या व्यवस्थेने दाबून टाकला आणि हा प्रवास बहिर्मुखी करीत शारिरिक कर्मकांडात झाला. याच शाररिक कर्मकांडांवर बोट ठेवताना कबीरजी म्हणतात,
तन का जोगी सब करै, मन का करें ना कोई
सब विधी सहज पाईये, जो मन जोगी होई
अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी सांगितलेले, “मनोपुब्बङ्म धम्मा, मनो सेट्ठा मनोमया….” या पदाची आठवण होते. शाररिक कर्मकांडापेक्षा “मनाची” मशागत जास्त महत्त्वाची हे बुद्धांनी प्रतिपादले होते. कर्मकांडावर जोर दिल्यामुळे, आमच्या सर्वच क्रिया शाररिक स्वरूप स्थापित झाल्या. जप करणे, विशिष्ट प्रकारचा किंवा रंगाचा गंध कपाळीं लावणे किंवा विशिष्ट प्रकारची टोपी घालणे, बसणें, उठणे हे सर्व धर्म-पंथाच्या नावाने राजरोसपणे चालू होते आणि अशिक्षित लोक याला बळी पडत होते. हा वरवरचा बुरखा फाडताना, कबीरजी म्हणतात,
माला पहरें, टोपी पहरें, छाप तिलक अनुमाना
साखी सबदै गावत भूलै आतम खबर न जाना
स्वतःचाच धर्म श्रेष्ठ आणि ते मांडण्याचा अट्टाहास यावर कबिरजी म्हणतात –
हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना
आपस में दोउ लड़ी-लड़ी मरे, मरम न जाना कोई।
मानवता हाच खरं तर मनुष्याचा धर्म हवा. पण आम्ही पोकळ अस्थांनाच धर्म मानून बसलो. वेगवेगळ्या कर्मकांडांची क्रिया ही वरवरची, शाररिक आणि यांत्रिक असते. विशेष म्हणजे या सर्व कर्मकांडांना “शास्त्र”चा, ग्रंथांचा आधार दिला जातो. पण कबीरजी म्हणतात कि ग्रंथात जे काही लिहिलेले आहे ते जो पर्यंत अनुभवत नाही, तोपर्यंत त्या लिखाणाचा काय फायदा. ग्रंथप्रामाण्य मानणाऱ्यांना कबीरजी विचारतात,
तेरा मेरा मनुआ कैसा इक होई रे
मैं कहता आंखन देखी, तू कागज कि लेखी रे
कबीरांचा सारा रोख आचारण्यावर आहे. बाष्कळ बडबड आणि धार्मिक तत्वाचे नको तो बडेजाव याला विरोध करत, ते “मनाचा’ प्रवास करायला सांगतात. सर्वकाही मनावर अवलंबून आहे आणि म्हणून बाह्याकृती पेक्षा मानसिक कृती महत्त्वाची,
तेरा साहेब हैं घर माही, बाहेर नैना क्यूँ खोले
कहे कबीर सुनो भाई साधो, साहेब मिल गये, तिल ओले
आणि या आतल्या प्रवासाला मारक ठरतो तो आपला अहंकार! जसे एखादा कण डोळ्यात गेल्यानंतर आपण पाहू शकत नाही, तसेच या प्रवासात अहंकार डोकावला कि तुम्हांला समोरचा रास्ता दिसणार नाही असे देखील कबीरजी बजावतात.
काहीजण आयुष्यभर जप करतात, कथा-पोथी-कीर्तन-भजन करतात, यात्रा करतात, तप-उपवास करतात, मात्र त्यांच्या मनातील राग-द्वेष-मोह सारखे षड्रिपू नष्ट होत नाहीत. यावर कबीरजी भाष्य करतात,
माया मरि न मन मरा, मर मर गये शरीर
आशा, तृष्णा न मरि, कहे गये दास कबीर
नुसते जप-जाप करून मनःशांती कधी लाभेल का! कबिरजी म्हणतात काही लोकं वर्षानुवर्षे हातात माळ फिरवत बसतात. खूप जप करतात पण त्यांच्या मनात कधीही मैत्री, प्रेम, करुणा यांचे भाव दिसत नाही. जप करण्यापेक्षा त्यांनी मनात खोल शिरून मानवधर्म जपला पाहिजे. त्यांच्या शब्दांत –
माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर,
कर का मनका डार दे, मन का मनका फेर।
कबीरांचे पालन एका गरीब विणकर दाम्पत्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासून विणकामाचे संस्कार झाले होते. या विणकामात त्यांना आयुष्याचे मर्म कळले होते. आपण आयुष्यात कोणते “नेक” काम केले याचे सार सांगताना कबीरजी म्हणतात,
झिनी झिनी बिनी रे चदरिया, काहे का ताना काहे का बाना
दास कबीरने जतनसे ओढी, ज्यो कि त्यो धारि दीनी चदरिया
मनुष्य शरीर अनेक अणुरेणूंची संरचना आहे. जन्मतः अतिशय निरागस असलेला मनुष्य कालांतराने अनेक संस्कारांनी घडत जातो. आमच्या स्वार्थी, द्वेषी, अतीलोभयुक्त विचाराने किंवा आचारण्याने मनावर आम्हीं चुकीचे संस्कार करतो व शरीररूपी चादरीवर डाग पाडतो. याउलट कबीरजींनी अतिशय जाणीवपूर्वक, साक्षीभावाने आपल्या मनावर कोणत्याच “मारा”चे वर्चस्व होऊ दिले नाही! कबीरांचे लग्न झाले होते, मुले झाली होती, संसारही केला मात्र तरीही स्वतःला कुठलाही डाग लावून नाही घेतला! कबीरांनी आपले स्वतःचे जगणेच एक उदाहरण म्हणून जगासमोर मांडले आहे. मोक्षप्राप्ती, अथवा अंतिम सत्य जाणण्यासाठी कुठले विरागी आयुष्याची गरज नाही. संसारात राहून देखील तुम्हांला आयुष्यातील सत्य समजू शकते हेच त्यांनी दाखवून दिले.
कालौघात बुद्ध-महावीरांनी सांगितलेला मार्ग आम्हीं सोडून दिला आणि पुण्य कमवण्याच्या लालसेपोटी स्वार्थी मनुष्याने मनःशांतीसाठी अनेक उपाय योजित बसला. अनेक शतके मनुष्य जंग जंग पछाडतो आहे मात्र त्याला सुख मिळत नाही. हा सगळा प्रवास बाह्य दिशेने असल्याने चुकीचा आहे याचे खूप सुंदर स्पष्टीकरण कबीरजी देतात,
मो को कहां ढुंढो रे बंदे, मैं तो तेरे पास में
ना मैं बकरी ना मैं भेडी, ना छुरी गंडास में
नाहि खाल में नाहि पोंछ में, ना हड्डी ना मांस में
ना मैं देवल ना मैं मस्जिद, ना काबे कैलास में
ना ती कौनो कियाकर्म में, नाहि जोगी बैराग मैं
खोजी होय तो तुरैत मिलीहौ, पल भर कि तलास में
मैं तो रहौ सहर के बाहर, मेरी पुरी मवास में
कहे कबीर सुनो भाई साधो, सब सांसो कि सांस में
मन किंवा चित्त प्रयत्नपूर्वक एकाग्र केले कि ते भटकू शकत नाही. जोपर्यंत आपण आपले मन काबूत ठेवत नाही तोपर्यंत षड्रिपूंचे अस्तित्व असते आणि त्यांच्यामुळे मनुष्याच्या आयुष्यात आलेले दुःख उत्पन्न होत राहते आणि त्यांना नष्ट करण्याचा मार्ग सापडत नाही. हाच संदेश भ.बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी दिला होता व मनाच्या एकाग्रतेसाठी श्वासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे म्हणजेच विपश्यना केली पाहिजे हे सांगितले. हाच “विपश्यने”चा मार्ग कबीरांनी अतिशय सुंदर शब्दात मांडला.
१५व्या शतकातील या बुद्धपुरुषाने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा घालविण्याचे काम केले. त्याकाळी अशी समज होती कि काशी मध्ये मरण आले तर थेट स्वर्गात स्थान प्राप्त होते तर मगहर या ठिकाणी मृत्यू आल्यास मनुष्य नरकात जातो. लोकांच्या मनातील ही अंधश्रद्धा घालविण्यासाठी, मृत्यूची चाहूल लागताच, कबीरजी मगहर या ठिकाणी पोहोचले. याबद्दल कबीरजी म्हणतात,
जो कबिरा काशी मुए ते रमे कौन निहोरा
म्हणजे जर काशीमुळे स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग आयुष्यभर देवपूजा आणि इतर कर्मकांड करण्यात काय अर्थ आहे? आणि मग पुण्यासाठी आयुष्यभर कशासाठी खटाटोप करायचे?
कबिरसारख्या बुद्धपुरुषांचे आयुष्य खूप मोठा संदेश देऊन जातो. अखंड विकारांत बुडालेल्या समाजात कबीर एक आशेचा किरण म्हणून येतात. भ.बुद्ध म्हणतात तसे प्रत्येक व्यक्तीमध्ये “बोधिचित्त” असते, मात्र विषयवासनांच्या असंख्य पदरांखाली ते झाकले गेले आहे. कबीरांच्या भाषेत,
घुंघट के पट खोल रे तोव पिया मिलै
म्हणजेच विकारांचा पट नष्ट केल्यानंतरच आणि त्यामुळे असलेला अहंकार नष्ट केल्यानंतरच मनुष्याला त्याचे “स्वत्व” उमजेल. हा “अत्त दीप भव” असलेला मार्ग सांगणाऱ्या बुद्धपुरुष कबीरांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
अतुल भोसेकर
९५४५२७७४१०
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत