भगवान बुद्धांची शिकवण भाग ५६

बौद्ध जीवनमार्ग
मागील भागात ‘सत्, असत् आणि पाप,
लोभ व तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर आणि मनुष्याचे मन आणि मनोविकार, आपण(स्वत्व) आत्मविजय आणि प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती,
विवेकशीलता, एकाग्रता आणि जागरूकता’
याबाबतीत माहिती घेतली. या भागात
‘दुःख आणि सुख; दान आणि दयाळूपणा, ढोंग (खोटे बोलणे), खऱ्या धम्माची खोट्या धम्मासोबत सरमिसळ न करणे’ याबाबतीत माहिती घेणार आहोत.
दुःख आणि सुख; दान आणि दयाळूपणा
दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. परंतु दारिद्र्यनाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.
क्षुधा (भूक) हा सर्वात भयंकर रोग आहे.
आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे.
जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रूग्णाईत माणसांत आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसांत आपण हाव न धरता सुखाने राहायला शिकले पाहिजे.
शेत जसे तणाने नाश पावते, त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते, म्हणून शांत व मनोविकाररहीत (passionless) लोकांना दिलेले दान महान फलदायी होते. शेत जसे तणाने नाश पावते, त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते म्हणून गर्वरहित लोकांना केलेले दान फलदायक होते. शेत जसे तणाने नाश पावते, त्याप्रमाणे मानवजात विषयोपभोगाने नाश पावते. म्हणून विषयमुक्त लोका़ंना केलेले दान फलदायक होते.
धम्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे, धम्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदांत श्रेष्ठ आहे.
विजयातून द्वेष निर्माण होतो, कारण जीत म्हणजेच जिंकलेलाही दुःखी असतो आणि जय-पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो.
कामवासना, द्वेष, शरीरसुख हे दुःखद आहे. शांती हे सुखद आहे.
दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्ये करतात; काय पूर्ण करतात आणि काय अपूर्ण सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपूर्ण सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले.
जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावे म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकांतप्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते. जगात जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका ठेवण्याची वेळ पडली नाही असा कोणीही नसतो.
कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल.
रथाच्या चाकाला जशी खीळ असते, त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा व निस्वार्थीपणा आहेत. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.
ढोंग (खोटे बोलणे)
खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करु नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे.
तथागत (The Perfect One) जसे बोलतात तसे वागतात; तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत (The Perfect One) म्हणतात. हा बौद्ध जीवनमार्ग आहे.
खऱ्या धम्माची खोट्या धम्मासोबत सरमिसळ न करणे
जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यत पोहचू शकत नाहीत. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बद्धीमुळे कधीही सत्यापर्यत पोहचू शकत नाहीत.
जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात, ज्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे, त्यांना सत्य लाभते.
घर नीट शाकारलेले नसेल तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते; त्याप्रमाणेच असंस्कृत मनात (ill-trained mind) तृष्णा (craving) प्रवेश करते. घर नीट शाकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरु शकत नाही, त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात (well-trained mind) तृष्णा प्रवेश करु शकत नाही.
उठा! प्रमादी व निष्काळजीपणाने राहू नका. उत्तम शिकवणूकीप्रमाणे वागत रहा. जो त्याप्रमाणे वागतो तो या जगात आणि इतर सर्व जगात सुखी होतो.
सन्मार्गाचा अवलंब करा. कुमार्गाचा अवलंब करु नका. सन्मार्गाने जाणारे लोक या जगात आणि इतर सर्व जगात सुखी होतात.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड चवथा भाग तिसरा
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.७.२.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत